मंचर (पुणे) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंचर शहरातील नागरिकांनी छत्रीचा वापर करावा. त्यामुळे आपोआप सोशल डिस्टनस नियमाची तर अंमलबजावणी होईलच, पण प्रखर उन्हापासून संरक्षण होईल, असा संदेश देण्यासाठी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे छत्री घेऊन फिरत असून, त्यांनी अनेकांना भेट म्हणून छत्र्यांचे वाटप केले आहे. या पूर्वी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाप्रमाणे छत्रीचा मंचर पॅटर्न चर्चेत आला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या छत्री विक्रेत्यांनाही सुगीचे दिवस आले आहे. चार दिवसांत दोन हजारापेक्षा अधिक छत्र्याची विक्री झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून गांजाळे यांनी घर सोडले असून, त्यांचा मुक्काम ग्रामपंचायत कार्यालयात आहे. लॉकडाउनची प्रभावीपणे अंमलबजावणी, आजतागायत दर रविवारी जनता कर्फ्यू, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी किराणामालासह सर्व जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा, प्रतिबंधक औषधांची तीन वेळा फवारणी, पोलिस, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी या कोरोना योद्यासाठी फेस शिल्डचे वाटप, नागरिकांची तापमानाची तपासणी इन्फ्रारेड थर्मामीटर गणद्वारे, यात्रा रद्द झाल्याच्या निमित्ताने सधन कुटुंबांनी रेशनिंग न घेणे, गरजू कुटुंबाना धान्य, जीवनावश्यक वस्तू व एक वेळचे जेवण, रस्त्याने प्रवास करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना रिफ्लेक्टीव जॅकेट व बॅटरीचे वाटप, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथीक ' आर्सेनिक अल्बम ३० ' या गोळ्यांचे नागरिकांना मोफत वितरण केले.
या मंचर पॅटर्न म्हणून राबविलेल्या उपक्रमाची दखल थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. मोबाईलद्वारे गांजाळे यांचे अभिनंदन केले. त्यामुळे चर्चेत आलेले गांजाळे हे छत्री वापराबाबत करत असलेल्या उपक्रमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मंचर शहरात लहानमोठे २० छत्री व्यवसायिक आहेत. गेल्या तीन दिवसात प्रत्येक दुकानातून सरासरी १०० ते १२५ छत्र्याची विक्री झाली आहे. अन्य व्यवसायिक लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडले असताना. छत्री व्यवसायिकांना मात्र सुगीचे दिवस आल्याचे पहावयास मिळते.
नागरिकांनो, घराबाहेर शक्यतो पडू नका. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलात, तर तोंडाला मास्क किंवा रुमाल असावा. सोबत एक छत्री घ्या, जेणेकरून छत्रीमुळे दोन व्यक्तीमध्ये सोशल डिस्टन्स राहील. हा प्रयोग अनेक राज्यात आणि अनेक देशात यशस्वी झाला आहे. आपणही त्याचा अवलंब करू, जेणेकरून आपल्याला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी राहील. मंचर छत्री पॅटर्नला नागरिकांनी सहकार्य करावे.
दत्ता गांजाळे,
सरपंच, मंचर (ता. आंबेगाव)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.