भोसरी, ता. ३१ ः येथील इंद्रायणीनगरातील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात जागोजागी कचरा साचल्याने विद्रूप झाले आहे. क्रीडा संकुलातील नाल्यामध्ये गवत, झाडेझुडपे वाढल्याने सापही वावरत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेने या क्रीडा संकुलाची वेळोवेळी स्वच्छता करावी, अशी मागणी खेळाडू आणि नागरिकांनी केली आहे.
या क्रीडा संकुलात पिंपरी चिंचवड शहरातील ८०० मीटरचा एकमेव सिंथेटीक ट्रॅक आहे. त्यामुळे धावपटूंची सरावासाठी नेहमीच गर्दी असते. महापालिकेच्या क्रीडा विभाग आणि आरोग्य विभागाने मात्र देखभालीकडे दुर्लक्षच केल्याचे दिसते. प्रेक्षा गॅलरीमध्ये पाण्याच्या व मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. ट्रॅकच्या कोपऱ्यांमध्ये पालापाचोळ्यासह कचऱ्याचा ढीग साचले आहेत. नाल्यामध्ये कचऱ्याचाही खच पडला आहे.
काही दिवसांपूर्वी ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आली होती. तेव्हाचा राडारोडा तसाच पडून आहे. त्यामुळे अस्वच्छतेत भर पडली आहे.
विशेष म्हणजे याच क्रीडा संकुलात महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. त्यानंतरही संकुल परिसराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल खेळाडू आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील अॅथलेटिक्स ट्रॅक परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेच्या क्रीडा विभागाकडे आहे. स्पर्धा असल्यावर आरोग्य विभागाद्वारे स्वच्छता करून दिली जाते, मात्र अॅथलेटिक्स ट्रॅक परिसराच्या नियमित स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेच्या क्रीडा विभागाकडे आहे.
- तानाजी दाते, सहायक आरोग्य अधिकारी, ‘क’ प्रभाग, महापालिका
इंद्रायणीनगरातील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील ॲथलेटिक्स ट्रॅक आणि परिसराची स्वच्छता करून घेण्यात येईल. त्याचप्रमाणे क्रीडा संकुल परिसराच्या नियमित स्वच्छतेकडेही लक्ष देण्यात येईल.
- पंकज पाटील, उपायुक्त, क्रीडा विभाग, महानगरपालिका
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.