खड्डे  eakal
साप्ताहिक

साहेब, आता आपल्या देशात खड्डे विकास महामंडळ सुरू होणे योग्य ठरेल बघा!

नकळतपणे शरीराच्या सर्व स्नायूंना, शिरांना, नसांना आणि रक्तवाहिन्यांना हवा असलेला आवश्यक तो व्यायाम होत होता. हे सारे घडत होते ते खड्ड्यांमुळे!

Shraddha Kolekar (श्रद्धा कोळेकर)

डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी

एकदा का खड्डे विकास महामंडळ झाले, की लग्नस्थानी बसलेल्या राहू-केतूचे मन प्रसन्न होऊ शकेल. ते शांत बसतील. ते जसे शांत बसतील तसे घराघरातील धडधाकट इसम वगळता आबालवृद्ध खड्ड्यांच्या भीतीपोटी घरीच बसतील. एकदा का कोणत्याही शहरातल्या बाजारपेठेत आबालवृद्धांचे येणे-जाणे कमी झाले, की गावोगावची गर्दी कमी होईल.

“साहेब, आता आपल्या देशात खड्डे विकास महामंडळ सुरू होणे योग्य ठरेल बघा!”

कालच हा अभिप्राय आमच्यासमोर व्यक्त करणारे आमचे मित्र यंकू मिस्त्री ह्यांना देशाची फार काळजी असते. काल ते आम्हाला भेटायला आले होते तेव्हा आमच्या गप्पा रंगल्या होत्या. आणि गप्पांचा विषय अलीकडच्या रस्त्यांच्या सद्यःस्थितीवर गेला तेव्हा त्यांनी वरील उद्‌गार काढले.

गप्पांच्या ओघात ते म्हणाले, “गुत्तेदार आणि इंजिनिअर ह्यांचा शृंगार रंगला की खड्ड्यांचा जन्म होतो. ही नैतिक संतती असते.”

मग त्यांनी आपला मुद्दा आणखी स्पष्ट केला, “कोणताही रस्ता अतिशय दर्जेदार तयार करणे, तो रस्ता पुढे एखादं वर्ष खड्डेविरहित राहावा म्हणून योग्य असे वाळू-सिमेंट-खडी आणि डांबर ह्यांचे नेमके मिश्रण वापरणे हे फारच चुकीचे असते. ह्यामागचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत जो तो अतिशय वेगात गाडी चालवत असल्याने ॲक्सिडेंटची शक्यता शंभर पटीने वाढली आहे.

ही अतिघाई संकटाला आमंत्रण देणारी असल्याने रस्ता बनवताना, वाळू-खडीचे प्रमाण नव्वद टक्के ठेवून प्रत्येक गुत्तेदार दहा टक्के डांबर वापरतो.

एकदा का नव्या तयार रस्त्याला अल्पावधीतच पहिला खड्डा पडला, की तिथे साक्षीला म्हणून धूळ अवतरते. कोणतीही वेगात येणारी गाडी खड्ड्यात गेली की ती धूळ सोबत येते, वाहन चालकाच्या अंगाखांद्यावर बागडते.

गावातील रस्ते तर आवर्जून ‘जास्त खड्डे -व्यग्र रस्ते’ ह्या सूत्रानुसार निर्माण करणारे कुशल गुत्तेदार बघितले, की मन थुई थुई नाचू लागते. अशा रस्त्यांचे काम पूर्ण झाले अशी तपासणी करून त्या रस्त्यांचे संपूर्ण बिल देणारे अभियंते म्हणजे देशाचे हिरे असतात.

या हिऱ्याला कोंदण म्हणजे आजही देशातील बहुतांश जनतेकडे दुचाकी नसल्याने ही मंडळी रस्त्यावरच चालत असतात. ह्या जनतेच्या जीविताची काळजी घेणे ही राष्ट्रीय जबाबदारी असतेच की!

गाडीधारक वाहन चालक हे भाग्यवान असतात कारण,

ज्याच्या नशिबी खड्डे

त्याचा रोजच बर्थ डे,

असे म्हणता येते. घडते काय की समोरासमोर येणाऱ्या दोन वाहन चालकांच्या नशिबी जेव्हा रस्त्यावरचे अनंत बहुगुणी खड्डे येतात तेव्हा त्यांना चुकवताना कोणत्याही वाहनचालकाला राँग साईडला जावेच लागते, त्याचवेळेस समोरून येणारा वाहनधारक ह्याला चुकवावे म्हणून रस्त्याखाली उतरतो आणि धुळीचे लोट उडवून देतो.

