निगडी, ता.८ ः निगडी - तळवडे रस्त्यावर रोज होणारी वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. सामान्य नागरिकांची वेळ, इंधन आणि संयमाची कसोटी पाहणारी ठरत आहे. त्यामुळे तेथून प्रवास करणारे आयटी कर्मचारी, लघुउद्योजक आणि कामगार पुरते त्रासून गेले असून कोंडीच्या रोजच्या कटकटीमधून सुटका व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.
निगडीतील यमुनानगरपासून तळवडे गावठाणाकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांना विशेषतः सकाळी व संध्याकाळी रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हा रस्ता मुळातच अरुंद आहे. त्यातच चाकण, निघोजे, सावरदरी, तळवडे आयटी पार्क, तसेच ज्योतिबानगरमधील उद्योगांमध्ये कामासाठी जाणाऱ्यांची संख्या सकाळी प्रचंड असते. मोठ्या संख्येने वाहनांची गर्दी होत असल्यामुळे चौकाचौकांत विशेषतः गणेशनगर, हुमा बेकरी, जोतिबानगर चौक, तळवडे गावठाण, कॅनबे चौक येथे अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. चाकण एमआयडीसीकडे जाणाऱ्या अनेक कामगारांना रोजचा प्रवास मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याला पर्यायी मार्ग काढून वाहतूक कोंडी व गर्दी कायमस्वरुपी कमी करावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी मागणी आयटी कर्मचारी आणि लघुउद्योजकांनी केली आहे.
कोंडीची प्रमुख कारणे
- अरुंद रस्ते मात्र वाहनांची प्रचंड संख्या
- वाहनाची घुसखोरी, जागोजागी मध्येच वळणारी वाहने
- मेट्रोच्या कामाने रस्ते खराब
- चौका-चौकातील बेशिस्त पार्किंग
- भिकारी, अनधिकृत रिक्षा थांबे
- वेगवेगळ्या प्रकारची अतिक्रमणे
तळवडे - निगडी मार्गावर रोज होणारी वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. चौकात उभी केलेली वाहने, बसलेले भिकारी, अनधिकृत रिक्षा थांबे आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस कारवाई करणे आवश्यक आहे.
- सचिन कुडापणे, नागरिक
तळवडे ते निगडी दरम्यानची रोजची वाहतूक कोंडी सामान्य नागरिकांचा वेळ, इंधन आणि संयम संपवणारी ठरत आहे. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यातच खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांची अतिक्रमणे आणि अनधिकृत रिक्षा थांबे कोंडीत भर घालतात. प्रशासनाने नियोजनपूर्वक उपाययोजना करून हा मार्ग लवकरात लवकर सुरळीत करावा.
- राजेश जाधव, खासगी कंपनीतील अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.