fukatche salle book
fukatche salle book  esakal
साप्ताहिक

Book Review : मनाला भावलेले 'फुकटचे सल्ले'!

सकाळ डिजिटल टीम

स्वतःवर विनोद करण्यासाठी स्वतःचे सगळे अभिनिवेश बाजूला सारून स्वतःकडे फार तटस्थपणे पाहावे लागते. आपल्या जगण्याकडे, जगण्यातल्या विसंगती, फजितीकडे किंवा स्वतःच्या आयुष्यात डोकावून त्यातला विनोद उभारत, तो असा जाहीर करण्यासाठी एक लेखकीय निष्ठा असावी लागते.

ऋषिकेश देशमुख

डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी लिखित फुकटचेच सल्ले पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेपासून सुरू होणारा विनोद पुढे पुस्तकभर म्हणजे पंधरा लेखांमधून वाचकांना अल्हाददायक, चित्तप्रवृत्ती प्रसन्न करणारी अनुभूती देणारा आहे. कुठलीही पुनरावृत्ती न होता हा विनोद अनुभवता येतो.

डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी गेल्या दोन ते अडीच दशकांपासून विनोदी ललित लेखन अत्यंत निष्ठने करीत आलेले आहेत.

त्यांच्या विनोदाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या प्रत्येक पुस्तकातील विनोद ताजा-टवटवीत तर आहेच, आणि तो विनोद अभिजात दर्जा प्राप्त करणारा आहे.

गिरकी, उसंतवाणी, थट्टा-मस्करी, पत्नीपुराण ते नुकतेच मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले फुकटचेच सल्ले हे पुस्तक वाचल्यानंतर ह्या समूहलक्षी विनोदाच्या बहुआयामी विलक्षणतेची प्रचिती वाचकाला येत राहते.

विनोदी लेखन करत असताना विनोदाची पुनरावृत्ती होण्याचा धोका असतो. मात्र डॉ. तांबोळी यांच्या लेखनात ते अजिबात होत नाही. लेखक म्हणून विनोदाच्या गांभीर्याची जाणीव त्यांना आहे.

आपले लिहिणे, आपल्या विनोदाचे गांभीर्य लक्षात आल्यानंतरही त्या विनोदाचा स्तर उत्तरोत्तर वृद्धिंगत ठेवण्यासाठी ते घेत असलेली मेहनत यासाठीच मोलाची आहे हे सगळ्यात आधी मान्य करावे लागते.

डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी हे आपल्या समूहलक्षी विनोदाचा एक स्वतंत्र बाज मराठी साहित्यात ठळकपणे उमटवणारे अत्यंत महत्त्वपूर्ण विनोदी लेखक आहेत.

त्यांच्या लेखनाचा दर्जा चिं.वि. जोशी, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, शंकर पाटील व द.मा. मिरासदार यांच्या समृद्ध विनोदी लेखनाची परंपरा व वारसा वर्धिष्णू करणारा आहे.

निसर्गतः अनेक गोष्टी आपल्याला फुकटच मिळालेल्या असतात, मात्र त्याची जाणीव आपण ठेवत नाही. सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी फुकट आहेत, पण आपल्या वागण्यामुळे ते दूषित होऊ लागले.

फुकट असणारे पाणी जेव्हा मिनरल वाटर होते, तेव्हा मात्र त्याला किंमत मोजावी लागते. फुकट असणारी हवा जेव्हा ऑक्सिजन सिलेंडरमध्ये येते तेव्हा बहुमोल होते. तसे हे फुकट असणारे सल्लेही मोलाचे आहेत.

तसे हे फुकट असणारे सल्ले मोलाचे आहेत पण त्याचे महत्त्व कमी होऊ नये म्हणून मनोविकास प्रकाशनाने ते माफक दरात उपलब्ध करून दिले आहेत.

(विनोदी लेखकाच्या पुस्तकावर लिहीत असताना आपणही एखादा विनोद करावा ही इच्छा खरंतर त्या विनोदाची आपल्यावर असणाऱ्या प्रभावाची निदर्शकच म्हणावी लागेल.)

समाज गतिशील असतो. या गतिशील काळाशी आपली स्पर्धा अविरतपणे सुरूच असते. या स्पर्धेत काही विसंगती निर्माण होते, अर्थात ती अपरिहार्यपणे निर्माण होते, आणि या अशाच सामाजिक विसंगतीच्या मर्मावर बोट ठेवणारा पण भाषेचा दर्जा अबाधित ठेवणारा अत्यंत तरल विनोद लिहिणे हे डॉ. तांबोळी यांच्या विनोदी लेखनाचे अत्यंत महत्त्वपूर्ण व अपवादाद्‍भुत वैशिष्ट्य आहे.

विनोदाचे उगमस्थान कधीकधी कारुण्यात असते. कारुण्यातून उगम पावणारा विनोद मनाला शीतलता प्रदान करतो.

अस्सल नि दर्जेदार विनोदात चिंतनाची अपार खोली समाविष्ट असते ही साक्ष डॉ. तांबोळी यांचे लेखन वाचताना पटते. फुकटचेच सल्ले या ललित विनोदाचे पोत आणि पदर असे बहुमितीय परिप्रेक्ष्यात समजून घ्यावे लागतात.

फुकटचेच सल्लेच्या अर्पणत्रिकेपासून सुरू होणार विनोद पुढे पुस्तकभर म्हणजे पंधरा लेखांमधून वाचकांना अल्हाददायक अनुभुती देणारा, चित्तप्रवृत्ती प्रसन्न करणारा आहे. कुठलीही पुनरावृत्ती न होताहा विनोद अनुभवता येतो.

हळूच आपल्या गालावरून मोरपीस फिरवल्याने चेहऱ्यावर येणारे स्मित ते काही सल्ले वाचून होणारा हास्याचा स्फोट, हे या विनोदाचे मोठे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल.

`आमची अविरत प्रेमप्रकरणे’ ह्या पहिल्याच लेखातून मानवी आयुष्यात प्रेमप्रकरणाची असणारी अनिवार ओढ, त्यासाठी सतत तळमळत असणारे मन ‘उमर पचपन की दिल बचपन का’ ह्या म्हणीचा प्रत्यय घेत पौगंडावस्थेपासून ते पिकलेल्या वयातही मनाचा एक कप्पा मात्र हिरवागार ठेवण्यासाठी धडपडत राहणारी मनाची अवस्था विनोदाच्या बहुपदरी कोलाजातून अनुभवता येते. अविरत विफलता पदरी पडत असताना होणारी फजिती वाचनीय झालेली आहे.

या विनोदाचे बहुविषय, त्यांची संदर्भबहुलता पाहता लेखकाची बहुश्रुतता, निरीक्षण क्षमता आणि प्रसंगांमधील विसंगती शोधणारी चिकित्सकता आणि संवेदनशीलता या सगळ्यांचा मिलाफ ओतप्रोत भरलेला जाणवतो.

या पुस्तकातील विनोद लेखकाच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारलेले आहेत. स्वतःवर विनोद करण्यासाठी स्वतःचे सगळे अभिनिवेश बाजूला सारून स्वतःकडे फार तटस्थपणे पाहावे लागते. आपल्या जगण्याकडे, जगण्यातल्या विसंगती, फजितीकडे किंवा स्वतःच्या आयुष्यात डोकावून त्यातला विनोद उभारत, तो असा जाहीर करण्यासाठी एक लेखकीय निष्ठा असावी लागते.

ती डॉ. तांबोळी यांच्याकडे आहे हे निश्चितपणे म्हणता येते. ‘आमचे आत्मस्तुतीचे प्रयोग’, ‘आमची प्रातःस्मरणीय बनण्याची कहाणी’, ‘मी कसाबसा काहीही झालो’ किंवा ‘आमचा संवाद आमच्या ‘वापोशी’ हे लेख वाचत असताना आत्मपर विनोदाची प्रचिती येत राहते.

‘आमचा संवाद आमच्या ‘वापोशी’... म्हणजे वाढलेल्या पोटाशी संवाद ही कल्पनाच अद्‍भुतरम्य आहे.

‘साठोत्तरी अर्धशतकातील बिचारे ‘रा.गे.’ कवी...’ हे शीर्षक वाचून हे रा.गे. कवी कोण असा प्रश्न पडतो, पण ते सर्व ‘राहून गेलेले’ कवी आहेत हे वाचून मात्र हास्याचा स्फोट झाल्याशिवाय राहत नाही. हा एक संशोधन लेख आहे, असे लेखकाने म्हटलेच आहे.

विभागवार, जिल्हावार अशी यांची काटेकोर मांडणी केलेली आहे. राहून गेलेल्या कवींबद्दलची निरीक्षणे फार मार्मिक स्वरूपाची आहेत. पु.ल. देशपांडे यांनी मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास लिहिला, तर त्याच विडंबनात्मक शैलीत डॉ. तांबोळी यांनी ‘मराठी वाङ्मयाचा वाढीव इतिहास’ लिहिलेला आहे.

‘चला होऊ भ्रष्टाचारी’ आणि ‘मास्कधारिणी, चित्तहरिणी’ हे लेख आवर्जून पुन्हा पुन्हा वाचायला हवेत. डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी यांचे विनोद हे मानवी जीवनातील शाश्वत अशा वृत्ती-प्रवृत्तींवर भाष्य करणारे आहेत, त्यामुळे ते मानवी अस्तित्वापर्यंत चिरंतन ठरतील.

कारण काळ बदलतो तसा माणूसही बदलतो, मात्र मानवाच्या वृत्ती-प्रवृत्ती बदलत नाहीत. त्या वृत्ती-प्रवृत्तींवरच असणारे हे मार्मिक भाष्य सूक्ष्म अशा मानवी वर्तनव्यवहाराची चिकित्सा करणारे व मनोरंजनासह आत्मचिकित्सेला प्रवृत्त करणारे आहे.

ह्या विनोदाचे अंतःसूत्र हे जगण्याच्या भंपकपणाला, ढोंगीपणाला व विसंगत वर्तनाला वेशीवर टांगणे आहे.

फुकटचेच सल्लेतल्या लेखांची भाषा अत्यंत ओघवती, प्रवाही नि प्रभावी आहे. निवेदनात कमालीची अर्थवाहकता असल्यामुळे वाचक खिळून राहतात. लेखकाने वाचकांची अभिरुची संपन्न करणाऱ्या काही नवीन शब्दांची भर या ललितलेखनात जागोजागी घातली आहे.

डॉ. तांबोळी यांच्या विनोदाची पेरणी हसायला भाग पाडत असली, तरी अंतर्मुख करण्याची क्षमताही ठेवून आहे.

म्हणी, वाक्प्रचार यांचे केलेले नूतनीकरण, कवितांचे विडंबन, त्यातून निर्माण केलेली दृश्यात्मकता लेखकाच्या भाषिक अवकाशाची प्रचिती देणारे ठरते.

एकूण मानवी जगण्यातली सारी विसंगती, विरोधाभास आपल्या कलात्मक, विडंबनात्मक व उपहासात्मक शैलीने डॉ. तांबोळी यांनी चव्हाट्यावर आणली आहे.

गिरीश सहस्रबुद्धे यांनी मुखपृष्ठावरील व आतील चित्रे अत्यंत समर्पक चितारलेली आहेत. मनोविकास प्रकाशनाने हे पुस्तक अत्यंत देखण्या स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे.

अर्पणपत्रिकेच्या खाली एक छोटी विशेष सूचना दिली आहे, ‘या पुस्तकात कुठलाही फुकटचा सल्ला न आढळल्यास भरपाई म्हणून भविष्यात मोफत मार्गदर्शन करण्याची हमी देण्यात येत आहे.’

खरेतर ही सूचना फोल ठरेल आणि आयुष्यभर मोफत सल्ले घेता येतील हा हेतू होता, मात्र यात अनेक फुकटचेच सल्ले भरून राहिलेले आहेत. ते अनमोल स्वरूपाचे आहेत.

---------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT