Share Market
Share Market  Esakal
प्रीमियम अर्थ

Share Market : 'फुगलेल्या' शेअरपासून दूर राहत 'खानदानी' शेअरची कास धरा असा सल्ला तज्ज्ञ का देतायेत?

सकाळ डिजिटल टीम

अर्थविशेष : भूषण महाजन

‘कशाला उद्याची बात, बघ निघून चालली रात...’ असे म्हणत बेभानपणे प्रत्यक्ष बाजारात किवंा म्युच्युअल फंडामार्फत खरेदीचा अमाप ओघ वाढतोच आहे. अशा वेळी ऑपरेटरप्रणीत टिपांमधून फुगलेल्या शेअरपासून दूर राहिलेलेच चांगले.

मागचा सप्ताह अत्यंत खळखळटाचा गेला. १२ फेब्रुवारीच्या सोमवारपासून पुढील तिन्ही दिवस निफ्टी २१,५००च्या पातळीजवळ रोजच आधार घेत होती. दरच वेळेस खाली येण्याची भीती दाखवीत निफ्टी अधिकाधिक वरच गेली.

पुढे सप्ताहाअंती २२०००चा उंबरठा ओलांडून नव्या विश्वात दाखल झाली. गेल्या सोमवारीदेखील (ता. १९) ८१ अंश तेजी करीत २२१२२ अंशावर थांबली. परदेशी संस्था सतत विक्री करताहेत. ह्या संस्थांनी १६ फेब्रुवारीपर्यंत ₹ १४ हजार कोटींची विक्री केली होती.

(जानेवारी धरून ही विक्री ₹ २९ हजार कोटीची झाली.) गेले दोन महिने हे चालूच आहे. पण त्यामुळे नाउमेद न होता निफ्टी त्यांना जणू हेच बजावत आहे ‘मेरी तेजी नही दूंगी’, आमचा बाजार खाली येणार नाही.

निफ्टीने कधी आयटी क्षेत्राला तर कधी फार्मा, रिलायन्सला तर कधी स्टेट बँकेला साथीला घेऊन प्रत्येकवेळी परदेशी संस्थांकडून होणाऱ्या विक्रीचा यशस्वी सामना केला आहे.

तात्पर्य असे, की तज्ज्ञ, त्यांचे शेअर बाजाराचे मूल्यांकन, पुन्हा पुन्हा नफा वसुली करण्याचा आग्रह; ह्याचा कुठलाही परिणाम न होता भारतीय गुंतवणूकदार तेजीच्याच ‘मूड’मध्ये आहे हे नक्की.

शायर राहत इंदोरी ह्यांच्या शब्दात सांगायचे तर : है उसकी आदत, के डरा रहा है । है मेरी फितरत, के डरा नही हुँ । पाश्चात्य बाजार तेजीत आहेत. बीटकॉइन नवे उच्चांक करत आहे.

गेल्या सहा महिन्यात बीटकॉइनचा भाव दुप्पट झाला आहे. २६,००० डॉलरवरून ५२,००० डॉलर. गुंतवणूकदार ‘जोखीम नको’वरून ‘जोखीम चालेल’ या मन:स्थितीला आले आहेत.

अशा वेळी प्रत्येक घसरणीत पॅनिक न करता तेजीच करायची हे धोरण त्यांच्या अंगात मुरले आहे. कुठेतरी ही तेजी काही काळ थांबणार आहे.

त्याची तयारी ठेऊन पुढील तीन ते पाच वर्षाचे धोरण स्थानिक गुंतवणूकदारांनी आखले आहे, की काय अशी शंका यायला जागा आहे.

खास नोंद करायची बाब म्हणजे सोमवारी (ता. १९) शिवजयंतीच्या मुहूर्तावर निफ्टीने नवा सार्वकालीन उच्चांक केला.

खालच्या भावात झालेली आयटीसीची खरेदी, तिला दिलेली रिलायन्स, खासगी बँका आणि ऊर्जा क्षेत्राची साथ यामुळेच हे शक्य झाले.

‘कशाला उद्याची बात, बघ निघून चालली रात...’ असे म्हणत बेभानपणे प्रत्यक्ष बाजारात किंवा म्युच्युअल फंडामार्फत खरेदीचा अमाप ओघ वाढतोच आहे. अशा वेळी ऑपरेटरप्रणीत टिपांमधून फुगलेल्या शेअरपासून दूर राहिलेलेच चांगले.

आज दुर्लक्षित असलेल्या पण खानदानी शेअरची कास धरल्यास फार पश्चात्ताप होणार नाही. म्हणजे पुढे शेअर बाजार खाली आला तर चांगले शेअरदेखील मान खाली घालतीलच, पण पुन्हा वर उभारी घेणे त्यांना शक्य असेल.

फक्त काही काळ जावा लागेल इतकेच. तेजीत वारेमाप फुगलेल्या ‘ड’ दर्जाच्या शेअरना मात्र पुन्हा जुना भाव दाखवण्यात मोठा अवधी लागू शकतो.

आता बघा, नंदन डेनिम नावाचा एक शेअर आहे. २०१७ ऑक्टोबरमध्ये तो ६० रुपये होता, कोविडच्या आधी २०२०मधील १० रुपयांच्या भावावरून पुन्हा ६० रुपयांचा दर येण्यास २२ साल उजाडले.

कदाचित आता त्याचे भाग्य उजळले असेलही पण गेल्या १७ वर्षात फारसे काही न घडलेल्या ह्या शेअरची खरेदी ‘लेके रखलो, बडे भावकी खबर है’ हे ऐकून करणे योग्य आहे का, हे ज्याचे त्याने ठरवावे.

ह्या यादीत नेक्टर लाइफसारखा, गेली अनेक वर्षे, दर दोन तीन वर्षांनी ४०-५० रुपयांचा भाव दाखवणारा शेअरही आहे. व असे बरेच आहेत.

ह्यापैकी कुठल्याही शेअरबद्दल आमच्या मनात काहीही किल्मिष नाही. घेणाऱ्याने अभ्यास केल्याशिवाय खरेदी करू नये, इतकेच फक्त कळकळीचे सांगणे आहे.

एनटीपीसीने आयोजित केलेली ऊर्जा परिषद नुकतीच रायपूर येथे पार पडली. त्यात केंद्रीय ऊर्जामंत्री राजकुमार सिंग ह्यांनी एनटीपीसीसाठी वीजनिर्मितीचे अत्यंत महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित केले.

एनटीपीसीच्या नेतृत्वाखाली ७३ गिगाव्हॅट क्षमतेच्या किमान दुप्पट १५० गिगाव्हॅट अथवा त्याहून अधिक वीजनिर्मिती व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तसेच पुढील दूरदर्शी धोरणात भारताबाहेरही ऊर्जानिर्मितीची केंद्रे उभारणी एनटीपीसीने हाती घ्यावी असे सूचित केले. वीजनिर्मिती व वितरण ह्या क्षेत्राकडे आम्ही गेले सहा-आठ महिने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधत आहोत.

त्यानुसार शेअर बाजारानेही ह्या क्षेत्रातील समभागांना भरभरून दिले आहे. एनटीपीसी, कोल इंडिया, पॉवर ग्रीड गेल्या वर्षभरात अनुक्रमे दुप्पट व पावणेदोनपट झाले आहेत. हे सारे शेअर निफ्टीचा भाग आहेत. वरील बातमीचा वेध घेतल्यास, थोड्याफार कन्सॉलिडेशननंतर हे सारे क्षेत्र यापुढेही तेजीत राहील असे दिसते.

तसेच रिलायन्सने नुकतेच एक नैसर्गिक वायुविक्रीचे ई-टेंडर काढले होते. मध्य प्रदेशातील त्यांच्या कोल बेड मिथेन निर्मित नैसर्गिक वायू बाजार भावाच्या वर, (१० टक्के प्रीमियम देऊन) गेल व इंद्रप्रस्थ गॅसने खरेदी केला.

ऊर्जानिर्मिती, खते, वाहनातील सीएनजी तसेच घरोघरी पाइप गॅसमध्ये हा वायू वापरला जाईल. बांधकाम क्षेत्र तेजीत आहेच, राज्य सरकारांच्या अत्यंत दिलदार धोरणामुळे वाढीव टीडीआर वापरून मोठ्या संख्येने सदनिका तयार होत आहेत.

तसेच वाहनउद्योगही पूर्ण जोशात आहे. ही वाढीव मागणी लक्षात घेता गेल हा शेअरदेखील अभ्यासाला घ्यायला हवा. ह्याखेरीज एक जुना माहितीतला शेअर अभ्यासासाठी सुचवीत आहोत. आजकाल व्हॅल्यू शेअरमध्ये गुंतवणूक करावी की ग्रोथ शेअरमध्ये या वादात काही शेअर दुर्लक्षित आहेत.

संपूर्ण शेअर बाजारच नव्या उच्चांकाला भिडल्यामुळे, कॅस्ट्रॉलचा शेअरही नव्या वार्षिक उच्चांकाला गेला आहे. एके काळचा हा ब्लू चीप म्हणून गणला गेलेला शेअर. पण स्थिर वा जेमतेम वाढ दाखवणारा महसूल व गेल्या तेरा वर्षात फक्त दुप्पट झालेला नफा पाहता ह्या शेअरच्या वाटेला कोणी जात नसे.

कुठलेही कर्ज नसलेली ही बहुराष्ट्रीय कंपनी आता रंगात येत आहे. गेल्या तीन वर्षात विक्री ₹ ४,१०० कोटींवरून ₹ ५,१०० कोटींवर गेली आहे. मूल्यवर्धित उत्पादनांमुळे नफा वाढतो आहे.

विशेषतः इलेक्ट्रिक वाहनात वापरल्या जाणाऱ्याद्रवपदार्थाच्या बाजारपेठेत कंपनीचा ६६ टक्केहिस्सा आहे. त्यात निर्यातही होत आहे. सिल्व्हासा, पाताळगंगा व पहारपूर या तीन कारखान्यांत मिळून २८ कोटी लिटरची क्षमता आहे.

ट्रक चालक व ऑटो मेकॅनिकसाठी विविध कार्यक्रम कंपनी करत असते, त्यामुळे सर्वच नाममुद्रा लोकप्रिय आहेत व त्यात प्रीमियम श्रेणीला चांगली मागणी आहे. विक्री व नफा असाच वाढता राहिल्यास शेअर गतवैभवास जाऊ शकतो.

आजच्या ₹ २०० ते २१० भावाच्यादरम्यान शेअर आकर्षक वाटतो. जुना उच्चांक २०१४ सालचा, २७२ रुपयांचा आहे. ही गुंतवणुकीची शिफारस नाही. आपल्या सल्लागाराला विचारून निर्णय घ्यावा.

भारतीय अर्थव्यवस्था व शेअर बाजाराच्या पराक्रमाच्या उत्साहामध्ये ब्रिटन व जपान हे दोन देश मंदीत शिरले आहेत याकडे दुर्लक्ष नको. लागोपाठच्या दोन तिमाहीत त्यांचे सकल राष्ट्रीय उत्पन्न आटले आहे. जर्मनीदेखील मंदीच्या उंबरठ्यावर आहे.

चालू वर्षी तेथील जीडीपी वृद्धी ०.२ टक्के व्हावी असा अंदाज आहे. लाल समुद्रात जहाज वाहतुकीवर होणारे बंडखोरांचे व चाच्यांचे हल्ले थांबतांना दिसत नाहीत. चीनमधील बांधकाम क्षेत्रातील संकट संपलेले नाही.

हे क्षेत्र रोजगारनिर्मितीत अग्रेसर असते व जीडीपीवाढीत ह्या क्षेत्राचा मोठा वाटा असतो. चीनची वाटचाल मंदावत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

आपल्या शेजाऱ्याशी कितीही पटत नसले तरी त्याच्या घराला लागलेला आगीचा लोळ आपलेही नुकसान करू शकतो.

आजतरी चीन अधिक एक ह्या जागतिक धोरणाचा फायदा आपल्यासह व्हिएतनाम, बांगलादेश, थायलंड आदी राष्ट्रांना होत आहे.

पण चीन हा जगाचा पुरवठादार आहे व तेथील मालाच्या किमतीला उत्पादन करणे आजतरी भारताला (Economy of Scale नसल्यामुळे) अशक्य आहे.

हा विचार गुंतवणुकीसाठी शेअर निवडताना कच्च्या मालासाठी चीनवर अवलंबित्वकिती आहे हे बघत करायला हवा.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही, हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT