Pimpri Chinchwad office
sakal
पिंपरी, ता. १५ : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या कामकाजासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयात शुकशुकाट आहे. या कार्यालयासह तहसील कार्यालय, विविध ठिकाणची तलाठी कार्यालये आणि सर्वच शासकीय कार्यालये ओस पडली आहेत.
पीएमआरडीए आणि एमआयडीसी या दोन्ही विभागांतील अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने त्याच आस्थापनाचे कर्मचारी नेमण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या निवडणुकीची मुख्य जबाबदारी ही महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे आहे. इतर शासकीय विभागातील अधिकारी देखील त्यांच्या जोडीला नेमण्यात आले आहेत.
महसूल विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यांना त्या त्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. तसेच इतर दोन शासकीय अधिकाऱ्यांना राखीव अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यापैकी सर्वाधिक अधिकारी हे पीएमआरडीए अंतर्गत विविध विभागांत कार्यरत आहेत. तसेच आरटीओ आणि अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील मतदान प्रक्रियेत समाविष्ट करुन घेण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांतील खुर्च्या रिकाम्या दिसून आल्या. कामाअभावी अनेकांना पुन्हा माघारी परतावे लागत असल्याचे चित्र या कार्यालयांमध्ये दिसून येत आहे.