‘वाचलो बाबा’ म्हणून हा सुस्कारा सोडतो. हा त्याचा लाक्षणिक पुनर्जन्म असतो. अर्थात तोच त्याचा बर्थ डे समजता येतो.”

यंकू मिस्त्री यांचे हे अभ्यासपूर्ण विवेचन ऐकून आम्ही समाधानी होत होतो, त्यांना प्रोत्साहन म्हणून आम्ही म्हणालो, “भाऊ,तुमचे बोलणे रास्त आहे. पण अलीकडे गावोगावच्या गल्ल्यांतील खड्डे फारच वाढलेत हो! साधी गाडीही चालवणे म्हणजे अतिशय जिकिरीचे झालेय!”

आमचे हे दुःख ऐकून त्यावर प्रतिवाद करत यंकू मिस्त्री बोलले, “साहेब, तुमच्यासारख्या एज्युकेटेड माणसाचे अज्ञान आम्हा अडाणी माणसाला लई दुःख देते बघा.

आज साऱ्या जगात मंदी आहे, आपल्या देशात तर मंदीसोबत आयात वाढल्याने फॉरेन करन्सी कमी होऊ लागलीय आणि त्या करन्सीचा मोठा भाग पेट्रोल, डिझेल आयातीत चाललाय. तेव्हा प्रत्येकाने घरची गाडी बंद ठेवून सार्वजनिक वाहन वापरणे ही काळाची गरज आहे.

महत्त्वाचे म्हणजे ऐंशी टक्के जनता चालणे विसरून गेल्याने लठ्ठपणा, ब्लड प्रेशर, डायबेटीस अशा आजारांनी त्रस्त आहे. रस्त्यावरचे वाढते खड्डेच ह्या समस्यांवर उत्तर असून तुम्ही तुमच्या गाडीला घरी ठेवा, वाटले तर विकून टाका आणि दिवसभरात पाच-सहा किलोमीटर चालून घरची सर्व कामे करा!”

यंकू मिस्त्री खरेच बोलताहेत ह्याची आम्हाला खाड्कन जाणीव झाली आणि आम्ही त्यांना म्हणालो, “डोळे उघडले बघा आता! आजपासून आम्ही तुमचेच ऐकणार. पण ते तुम्ही म्हणालेले खड्डे विकास महामंडळ कसे स्थापन होईल हो?”

आमच्या प्रश्नावर मनमोकळे हसत यंकू मिस्त्री म्हणाले, “काही नाही भाऊ, रस्ते निर्मितीचे काम गव्हरमेण्टने बंद करून जो कोणी घर बांधेल किंवा दुकान बांधेल त्याचा रस्ता त्याने निर्माण करावा एवढा आदेश एकदा का काढला की आपोआपच ज्याचे त्याचे रस्ते होतील आणि त्या त्या व्यक्तिगत रस्त्यामधल्या जागेत आपोआपच खड्डे निर्माण होत जातील, त्यांची जबाबदारी म्हणून तेव्हा हे महामंडळ स्थापित करावे लागेल बघा!”

यंकू मिस्त्री निघून गेले आणि आम्ही विचारात पडलो. मग हे विचारचक्र थांबवावे असे मनाशी ठरवले. त्यासाठी थोडावेळ घराबाहेर फिरून यावे, असेही ठरवले आणि घराबाहेर पडलो.

घराबाहेर चार पावले जातो न जातो तोच आम्हाला रस्त्यात कविराज जोशी भेटले. कविराज जोशी म्हणजे आमचे सख्खे शेजारी आणि उत्स्फूर्त कवी. त्यांना आम्ही यंकू मिस्त्रीची खड्डे विकास महामंडळाची कल्पना जेव्हा सांगितली तेव्हा त्यांनी क्षणार्धात उत्स्फूर्तपणे त्यांना सुचलेले एक काव्य ऐकवले.

माझ्या घरासमोरचा रस्ता...

त्याला खड्ड्याचे कोंदण,

जणू पळत्या वाहनासी...

असे वेगाचे बंधन !

उभ्या उभ्या झालेल्या या भेटीत खड्ड्यावरील हे उत्स्फूर्त काव्य ऐकून आमची पावलं तृप्त होऊन गेली.

आम्ही आमच्या घरापासून पुढे पुढे चालणे सुरू केले आणि आमच्या कॉलनीतील बंगलेधारी असलेल्या डॉक्टर शास्त्री ह्यांच्या बंगल्याजवळ पोहोचलो. डॉक्टर शास्त्री घराबाहेर फाटकाजवळच उभे होते आणि थोडे विचारग्रस्त वाटत होते.

“नमस्कार डॉक्टरसाहेब,” आम्ही म्हणालो. त्यांनी आमच्याकडे बघितले, “नमस्कार, नमस्कार,” असे त्यांनीही प्रत्युत्तर दिले. संवाद वाढवित आम्ही पुढे म्हणालो, “काय सर ,आज निवांत दिसताय, क्लिनिककडे अजून निघाला नाही वाटतं?”

आमच्या या खबरबातीच्या पृच्छेवर ते उतरले, “क्लिनिककडेच जायचेय. पण कालच फाटकासमोर असलेल्या ड्रेनेजच्या चेंबर आणि पाईपचे काम केलेय. ते काम भुसभुशीत असेल अशी शंका मनात आहे कारण आताच त्यावरून एक मोटरसायकल गेली तेव्हा ती जागा खचलीय.

आता कार काढताना त्यावरून गेली तर आत पाईप तडकतील ही शंका वाटतेय. न जाणो तसे घडले आणि आणि हे ड्रेनेजचे नवे काम फुटले तर मोठा खड्डा होईल, त्यात घाण साचणे सुरू होईल ही भीती आहे.

काहीही म्हणा, एकदा शरीरात मूळव्याध आली की ती जशी कधीच जात नसते फक्त कमी जास्त होते तसेच या खड्ड्यांचे असते बघा. एकदा का नव्या रस्त्याला खड्डा पडला की तसे खूप खड्डे पडणे सुरू होते.

कधी ते दुरुस्ती म्हणून कमी केले जातात, पण त्याचवेळेस ते दुसरीकडे उद्‌भवतात. अंगावरची खाज आणि रस्त्यावरचे खड्डे कुठेही उद्‌भवतात ह्याची मात्र खात्री देता येते.”

खड्डे आणि आजार ह्यांचे अद्वैत ऐकून आम्ही पुण्यप्राप्त करते झालो. डॉक्टरांचा निरोप घेत पुढे निघालो.

आमच्या कॉलनीतच पुढे जात असताना आमची चाल मंद झाली होती कारण छोट्या-मोठ्या खड्ड्यांची पिल्लावळ ‘जपून टाक पाऊल जरा’ असंच सुचवत होती.

थोडेसे जरी पाऊल वाकडे पडले तर ते पडते पाऊल गावामध्ये, ‘आम्ही कसे पडलो?’ या कुजबुजीला जन्म देणारे ठरेल, असेही खड्ड्यांची ती पिल्लावळ सुचवीत होती.

चार बंगले आम्ही पुढे चाललो आणि एलके बुवांचे घर समोर आले. एलके बुवा म्हणजे ज्योतिष्यविद्येसह बहुविषयातील व्यासंगी व्यक्ती!

आम्ही एलके बुवांच्या घरात प्रवेशलो. बुवांना नमस्कार करून म्हणालो, “सहज म्हणूनच आलो!” बुवा ‘बसा’ म्हणाले, प्रसन्न हसले. विषयाची सुरुवात करताना आम्ही त्यांना थेट सांगितले, की आज आम्ही फार आगळीच कल्पना ऐकलीय!

“कुणाकडून काय ऐकलं तुम्ही ?” आमच्या बोलण्यावर त्यांनी विचारणा केली. त्यावर आम्ही यंकू मिस्त्रीने आम्हाला सांगितलेली खड्डे विकास महामंडळाची कल्पना त्यांना सांगितली. तेव्हा तेही गडगडाट करत हसले आणि म्हणाले, “अहो गेली तीन दशके मी हेच म्हणतोय की जोपर्यंत खड्डे निर्मितीची मोहीम या देशात चालू होणार नाही, तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती होणार नाही.

