pmc contractor responsible for pune road condition g20 monsoon rain patholes  sakal
पुणे

Pune News : पुणेकरांना खड्ड्यात घालण्यास हे आहेत जबाबदार!

पुण्यात थोडा पाऊस झाला तरी लगेच रस्त्यांवर खड्डे पडतात. गेल्या वर्षी खड्ड्यांनी पुरती शहराची वाट लागली होती

संभाजी पाटील @pambhajisakal

Pune News : रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत गेली दोन वर्षांपासून पुणेकर बोलत आहेत. प्रशासन दरवर्षी प्रमाणे इतके हजार खड्डे बुजविले, पॅचवर्क साठी इतके हजार टन डांबर वापरले, एवढ्या कोटींच्या निविदा काढल्या अशी पाणी असलेल्या खड्ड्यात डांबर ओतल्यासारखी उत्तर देते.

जी २० च्या निमित्ताने जे रस्ते तयार केले होते, त्यावरही खड्डे पडले आहेत, याचाच अर्थ रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. ठेकेदार महापालिकेस शब्दशः चुना लावत आहेत, पुणेकर बिचारे याच खड्ड्यातून मार्ग काढत हे असेच चालणार म्हणून खपवून घेत आहेत. पण हे किती काळ आणि का सहन करायचे हा खरा प्रश्न आहे.

- संभाजी पाटील@psambhajisakal

पुण्यात थोडा पाऊस झाला तरी लगेच रस्त्यांवर खड्डे पडतात. गेल्या वर्षी खड्ड्यांनी पुरती शहराची वाट लागली होती. प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यातून काही तरी बोध घेऊन यंदा किमान काही तरी काळजी घेतली असावी असे वाटत होते.

पण छोट्याशा पावसाने रस्ते करणारे ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे. महिनाभरापूर्वी ३०० कोटी रुपये खर्च करून शंभर पैकी ४८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आल्याचे महापालिकेच्या रस्ते विभागाने सांगितले होते.

याशिवाय जी २० परिषदेच्या निमित्ताने शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण केले होते. रस्ते विभाग, क्षेत्रीय कार्यालये असे मिळून वर्षभरात जवळपास पाचशे कोटी रुपयांचा खर्च रस्त्यांवर केला असेल.

एवढी मोठी रक्कम खर्च करूनही शहरातील रस्ते नको तेवढे खराब झाले आहेत. याचाच अर्थ जे काम होत आहे, त्याचा दर्जा अत्यंत सुमार आहे. ज्यांनी ही कामे केली ते ठेकेदार, अधिकारी जणू काही घडलेच नाही, पावसाळ्यात खड्डे होणारच अशाच आविर्भावात फिरत आहेत.

पुणेकर बिचारे मात्र खड्ड्यात स्वतः चे कंबरडे मोडून घेत आहेत. प्रामाणिकपणे कर भरून पुरेसे पाणी नाही, धड रस्ते नाहीत मग महापालिका नेमके करते काय, असा संतप्त सवाल प्रत्येकाला पडल्याशिवाय राहत नाही.

ज्या रस्त्यांचा देखभाल दुरुस्ती कालावधी अद्याप संपलेला नाही, असे अनेक रस्ते आजही खराब झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी जेव्हा रस्त्यांची ही कामे सुरू होती. त्याच वेळी 'सकाळ' मध्ये वृत्त देऊन कामे योग्य दर्जाची होत नाहीत याकडे लक्ष वेधले होते,

पण त्याही वेळी ठेकेदार लॉबीवर कारवाईची धमक प्रशासनाने दाखवली नाही. कात्रज कोंढवा रस्त्यावर आतापर्यंत दुरुस्तीसाठी गेल्या वर्षभरात किती पैसे खर्च झाले हा हिशेब काढा आणि आज या रस्त्यावर जाऊन पहा.

रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. सिंहगड रस्त्यावर माणिकबाग परिसरात महिनाभरापूर्वी डांबरीकरण केले होते, तेथे मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. मोमीनपुरा, गंजपेठ, शुक्रवार पेठ, शिवाजी रोड, नगररोड ,

विमानतळ रोड, मुंढवा, कोंढवा अशा शहराच्या अनेक भागांत रस्त्यावर खड्डे, चिखल झाला आहे. उपनगरांमधील परिस्थिती तर आणखीच गंभीर आहे. महापालिकेने कोट्यवधींची टेंडर काढली पण रस्त्यांची परिस्थिती सुधारली नाही.

एकदा केलेला रस्ता एक दोन महिने ही टिकत नसेल तर नक्कीच काम नीट होत नाही. रस्त्यांचा दर्जा किंवा क्वालिटी कंट्रोल करण्याची यंत्रणाच महापालिकेत नसावी अशी शंका येते. रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावे अशी मागणी असतानाही त्याकडे दुर्लक्ष होते.

रस्त्यांचा दोन्ही बाजूंनी उतार, पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र वाहिन्या या प्राथमिक बाबीही पाहिल्या जात नाहीत. लोकप्रतिनिधी त्यांचा हिस्सा मिळाला ना एवढ्यापुरतेच त्यात लक्ष घालतात. पुणेकरांनी दरवर्षी पावसाळ्यात हे सहन करायचे.

प्रशासनाने भर पावसात खड्डे बुजविण्याचे नाटक करायचे, त्यावर लाखो रुपये खर्च करायचे, पुन्हा रस्ते दुरुस्तीची टेंडर काढायची हा धंदा किती काळ चालणार आहे. सध्या नगरसेवक नाहीत पण आमदार खासदार आहेत, पण एकाही आमदाराने शहरातील रस्त्यांबद्दल आवाज उठवल्याचे ऐकिवात नाही.

राजकीय पक्षात नेमके कोण कोठे आहे, याचा पत्ता नसल्याने त्यांनाही जनतेच्या प्रश्नांबद्दल घेणे देणे नाही. त्यामुळे ही भयंकर अवस्था झाली आहे. मेट्रो आणि इतर कामांमुळे ज्या ठिकाणी पाणी साठते तेथील दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहतूक पोलिसांनी देखील केली, पण अशी कामेही झालेली नाहीत.

या सगळ्या परिस्थितीत प्रशासनाचा निष्काळजीपणा, भ्रष्ट ठेकेदारांना अभय हेच सूत्र दिसते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आता

पुणेकरांनाच रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत, त्यावर नागरिकानांच लक्ष ठेवण्याची गरज आहे अन्यथा पुणे आणखी खड्ड्यात जायला वेळ लागणार नाही.

हे नक्की करा

- जे रस्ते खराब झाले, त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे.

- ज्या अधिकाऱ्यावर रस्त्याची जबाबदारी होती त्याच्यावर कारवाई.

- गेल्या वर्षभरात दुरुस्तीवर झालेला खर्च जाहीर करावा.

- ठेकेदार वापरत असलेल्या मालाची तपासणी करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT