शिरूर (पुणे) : तालुक्यातील बेकायदा हातभट्टी व दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शिरूरच्या पोलिस प्रशासनाने गावोगाव ग्रामसमित्या स्थापन करण्याबरोबरच; गावपातळीवरील दारूबंदी समितीचे वैधानिक अधिकार वाढवून त्या अधिकाधिक प्रभावी काम करतील यासाठी त्यांना बळ देण्याचे ठरविले आहे.
सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांनी अण्णापूर (ता. शिरूर) येथे दारूबंदीसाठी गेल्या वर्षभरापासून एकाकी लढा सुरू केला आहे. दारूबंदीसाठी त्यांनी कालपासून शिरूरच्या तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले असता, शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी त्यांच्या मागण्यांची दखल घेत चर्चा केली व दारूबंदीचा प्रभावी कार्यक्रम ठरविण्यासाठी अण्णापूर येथे प्रमुख ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मीकराव कुरंदळे, सरपंच दत्तात्रेय कुरंदळे, उपसरपंच लक्ष्मण कुरंदळे, आंदोलक नीलेश वाळूंज यांच्यासह मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत दारूबंदीसाठी स्थानिक तरुणांची समिती स्थापन करण्यात आली; तसेच कायमस्वरूपी दारूबंदी साठी दारूबंदीचा "अण्णापूर पॅटर्न' तयार करण्यात आला. मंदाबाई वाळूंज, केशव शिंदे, विलास कुरंदळे, राजाभाऊ थोरात, संजय थोरात, नितीन धरणे, अक्षय कुरंदळे, महेश कुरंदळे हे दारूबंदीसाठी कार्य करणारे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महत्त्वाचे निर्णय
- अण्णापूर पॅटर्न'नुसार ग्रामसभेला दारूबंदीबाबत कारवाईचे अधिकार बहाल
- गावपातळीवरील दारूबंदी समिती आणखी प्रभावी करताना सदस्यसंख्या वाढविण्याचा आणि वॉर्डनिहाय समित्या स्थापण्याचा निर्णय
- समितीला ग्रामपंचायत पदाधिकारी व गावपातळीवरील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे सल्ला व मार्गदर्शन
- प्रत्यक्ष पाठबळ देण्याबाबतचा ठराव
पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे म्हणाले
- दारूबंदीचा हा अण्णापूर पॅटर्न प्रथम शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांत व पुढील टप्प्यात रांजणगाव एमआयडीसी व शिक्रापूर पोलिस ठाण्याशी समन्वय साधून तालुक्यातील सर्वच गावांत राबविण्यात येईल
- बेकायदा हातभट्टी दारूधंद्यांच्या उच्चाटनासाठी प्रत्येक गावात ग्रामसमिती व वॉर्डसमिती स्थापन केल्यानंतर या समित्यांसह कारवाईची दिशा ठरवू
- या समितीत काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना पोलिस ठाण्याच्या वतीने ओळखपत्र दिले जाईल, त्यांचे मोबाईल पोलिस ठाण्याशी जोडले जातील, त्यांच्या सूचनांची प्राधान्याने दखल घेतली जाईल
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अनेक क्षेत्रांत येथील तरुणांनी यश मिळवताना, गावाचा लौकिक वाढवला असला; तरी गावठी हातभट्टी दारूमुळे गावची बदनामी होत आहे. त्यामुळे दारू, ताडी, गुटखा बंदीसाठी तरुणांनी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांची दखल शासनाने घेतली. दारूबंदीसाठी उचललेले पाऊल स्वागतार्ह असून, आम्ही आता पुढील काळात दारूच्या दुष्परिणामांबाबत वैयक्तिक जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेणार आहोत.
नीलेश वाळूंज, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.