पिंपरी, ता. ३१ ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पक्षाकडून शनिवारी (ता. ३१) विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकृत गट म्हणून नोंदणी करण्यात आली. नगरसेवक प्रशांत शितोळे यांची गटनेतेपदी सर्वानुमते नियुक्ती झाली.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपचे ८४ नगरसेवक निवडून आलेत. एका जागी भाजप पुरस्कृत अपक्षही निवडून आला. स्पष्ट बहुमतामुळे सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला. शुक्रवारी (ता. ३०) कासारवाडीतील एका हॉटेलमधील बैठकीत गटनेतेपदासाठी अनुभवी नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
पक्षातील सर्व नगरसेवकांच्या संमतीनंतर शितोळे यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यांच्या मंजुरीनंतर आज विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे अधिकृत गट नोंदणी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
प्रशांत शितोळे हे सांगवी प्रभाग क्रमांक २१ मधून चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. सभागृहातील कामकाज आणि प्रशासकीय निर्णयप्रक्रियेचा अनुभव त्यांना आहे. गट नोंदणी व गटनेता निवड प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती तसेच विविध समित्यांच्या अध्यक्षपदी भाजपचेच नगरसेवक नियुक्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
---
गटनेता नोंदणीबाबत अधिकृत माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आम्हाला सोमवारी प्राप्त होईल. त्यानंतर महापालिकेतील विविध समित्यांवर सदस्य नियुक्तीचा तौलनिक निष्कर्ष काढून पक्षाला माहिती कळविली जाईल.
- मुकेश कोळप, नगरसचिव, महापालिका
गटनेता निवडीबाबत पक्षाच्या बैठकीत प्रशांत शितोळे यांच्या नावाची निवड करण्यात आली. भाजप नगरसेवकांच्या संमतीने त्यांच्या नावाचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यांच्या मंजुरीनंतर आज विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी करण्यात आली.
- शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप, पिंपरी चिंचवड
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.