आळंदी (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आळंदीतील माउलींचे मंदिर ३० जूनपर्यंत बंद आहे. त्यामुळे अत्यल्प वारक-यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर माउलींच्या चांदीच्या चल पादुकांचे प्रस्थान पंढरीकडे विठूरायाला भेटण्यासाठी ज्येष्ठ वद्य अष्टमीला (ता. १३ जून) दुपारी चारच्या दरम्यान होणार आहे.
साधेपणाने प्रस्थान सोहळा पार पडेल. प्रस्थानसाठी नेमून दिलेल्या पुजारी, मानकरी, संस्थानचे कर्मचारी यांना आरोग्य तपासणी झाल्यानंतरच मंदिर प्रवेश दिला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे पादुका पालखीत ठेवून देउळवाड्याबाहेर यंदाच्या वर्षी नेल्या जाणार नाहीत. त्यामुळे आळंदीकर व भाविकांना पादुकांचे दर्शन होणार नाही.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
माउलींच्या पादुकांचे प्रस्थान सोहळ्यासाठी ज्येष्ठ वद्य अष्टमीला पहाटे चार ते साडेपाच वाजता माउलींच्या समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती व आरती होईल. दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान माउलींना नैवद्य दाखविला जाईल. नंतर दुपारी चार ते सहा या वेळेत प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरूवात होईल. अत्यल्प संख्येतील ब्रम्हवृंदाच्या हस्ते माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख केला जाईल. त्यानंतर माउलींची व गुरू हैबतबाबंची आरती होईल.
देवस्थानच्या विश्वस्तांकडून माउलींच्या पादुका परंपरेनुसार पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हातात दिल्या जातील. त्यानंतर पादुकांचे पढरीचे दिशेने प्रस्थान होईल. त्यानंतर वीणा मंडपातून पादूका बाहेर आणून मंदिर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर देऊळवाड्याच्या पश्चिम दरवाजाने पादुका लगतच्याच आजोळघरात विराजमान होतील. समाजआरती झाल्यावर जागर सुरू होईल. आजोळघरात पादुका सतरा दिवसांसाठी विराजमान होतील. येथे अवघ्या पाच लोकांच्या उपस्थितीत सतरा दिवस कीर्तन आणि जागरचा नैमित्तीक कार्यक्रम होईल. त्यानंतर राज्य सरकार आदेश देईल, त्याप्रमाणे आषाढ शुद्ध दशमीला (ता. ३० जून) माउलींच्या चल पादुका हेलीकॉप्टर अथवा बसद्वारे पंढरपूरला आषाढी वारीसाठी नेण्यात येणार आहे.
शासन सांगेल त्यानुसार वारकऱयांची संख्या निश्चित करून पंढरपूरला पादुका जातील. आषाढी एकादशी आणि नैमित्तिक कार्यक्रम पंढरपुरातील माउली मंदिरात केले जाणार आहेत.मंदिर उघडण्यास अद्याप परवानगी नसल्याने प्रस्थानच्या दिवशी मंदिर बंद असल्याने प्रवेश करण्यासाठी अथवा प्रस्थान सोहळ्यास हजेरी लावण्यासाठी कोणीही प्रयत्न, शिफारस करू नये, असे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे यांनी सांगितले.
घरबसल्या दर्शनाची सोय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा उपद्रव वारकरी आणि माउलींच्या दर्शनासाठी गावोगावच्या भक्तांना होऊ नये, यासाठी भाविकांना घरबसल्या प्रस्थान वारी सोहळा पाहता यावा, यासाठी देवस्थानकडून फेसबुक लाईव्ह चित्रण केले जाईल. तसेच, डीडी सह्याद्री या दुरचित्रवाहिनीवरून सोहळा दाखविण्यासाठी पत्रव्यवहार देवस्थानने केला आहे, असे ढगे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.