diwali esakal
साप्ताहिक

दिवाळी अंक संपादकीय : सप्तपर्णीचा सांगावा

सकाळ साप्ताहिक दिवाळी अंक संपादकीय

माधव गोखले madhav.gokhale@esakal.com

पाऊसकाळ संपता संपता येण्या-जाण्याच्या सडकेकाठी अचानक सुगंधाचा लोट उसळू लागतो. जणू कुण्या यक्षानं घाईघाईत चालताना कमरेशी खोचलेली अत्तराची कुपीच सांडावी.

कुठून येतोय हा सुगंध?

इकडे तिकडे लक्ष जातं, तेव्हा कोपऱ्यातल्या झाडाच्या सावलीत फुलांचा सडा पडलेला दिसतो. चिमुकलं निमुळतं फूल. झाडावरल्या घोसांमधून आपली जागा सोडून जमिनीवर आलेलं. अशी कितीतरी फुलं...

तिथं, कोपऱ्यात सातविण उभी असते. वर्षभर तिच्याकडे कुणाचं लक्ष गेलेलं नसतं.

दिवसभर कुणाशी न बोलता कामाचे ढिगारे उपसणाऱ्या, घामेजलेल्या वैनीबाईसारखी असते ही सातविण. मळकटलेला, घामेजलेला पदर. रहाट शिंपून, भांडीकुंडी घासून हाताला घट्टे पडलेले, कपाळी गोंदण. थकून हसणारी प्रेमळ वैनीबाई.

ही सातविण म्हणजे सप्तपर्णीचा वृक्ष. सरळसोट, ताडमाड झाड असतं. उंचच उंच आणि गुमानगप्प. सात-आठ पानांचे गोलाकार गुच्छ. गडद हिरवे. जणू जत्रेत भिंगऱ्याफिरक्यांचं झाड खांद्यावर टाकून फिरणारा फेरीवालाच.

...पण या सातपानी सौंदर्याला चार चांद लागतात या दिवसात. नवरात्रीच्या रातींची खुमारी वाढते. हेमंत ऋतू नुकताच लागतो, तेव्हा सप्तपर्णी दिवाळीचा सांगावा आपल्या कानात सांगत असते. सप्तपर्णीच्या फुलांना सुगंधाचे घोस लटकले की समजावं- दिवाळी आली... आणि आता ती आलीच.

निसर्ग आपल्याशी सतत बोलत असतो. त्याची भाषाही अवघड नसते. ती कळण्यासाठी मन थोडं जागरूक ठेवलं की झालं. कारण या भाषेला शब्द आणि शब्दार्थ नाहीत. उद््गारचिन्हं नाहीत, आणि व्याकरणही नाही. सातविणीची भाषा हृदयाची असते.

जगण्याच्या कोलाहलात आसपासची झाडंझुडं निरखायला इथं वेळ कोणाला आहे? भरधाव वाहतुकीचे सिग्नल क्रॉस करत करत आपलं जगणं सुरू असतं. तिथं कोपऱ्यातली सातविण काय सांगतेय, कोण ऐकायला बसलंय?

सातविणीनंच आपल्याला जसा दिवाळीचा सांगावा सांगितला; तसाच, त्याच्या थोडं आधी तिनं, दिवाळीलाच ‘ये गं नक्की’ असं आर्जवानं सांगितलेलं असतं. सातविणीचं ऐकून खरंच दिवाळी येते...

दिवाळीसुद्धा कृषिसंस्कृतीतूनच आलेली. दोन हंगामांच्या बरोब्बर मध्ये येणारी. पावसकाळ संपून शेतशिवारानं हात दिलेला असतो. माहेराला येण्यासाठी सासुरवाशिणीला बैलगाडी पाठवण्याचे हे दिवस. पोरीला आणण्यासाठी बैलगाडीसोबत एखाददुसरा मुऱ्हाळी पाठवण्याची पद्धत होती एकेकाळी. मुऱ्हाळी पोरीला माहेरी न्यायला यायचा किंवा यायची. सातविणीचं झाड मुऱ्हाळीची भूमिका बजावत असतं. तिच्या सुगंधी पदराला धरूनच दीपावली माहेरी येते... आपल्या घरी!

या दिवाळीची किती किती रूपं असतात. शेतकऱ्याची दिवाळी, शिवारातल्या पिकाला लगडून येते. कामकऱ्याची दिवाळी खिशातल्या बोनसच्या रूपात येते. व्यावसायिकाची दिवाळी हिशेबाच्या खतावणीत मांडलेली असते. कलावंतांची दिवाळी कुंचल्यातून, लेखणीतून, पदन्यासातून, अभिनयातून प्रकटते. सामान्य जनलोक आपापल्या परीनं दिवाळीचं स्वागत करतात.

दिव्यांचा उत्सव हा... प्राचीन काळी या सणपर्वाला यक्षरात्री असं म्हणत असत. कुणी कौमुदीउत्सव, तर कुणी दीपरात्री म्हटलं. रामायणात तर उत्सवाला समाज असंच म्हटलंय. दिवाळीच्या कितीतरी कहाण्या आजही लोकप्रवाहात असतात. लोकगंगेच्या प्रवाहात सोडलेले हे संस्कृतीचे दिवे... दोन्ही तीरावरल्या वस्त्यांमध्ये उजेडाचे पर्व सुरू करून देत पुढे वाहत जाणारे.

संपूर्ण भारतवर्षात दिवाळी साजरी होते. विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीनं होते. पण सगळ्या परंपरांमध्ये एक समान दुवा आहे. – दिवा!

एरवी सामान्यतः देवघरात दिवा लागतोच. पण दीपावलीच्या पर्वात एकापेक्षा अधिक दिवे शक्यतो उजळावेत.

ऐपतीप्रमाणे दिवाळी होते साजरी. कुणी तुपाचे दिवे लावतं, कुणी तेलाचे. पण हे दिवे असतात सकारात्मकतेचे. जगण्याच्या भानगडीत जमा होत गेलेलं आम्ल नष्ट करून प्रत्येक जिवाला जीवनसन्मुख करणारा हा दिव्यांचा उत्सव. या आनंदपर्वात काय नाही? नातेबंधांची आर्द्रता आहे. बंधुभावाचा ओलावा आहे. आनंदाचा ठेवा वाटण्याचा उमदेपणा आहे. दिवली एकच असली तरी काळोखाचे राक्षस लीलया लोळवते, दीपावली तर उजेडाचे लखलखते पर्व घेऊन आली आहे.

...हे पर्व आपल्या आयुष्यात सातविणीसारख्या अबोल, सुगंधी वृक्षावलीनं सुरू करून दिलं, याची आठवण मात्र ठेवायची. कारण खूप घरांमध्ये आकाशदिवा लागत नाही. काळोख जाता जात नाही. तिथं आपल्या आपुलकीचा सुगंध पाठवायचा असतो, हाच तर सप्तपर्णीचा सांगावा आहे.

आपणा सर्वांना या प्रकाशउत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune NDA: पुण्यात 'एनडीए'मध्ये आठरा वर्षीय कॅडेटचा मृत्यू, नेमकं काय घडलं? पोलिसांनी व्यक्त केला संशय

IND vs WI 2nd Test Live : साई सुदर्शनचे शतक थोडक्यात हुकलं! पठ्ठ्याने यशस्वी जैस्वालसह नोंदवला भारी विक्रम, १९६१ नंतर घडला असा पराक्रम

School Viral Video : कोल्हापुरात निवासी शाळेत रॅगिंगचा प्रकार, लहान मुलांना लाथाबुक्क्या, बॅटने मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar: दिवाळीसाठी वस्त्र, दागिने, गृहसजावटींच्या दुकानांत तुफान गर्दी; बाजारपेठा उजळल्या

IPL 2026 पूर्वी मोठी बातमी! संजू सॅमसन जुन्या संघात परतणार?कर्णधारपदाची ऑफर; RR दोन फिरकीपटूंनाही रिलीज करणार

SCROLL FOR NEXT