google search
google search esakal
साप्ताहिक

Google Search : गुगल सर्चची पंचविशी!

सकाळ डिजिटल टीम

एखादी गोष्ट माहीत नसेल तर ती आपण गुगलवर शोधतो. पण ती माहिती आपल्या डोक्यात साठवून ठेवण्याची मात्र तसदी घेत नाही. कारण पुन्हा जेव्हा ती माहिती आपल्याला हवी असेल तेव्हा ती गुगलवर सहज मिळेल, याची आपल्याला खात्री असते. यालाच म्हणतात ‘गुगल इफेक्ट’.

वैष्णवी करंजकर

गुगल २५ वर्षांचं झालं आहे. गेल्या २५ वर्षांमध्ये जग खूप बदललं, पण माणसाला वाटणारं कुतूहल मात्र कायम राहिलं. आणि या कुतूहलापोटीच आज गुगल माणसांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे.

अशा तंत्रज्ञानामुळे निश्चितच आपलं आयुष्य सुकर झालं आहे. पण कुतूहल शमवताना मानवी मेंदूलाही थोडा ताण दिला पाहिजे, याची जाणीवच गुगलने पंचविशीनिमित्त एका खास गेमच्या माध्यमातून आपल्याला करून दिली आहे.

गुगल माहीत नाही, असा माणूस कदाचित आज सापडणार नाही. आपल्या शंका-कुशंका सोडवण्यासाठी, हवी ती माहिती मिळवण्यासाठी गुगल जणू माहितीचा कल्पतरू ठरलेला आहे. आजपर्यंत आपण गुगलवर जाऊन तयार उत्तरं शोधत होतो.

पण आता या गुगलनं गुगली टाकत प्रश्‍न विचारणाऱ्यांच कोड्यात टाकलं आहे. गुगलला नुकतीच २५ वर्षं पूर्ण झाली आणि त्या निमित्तानं गुगलनं ‘मोस्ट सर्च्ड प्लेग्राउंड’ नावाचा एक गेम आणला आहे. ‘गेल्या २५ वर्षांत सर्वाधिक काय सर्च केलं गेलं?’ या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल, तर त्यासाठी आता आपल्याला हा गेम खेळावा लागणार आहे.

एरवी सगळ्या प्रश्नांची उत्तरं थेट देणाऱ्या गुगलनं यावेळी मात्र वापरकर्त्यांना डोक्याला ताण द्यायला भाग पाडलं आहे. रंगीत, छोट्या चित्रांच्या माध्यमातून गुगल आपण सर्च केलेल्या गोष्टी शोधण्याचं आव्हान घेऊन आलं आहे.

एका झटक्यात मलाही हे कोडं सुटलं नाही. तुम्हीही एकदा प्रयत्न करून पाहा, ‘मोस्ट सर्च्ड प्लेग्राउंड’ असं सर्च केलंत की हा गेम लगेच सापडेल.

या खेळाबरोबरच गेल्या २५ वर्षांत गुगलवर कोणकोणत्या गोष्टी सर्वाधिक सर्च करण्यात आल्या, याचा आढावा नुकताच गुगलनं घेतला आहे. त्याबद्दल तर आपण बोलूच पण गुगलच्या येण्यानं आपल्या आयुष्यात नक्की काय बदललं याचाही थोडक्यात आढावा घेऊया.

आपल्या आवडीचं एखादं गाणं कोणी गायलं आहे? इथपासून ते अगदी एखाद्या कोर्सच्या माहितीपर्यंत सर्वकाही या गुगलवर सापडतं. आपल्याला कोणत्याही विषयाची माहिती पुरवणारं गुगल गेल्या २५ वर्षांत आपल्यासोबतच अधिक माहितीपूर्ण झालं आहे.

जगभरातील सर्व माहिती एकाच व्यासपीठावरून संपूर्ण जगाला उपलब्ध करून देणं, या उद्देशानं सुरू झालेलं गुगल आज एक जागतिक एनसायक्लोपीडिया झालं आहे.

