बिग बॉस या रिऍलिटी शोने आतापर्यंत सगळ्या भाषांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. घरातील गट, भांडण, मैत्री, प्रेम यांच्यामुळे चर्चेत राहणाऱ्या बहुप्रतिक्षित बिग बॉस मराठीचा नवीन सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकतंच कलर्स मराठीने सोशल मीडियावर प्रोमो शेअर करत घोषणा केली.
कलर्स मराठीच्या हँडलवर नुकताच नवा प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये अनेक स्क्रीन्स दिसत असून 21 मे ला पुन्हा नव्याने सुरू होणाऱ्या रिऍलिटी शोची घोषणा करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. हा प्रोमो रिलीज होताच बिग बॉस मराठीचे चाहते खुश झाले आहेत.
21 मे ला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनची घोषणा होणार असल्याचा अंदाज अनेकांनी कमेंट्समध्ये मांडलाय.“सर्व रिअॅलिटी शोजचा बाप, पुन्हा येतोय सर्वांना वेड लावायला! पहिली झलक पहा उद्या २१ मे रोजी सकाळी १० वाजता कलर्स मराठी चॅनेलवर” असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे. अनेकांनी या प्रोमोवर कमेंट करत बिग बॉस मराठीचाच प्रोमो येणार असं म्हंटलं आहे.
21 मे रोजी सकाळी 10 वाजता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची अधिकृत घोषणा करण्यात येईल असं म्हंटलं जातंय. पुन्हा एकदा महेश यांना पाचव्या सीजनचे होस्ट म्हणून पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. पण अजून महेश यांनी याबाबत कोणतीही माहिती जाहीर केली नाहीये.
या सीजनमध्ये कोणते सेलिब्रिटीज, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि विविध क्षेत्रातील व्यक्ती सहभागी होणार? गेल्या सीजन मधील उणीवा हा सीजन भरून काढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
बिग बॉस मराठीचा चौथा सीजन अनेकांना पसंत पडला नाही. अक्षय केळकरने त्या सीजनचं जेतेपद पटकावलं होतं. स्पर्धकांमध्ये असणारं कन्फ्युजन, शो इंटरेस्टिंग करण्यासाठी काहीही न करणं, अपूर्वाची दादागिरी याला सगळेचजण वैतागले होते पण यंदाचा सीजन यापेक्षा चांगला असेल अशी अपेक्षा सगळे ठेवून आहेत.
तर या आधी मेघा धाडे, शिव ठाकरे, विशाल निकम यांनी या शोचं विजेतेपद पटकावलं होतं.