पिंपरी, ता. २९ : स्वच्छ सर्वेक्षण २०२५ स्पर्धेत राज्यात प्रथम आणि देशात सातवा क्रमांक मिळविल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२६ मध्ये देशात अव्वल स्थान मिळविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने शहरभर शेकडो सफाई सेवक अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने स्वच्छता मोहीम राबवत आहेत.
पिंपरी चिंचवड हे उद्योगनगरी आणि गजबजलेल्या बाजारपेठांचे शहर असल्याने पिंपरी कॅम्प, चिंचवड स्टेशन, भोसरी तसेच हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे प्रमुख रस्ते दिवसभर वाहनांनी गजबजलेले असतात. त्यामुळे दिवसा स्वच्छता करणे मोठे आव्हान ठरते. ही अडचण लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने रात्रपाळी स्वच्छता मोहीम अधिक तीव्र केली आहे.
या मोहिमेत मनुष्यबळासोबत आधुनिक यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मेकॅनिकल स्विपिंग मशीनद्वारे मुख्य रस्त्यांवरील बारीक धूळ हटवली जाते. वॉटर स्प्रिंकलर्सच्या साहाय्याने रस्ते व दुभाजक धुऊन हवेतल्या धुळीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच कचरा वाहतूक यंत्रणा रात्रीच कचरा डेपोपर्यंत पोहोचवत असल्याने स्वच्छतेच्या कामाला गती मिळत आहे.
सर्व कर्मचारी आवश्यक सुरक्षासाहित्य परिधान करून रात्रभर कार्यरत असतात. महापालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.
ओला व सुका कचरा वेगळा द्या
- कचरा विलगीकरण करून घरगुती कचरा हा ओला व सुका असा वेगळा करून घंटागाडीला द्यावा
- रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग टाळावे, जेणेकरून साफसफाईत अडथळे येणार नाहीत
- सार्वजनिक ठिकाणे व आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
‘‘दिवसभर वाहतुकीने गजबजलेल्या प्रमुख रस्त्यांची रात्री सफाई करणे शक्य होत आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२६ मध्ये उल्लेखनीय स्थान मिळवण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन काम करत आहे. सफाई सेवकांच्या या प्रयत्नांना बळ देण्यासाठी नागरिकांनी कचरा विलगीकरण करणे व सार्वजनिक स्वच्छता राखणे ही सामुहिक जबाबदारी समजून सक्रिय सहभाग नोंदवावा.
- डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.