जगातल्या सर्व ग्रंथालयांमध्ये मिळून असलेल्या माहितीपेक्षाही जास्त माहिती गुगलवर आज उपलब्ध आहे, असा दावा गुगलचे आशिया पॅसिफिक प्रदेशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिमॉन केन यांनी २०१८मध्ये गुगलसाठी लिहिलेल्या द इव्होल्युशन ऑफ सर्च या लेखात केला आहे.

२०१५ ते २०१८ या तीन वर्षांच्या कालावधीत ‘Should I...’ (Should I drink tea in the morning?), ‘Best...’ (Best Hotel near me) अशा प्रकारच्या सर्चमध्ये ८० टक्क्यांनी वाढ झाल्याचंही या लेखात नमूद करण्यात आलं होतं.

काळानुसार प्रगत होणाऱ्या गुगलनं अनेक क्षेत्रांमध्ये आपले पंख पसरले आहेत. नव्या शहरांत, नव्या रस्त्यांवर गेल्यानंतर ‘गुगल मॅप’ न लावणारे अगदी बोटांवर मोजण्याइतकेच असतील.

यामध्येही गुगलनं काळानुरूप सुधारणा केल्या; ओव्हरब्रीज किंवा एखादी नदीसुद्धा गुगल मॅपमध्ये दिसते.

एवढंच नव्हे तर अमुक एका रस्त्यावर ट्रॅफिक किती आहे हेदेखील गुगल मॅपमध्ये पाहता येतं. त्याशिवाय आपण आता एखादा पत्ताही गुगलवर अपडेट करू शकतो किंवा चुकीचा रस्ता असेल तर अपडेट करू शकतो.

समजा, तुम्हाला एखाद्या अभिनेत्रीचा ड्रेस आवडला आणि तुम्हाला तो ड्रेस पाहायचा असेल, तर तुम्ही तो इंटरनेटवर शोधाल.

हे सर्च करताना तुम्हाला पूर्वी गुगलवरून केवळ निळ्या अक्षरांतील लिंक दिसत होत्या, फोटो दिसत नव्हता. पण ‘गुगल इमेजेस’ हे नवीन फिचर आणून गुगलनं फोटो शोधणंही अधिक सोईस्करच केलं आहे.

जगभरातल्या, देशभरातल्या बातम्याही गुगलनं आपल्याला एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘गुगल न्यूज’वर आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रातल्या, आपल्या भागातल्या, दूरच्या देशातल्या बातम्याही एका क्लिकवर वाचू शकतो.

किबोर्ड ते कॅमेरा

सन १९९८पासून गुगलने किबोर्ड ते कॅमेरा असा प्रवास केला आहे. ‘गुगल लेन्स’ वापरून सर्च करण्यासाठीचा एक नवा पर्याय आपल्याला मिळाला आहे.

समजा, समोर दिसणाऱ्या एखाद्या फुलाविषयी तुम्हाला माहिती हवी आहे. तर तुम्ही केवळ गुगल सर्चबारच्या शेजारी दिसणाऱ्या कॅमेऱ्याच्या पर्यायावर क्लिक करायचं आणि मोबाईलचा कॅमेरा फुलाकडे न्यायचा, तुम्हाला त्या फुलाविषयीची माहिती लगेचच मिळेल.

याहूनही पुढचं म्हणजे ज्यांना टाइप करता येत नाही, त्यांनाही गुगलनं आपल्यासोबत जोडलं आहे. ‘व्हॉइस सर्च’द्वारे.

सर्चबारवरील माईकवर क्लिक करून आपल्याला जे सर्च करायचं आहे ते गुगलला सांगितलं तरी तुम्हाला अपेक्षित माहिती समोर येते. त्यामुळे जुन्या पिढीतले, तंत्रज्ञानाशी फारसा परिचय नसलेले लोकही या तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहेत.