याचे कारण असे आहे, की आपल्या देशाच्या कुंडलीच्या लग्नस्थानी राहू आणि केतू बसलेले असून ते दुःस्थिती असेल तरच शांत बसतात. सुस्थिती आणण्याचा प्रयत्न केला की ते उलटे चालतात. एकदा का खड्डे विकास महामंडळ झाले, की त्यांचे मन प्रसन्न होऊ शकेल. ते शांत बसतील.

ते जसे शांत बसतील तसे घराघरातील धडधाकट इसम वगळता आबालवृद्ध खड्ड्यांच्या भीतीपोटी घरीच बसतील. एकदा का कोणत्याही शहरातल्या बाजारपेठेत आबालवृद्धांचे येणे-जाणे कमी झाले की गावोगावची गर्दी कमी होईल.

खड्ड्यांमुळे सदैव धुळीचे लोट आसमंतात राहिल्याने ही धडधाकट मंडळीसुद्धा डोळे वगळता सारे अंग झाकूनच बाहेर पडतील. त्यामुळे हळूहळू समाजाची वाटचाल नैतिकतेकडे सुरू होईल.

सौंदर्यप्रसाधनांवर व्यर्थ खर्च होणेसुद्धा टळेल. हे निश्चितच घडणार आहे आणि दुसरीकडे सर्वत्र असलेल्या खड्ड्यांवरून वाहन नेताना कमरेला, मानेला, पाठीवर झटके बसण्याची शक्यता वाढल्यामुळे बहुतांशजण ‘आपण आणि आपले पाय’ यावर विश्वास ठेवूनच पादचारी म्हणून मार्गक्रमण करतील.

यामुळे यंकू मिस्त्रींना जी कल्पना सुचली ती जागतिक स्तरावर राबवली गेली पाहिजे, असे आमचे मत आहे.’’ यंकू मिस्त्रीची कल्पना एलकेबुवांसारख्या प्रगल्भ व्यक्तिमत्वालाही मान्य आहे, हे जाणून आम्ही अवाक् झालो. एलकेंचा निरोप घेऊन आम्ही कॉलनीच्या गेटकडे निघालो. तेव्हाही आमची पावले मंद मंदच पडत होती.

कॉलनीच्या गेटजवळील बाजूला आम्ही पोहोचलो तेव्हा पाण्याचा टँकरवाला नारायण तिथे टँकरसह उभा होता. नारायणाने आम्हाला नमस्कार केला. ‘राम राम साहेब’. प्रत्युत्तर म्हणून काहीतरी बोलावे म्हणून आम्ही चौकशी केली, “काय नारायणराव, टँकरचा धंदा जोरात आहे वाटतं.

आज सकाळी सकाळी गेटवर कसे काय ?” तेव्हा नारायण म्हणाला, “साहेब, आजकाल घराघराच्या समोरचे रस्ते उखडलेले असल्याने सारखी धूळ होते. तुमच्या वार्डाची धूळ पाण्याने दबावी म्हणून आम्हाला महिनाभर इथे पाणी मारायला सांगितलं आहे!”

नारायणचे उत्तर ऐकून आम्हाला समाधान वाटले. त्याच वेळेस आठवले की अनेक वेळा महामार्गाचे काम चालू असताना तिथून जाण्याचा योग जेव्हा येतो तेव्हा जिथे जिथे जुने रस्ते उखडलेले असतात तिथे गुत्तेदार पाणी मारून ठेवतो, कारण वेगवेगळ्या वाहनांमुळे उडणारी धूळ पाण्यामुळे तिथल्या तिथे थोपवता येते हे त्यामागचे गृहीतक असते.

खरे तर याला रस्त्यावर ‘सडा घालणे’ म्हणायला काय हरकत आहे? तसेच काही तुलनात्मक पाहिले तर गावोगावी खड्ड्यांचा विकास झाल्याने आपापल्या घराच्या परिसरातील धूळ दबावी म्हणून आपापल्या घरासमोर सडा घालण्याची सवय अनेक गृहिणींनी नव्याने लावलेली बघायला मिळत आहेच म्हणा!

हे म्हणजे आपल्या भूभागाचे लुप्त होत चाललेले सांस्कृतिक वैभव पुन्हा उर्जितावस्थेत येत असल्याचे बघायला मिळण्याचा सुयोग नव्हे काय?

मनात येणारे विचार घोळवतच आम्ही आमच्या कॉलनीसमोर असलेल्या अमृततुल्य टी हाऊसमध्ये जाऊन बसलो. मालकांना नमस्कार केला.

मालक जरा टेबल पुसून घ्या अशी त्यांना विनंती केली. त्यांनी वेटरला आज्ञा केली, “अरे साहेबांचा टेबल पुसून घे!” आणि म्हणाले, “धुळीचा फार त्रास व्हायलाय हो.”

“चालायचंच, चालायचंच!,” आम्ही उतरलो आणि एका चहाची ऑर्डर दिली. हॉटेलात त्यावेळी विशेष गिऱ्हाईक नसल्यामुळे हॉटेलमालक पवार आमच्यासमोर येऊन बसले. म्हणाले, “हे आयुष्यभर असे रस्ते बघताना एक शंका येतेय बघा साहेब!”

“काय शंका हो?” आम्ही विचारले तेव्हा ते म्हणाले की हे गुत्तेदार आणि इएनटी सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन यांचं काही साटेलोटे असेल का हो? कितीदाही रस्त्याचं काम केलं तरी ते रस्ते सहा महिने चांगले राहतात नंतर तेच खड्डे परत दिसायला सुरू होतात बघा. हे काय असेल?”

आम्ही म्हणालो, “अहो, हे सगळे पर्यावरणप्रेमी आहेत. नदी पात्रातली वाळू संपू नये म्हणून कमी वाळू टाकून कोणतेही बांधकाम करण्याची सवय गुत्तेदारांनी स्वतःहून लावून घेतली आहे.

घरोघरीची पोरं वेगवेगळे क्लासेस लावून अतिखर्चिक मार्गाने जेव्हा डॉक्टर होत आहेत तेव्हा त्यांचा व्यवसाय भरभराटीलाच असावा म्हणून जे जे आजार, ज्या ज्या कारणांनी होऊ शकतात ती कारणं वाढली पाहिजेत अशी खबरदारी समाज घेतच असतो.

तुमचेच पाहा ना, तुम्ही चांगले तेल का वापरत नाही? तुम्हाला नकळत हे माहीत आहे की तेलामुळे घसा खवखवेल, असा घसा सर्दी -खोकला- ताप देईल, ती लक्षणे घेऊन आपले गिऱ्हाईक कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे गेलेच पाहिजे म्हणून हॉटेलमध्ये तुम्ही त्यांची काळजी घेता. हॉटेलबाहेर गुत्तेदार त्यांची काळजी घेतात.

हे सामान्य सूत्र आहे. परस्पर जीवनाची जी साखळी आहे त्याप्रमाणे आपण जगत असतो. खरे तर शहरातील रस्ते एखाद्या गुत्तेदाराने केले की त्याला पुढे दहा वर्षाचं दुरुस्तीचे बंधन टाकले तरच तो खड्डे न होण्याची खबरदारी घेऊ शकेल. त्याला आपण असे बंधन टाकू शकत नाही.

त्यामुळे त्याला नाइलाजाने खड्डेविकासाची जबाबदारी घ्यावी लागते. हे साहजिक आहे. सामुदायिक समस्यांची तुम्ही कधीही काळजी करत जाऊ नका, याचे कारण म्हणजे माणसाच्या मेंदूत रिकामपण भरलेले असते, फुप्फुसात धूळ भरलेली असते, त्याचे हृदय पाषाणहृदय असते, किडनी आणि लिव्हरचे फिल्टर कुठल्याही प्रकारचे पाणी पचवून दणदणीत असते.

हे असे असते म्हणूनच त्याला अंगदुखी, धुळीची अॅलर्जी, फ्रॅक्चर असे आजार त्यानी आजारपणाचा आनंद द्यावा म्हणून कृत्रिमरित्या द्यावे लागतात, त्यासाठी ही सोय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजकालची मुलं कोणतीही दुचाकी जोरात चालवतात. त्यांनी कधीही ती हळूच चालवावी म्हणूनही ही योजना केली गेली असावी असे आम्हाला वाटते... !”

आमचे अभिनव विचार ऐकून हॉटेल मालक असलेले आमचे मित्र प्रसन्न झाले. आपल्या देशाला खड्ड्यांची नितांत गरज असल्याची त्यांना नव्याने जाणीव झाली.

या जाणिवेने त्यांना आनंद झाला. हर्षभरित अवस्थेत ते आम्हाला म्हणाले, “डोळे उघडले साहेब तुम्ही! इतके दिवस आम्ही चुकीची समजूत करून घेतली होती की रस्त्याची निर्मिती करताना कमी दर्जाचे मटेरियल वापरून रस्त्यांचे काम केले जाते, त्यामुळे खड्डे होतात.

पण खड्ड्यांची एवढी मोठी गरज जेव्हा आपल्या सर्वांना आहे आणि ती गरज पूर्ण करण्याचे काम हे सगळे लोक करतात त्याचा फार आनंद झाला. आता रस्ता बनवणारा जो कोणी माझ्याकडे चहा प्यायला येईल त्याला आजपासून आम्ही फुकटच चहा पाजू , हा तुम्हाला शब्द देतो बघा!”.

खड्ड्यांची गरज आणि महत्त्व आपण व्यवस्थितपणे एखाद्याला समजावू शकलो याचा आम्हालाही आनंद झाला. खरे पाहता यंकू मिस्त्रीमुळे आमच्या प्रगल्भ मेंदूमध्ये नव्याने वैचारिक सळसळ सुरू झाली होती. ते आम्ही स्वतःशी मान्य केले.

हॉटेल मालकांचा निरोप घेतला आणि पुनःश्च घराकडे निघालो. नाही तरी अलीकडच्या काळात कोणाच्याही घरी कोणीही गेले तर हातचा मोबाईल आणि डोळ्यासमोरचा टीव्ही मनमोकळे बोलणे होऊ देत नसल्याने आम्ही घरीच एकांत जपणे सुरू केले आहे. घराकडे परतताना आम्ही अतिशय सावकाश चालत होतो.

खड्ड्यांच्या आजूबाजूला पसरलेली खडी, गोटे आणि दगडे यांना चुकवत, पाय न लचकवू देता नवशिक्या कसरतपट्टू प्रमाणे पदन्यास करत होतो. आमच्या पायाचे स्नायू,शिरा, रक्तवाहिन्या हे सारे अंतर्गत बंध एका लयीत चालण्याला साथ देत होते.

आमची आम्हालाच आमची चाल डौलदार वाटत होती. चालता चालता तोल सावरताना आमचे हात लहानपणी पिटी केल्यासारखे खालीवर होत होते. नकळतपणे शरीराच्या सर्व स्नायूंना, शिरांना, नसांना आणि रक्तवाहिन्यांना हवा असलेला आवश्यक तो व्यायाम होत होता. हे सारे घडत होते ते खड्ड्यांमुळे!

खड्ड्यांचे हे अतिशय महत्त्वाचे मोल विसरून कसे चालेल? दीर्घायुष्यासाठी खड्ड्यांचा विकास झालाच पाहिजे असा सिद्धांत आम्हाला सुचला आणि आम्हीही हळूहळू चालता चालता स्वतःशी म्हणालो, “खड्डे विकास महामंडळाची स्थापना झालीच पाहिजे!”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Delay India : मान्सूनचा केरळमधील प्रवास लांबला, महाराष्ट्रातही उशिरा आगमन? हवामान विभागाचा नवा अंदाज समोर

Akola: दारु दुकानाला NOC देण्यासाठी मागितले १ लाख, तडजोडीनंतर ६० हजाराची लाच घेताना ग्रामसेवकासह लिपीकाला अटक

पेट्रोल- डिझेल नंतर आता सोनेही महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Wardha News: बदलीसाठी २० हजारांची मागणी; वर्धेच्या वरिष्ठ लिपीकावर एसीबीची कारवाई

Mumbai: देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात जमिनीसारखाच पाण्याचाही सातबारा; महसूल विभागाचा निर्णय

SCROLL FOR NEXT