esakal
Ravindra Dhangekar on Nilesh Ghaywal case : सध्या पुण्यातील कुख्यात आणि फरार गुंड नीलेश घायवळचं नाव चांगलंच चर्चेत आहे. कारण, काही दिवसांआधीच त्याने पुण्यातील कोथरूड भागात आपल्या गुंडकडून गोळीबाराची घटना घडवून आणली, एवढच नाहीतर तर त्यावर मकोका सारखे गंभीर गुन्हे असूनही तो नाव बदलून पोलिसांना चकमा देत पासपोर्ट मिळून देशाबाहेर पसार झालेला आहे. अशात आता या प्रकरणावरून पुण्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे.
सर्वसामान्य जनता पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत आहे, शिवाय स्थानिक राजकीय नेत्यांवरही टीका टिप्पणी सुरू आहे. याच दरम्यान आता माजी आमदार आणि पुण्यातील शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांचीही या प्रकरणावर प्रतिक्रिया समोर आली आहे. विशेष म्हणजे धंगेकरांनी या प्रकरणात भाजप मंत्री आणि कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. नीलेश घायवळ प्रकरणात चंद्रकांतदादा गप्प का आहेत? असा सवालच रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.
मीडियाला प्रतिक्रिया देताना धंगेकर म्हणाले, हा प्रश्न खरंतर चंद्रकांतदादांना विचारला गेला पाहीजे. की आपण जर एवढं पुणे शहरात काम करत आहात आणि सर्वसामान्य माणसांना त्रास होत असेल, तर तुम्ही सत्ताधारी म्हणून तिथे काय करत आहात? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
तसेच, यामध्ये खरंतर चंद्रकांत पाटील बोलायला हवे होते, कारण त्यांच्या मतदारसंघात हे घडलं आहे. जर मेधा कुलकर्णी जर बोलत असतील, तर मग चंद्रकांत पाटील का गप्प आहेत? गप्प का बसलेत, तर तुम्ही त्याचा वापर केलाय का? मी तर बोलतोच आहे पण ते का गप्प आहेत, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहीजे. असंही धंगेकरांनी बोलून दाखवलं.
नीलेश घायवळ हा सराईत गुन्हेगार आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मधल्या काळातही त्याच्याकडून अनेक गुन्हे पुणे शहरात घडलेले आहेत. अशा गुंडाना जर पासपोर्ट मिळत असेल तर याची पूर्णपणे चौकशी झाली पाहीजे. ज्या पोलिस अधिकाऱ्याने याची शिफारस केली असेल, त्याबाबत मी महासंचालकांना पत्र पाठवले आहे. याप्रकरणी संपूर्ण चौकशी होवून जो पोलिस अधिकारी आहे त्याची चूक आहे की नाही, तसेच यावर कोणाचा वरदहस्त आहे, का हे देखील शोधलं पाहीजे. अशा गुंडाना जर पासपोर्ट मिळत असेल, तर हे पोलिस खात्याचं अपयश आहे. हे जर पोलिस खात्याचे अपयश असेल तर गृहखात्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीही याची सखोल चौकशी केली पाहीजे. यामध्ये जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे. अशी मागणीही यावेळी रवींद्र धंगेकर यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.