If someone says it’s raining and another person says it’s dry, it’s not your job to quote them both. Your job is to look out of the window and find out which is true.

पत्रकारितेचे प्राध्यापक जोनाथन फॉस्टर यांचं हे वाक्य फार प्रसिद्ध आहे. त्यांचं हे वाक्य केवळ पत्रकारितेलाच लागू होत नाही, तर ते सर्वसामान्य माणसांनाही लागू होतं, हे गुगलनं सिद्ध केलं आहे.

बाहेर पाऊस पडतोय की नाही, हे खिडकी उघडून पाहण्याचं माध्यम गुगलमुळे आज प्रत्येकाच्या हातात पोहोचलं आहे. आता तो पाऊस खरा आहे की कृत्रिम, याची मात्र प्रत्येकवेळी शाश्वती देता येत नाही. त्यासाठी सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करायला हवा.

नाण्याच्या दोन बाजू असतात. नाण्याची एक चांगली बाजू तर आपण पाहिली, पण आता नाण्याच्या दुसऱ्या आणि थोड्या नकारात्मक बाजूकडेही पाहायला हवं. या ठिकाणी ‘गुगल इफेक्ट’बद्दल जाणून घ्यायलाच हवं.

गुगलसारख्या सर्च इंजिनमुळे माहिती सहजपणे उपलब्ध होत आहे. त्यामुळे गोष्टी लक्षात ठेवण्याची माणसाची प्रवृत्ती हळूहळू कमी होऊ लागली आहे. एखादी गोष्ट माहीत नसेल तर ती आपण गुगलवर शोधतो.

पण ती माहिती आपल्या डोक्यात साठवून ठेवण्याची मात्र तसदी घेत नाही. कारण पुन्हा जेव्हा ती माहिती आपल्याला हवी असेल तेव्हा ती गुगलवर सहज मिळेल, याची आपल्याला खात्री असते. यालाच म्हणतात ‘गुगल इफेक्ट’.

थोड्याच कालावधीमध्ये गुगल आपल्या आयुष्यातला एवढा महत्त्वाचा भाग झाला, की २००६मध्ये ‘गुगल’ शब्दाचा समावेश ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये क्रियापद म्हणून करण्यात आला आहे.

डिसिजन लॅब या संशोधन संस्थेच्या संकेतस्थळावर याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यानुसार, काहीजणांचं म्हणणं आहे, की गुगल इफेक्ट हे आपण टेक्नोसॅव्ही होण्याचं लक्षण आहे.

पण यामुळे आपल्या संशोधनाची क्षमता सुधारल्याचे कोणतेही पुरावे अस्तित्वात नाहीत. दुसरी गंभीर बाब अशी, की ऑनलाइन उपलब्ध होणारी माहिती प्रत्येकवेळी आपण तपासतोच असं नाही.

अनेकदा आपण कोणतीही शहानिशा न करता ऑनलाइन पाहिलेल्या माहितीवर विश्वास ठेवतो आणि चुकीची माहिती पसरवण्याला हातभार लावतो.

गेल्या २५ वर्षांमध्ये जग खूप बदललं, पण माणसाला वाटणारं कुतूहल मात्र कायम राहिलं. आणि या कुतूहलापोटीच आज गुगल माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे.

असं तंत्रज्ञान निश्चितच आपलं आयुष्य सुकर करण्यासाठी निर्माण करण्यात आलं आहे. पण कुतूहल शमवताना मानवी मेंदूलाही थोडा ताण दिला पाहिजे, याची जाणीवच गुगलने या खास गेमच्या माध्यमातून आपल्याला करून दिली आहे.

--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : प्रचारसभांमध्ये ‘दोन शहजादे’, ‘मंगळसूत्र’, ‘मच्छी व मटण’, ‘भटकती आत्मा’चा बोलबाला

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Lok Sabha Election: निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार यांच्या जवळच्या उमेदवारावर का दाखल झाला गुन्हा?

T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT