पुणे : लॉकडाउन शिथिल केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील औद्योगीक वसाहतींमधील उद्योगाची चक्रे पुन्हा फिरू लागली आहेत. मात्र, कामगारांची कमतरता, उत्पादनाची घटलेली मागणी व कोरोनाची भीती या कारणांमुळे उद्योगाचा वेग अद्याप मंदावलेलाच आहे. वाहतूक समस्या, मजुरांची कमतरता आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्याची कमतरता आदी समस्याही उद्योगांपुढे आहेत. मात्र, लॉकडाउन उठल्यानंतर अचानकपणे कामगारांची मागणी वाढणार आहे.
शिक्रापूर- सणसवाडीत 35 टक्केच कामगार
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर सणसवाडी एमआयडीसी परिसरात जुन्या ऑर्डर पूर्ण करण्यास प्राधान्य दिलेले दिसत आहे. मात्र, कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी कामगार सर्व उपस्थित असले तरी कंत्राटी कामगार जेमतेम 30 ते 35 टक्के उपस्थित.
शिक्रापूर- सणसवाडीत सध्या कार्यरत एकूण 120 कंपन्यांपैकी साधारण 100 कंपन्या सुरू आहेत. सर्व कंपन्यांमध्ये कायम कामगार साधारण 25 ते 30 टक्के; तर कंत्राटी- मजूर 70 ते 75 टक्के एवढे प्रमाण आहे. त्यापैकी एकूण एमआयडीसीमध्ये साधारण 5 हजार पर्मनंट (कायम) कामगार आहेत; तर कंत्राटी कामगार-मजूर साधारण 20 ते 25 हजार एवढे आहेत.
एमआयडीसीत सुरू झालेल्या सर्व कंपन्यांमध्ये सध्या नियमित सर्व कामगार रुजू झालेले आहेत; तर साधारण
20 ते 25 टक्के कंत्राटी-मजूर कामगार हजर आहेत. कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या असल्या, तरी नवीन ऑर्डर नसल्याने जुन्या ऑर्डर पूर्ण करणे एवढेच काम सध्या उपलब्ध कामगार व मजुरांवर आहे. मात्र, लॉकडाउन उठल्यावर ऑर्डर वाढेल व त्यानंतर कंपन्यांना मजुरांची गरज व मागणी वाढणार आहे.
(बातमीदार : भरत पचंगे)
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
मोठ्या कंपन्या बंद असल्याचा चाकणला फटका
चाकण : खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील सुमारे ऐंशी टक्के कंपन्या सुरू झाल्या आहेत, पण मोठ्या कंपन्यांना सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या अजूनही कामगार व मजूर नसल्याने सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे मोठ्या कंपन्यांना उत्पादनात अडचण भासत आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीत सुमारे दीड लाखावर कामगार व मजूर काम करत होते. यामध्ये परप्रांतीय कामगार व मजुरांची संख्या ऐंशी टक्क्यांवर आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे कामगार व मजूर आपापल्या गावी गेल्याने छोट्या कंपन्यांना उत्पादन सुरू करता आले नाही. हा मजूर व कामगार परराज्यातून कधी येतो, यावर या कंपन्या सुरू होण्याचे भवितव्य अवलंबून आहे. कंत्राटदार व ठेकेदारांना सध्या मजूर मिळत नाही. त्यामुळे बहुतांश छोटे उद्योग व कंपन्या अजून सुरू झाल्या नाहीत. या कंपन्या व उद्योग सुरू होण्यास अजून काही कालावधी लागणार आहे, असे चित्र आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीतील उत्पादन सुरळीत होण्यास एक व दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मजूर व कामगार गावी गेल्याने व तो पुन्हा येण्यास एक ते दोन महिन्यांचा वेळ लागणार आहे. प्रशिक्षित मजूर व कामगार छोट्या कंपन्या, उद्योग यांना सध्या मिळत नाही. उपलब्ध असलेल्या मजुरांना व कामगारांना प्रशिक्षित करण्यात वेळ जाणार आहे. सध्या पन्नास ते पंचावन्न टक्के कामगारांवर कंपन्या सुरू आहेत, असे "बजाज'चे वरिष्ठ उपाध्यक्ष कैलास झांझरी यांनी सांगितले.
(बातमीदार : हरिदास कड)
बारामतीत मागणीनुसार उत्पादन
बारामती : गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प असलेले उद्योगचक्र आता संथ गतीने सुरू झाले आहे. लॉकडाउनमुळे जवळपास दोन महिने ठप्प असलेले उद्योग 4 मेपासून सुरू झाले आहेत. बारामतीतील सर्वच मोठ्या व छोट्या कंपन्यांनी आपले उत्पादन सुरू केले असून, एकूण उत्पादन क्षमतेच्या 40 ते 60 टक्क्यांपर्यंत उत्पादन कंपन्यांनी सुरू केले आहे.
बारामती एमआयडीसीतील लघुउद्योग मागणीनुसार उत्पादन करीत आहेत. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मात्र, पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू नसल्याने अजून तितकी अडचण जाणवत नाही, अशी माहिती बारामती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी दिली. बारामतीतील कारखान्यांचे कामकाज सुरू झाले असून, हळूहळू मागणीनुसार कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी माहिती इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.
बारामती एमआयडीसीतील भारत फोर्ज, पियाजिओ, आयएसएमटी, श्रायबर डायनामिक्स या सारख्या कंपन्यांचे कामकाज सुरू झाले असून, आवश्यक त्या उपाययोजना करून या कंपन्यांनी टप्याटप्याने उत्पादनास प्रारंभ केला आहे. काही कंपन्यांना मागणी पुरेशी नाही, तर काही ठिकाणी उत्पादन झालेले आहे पण वाहतुकीची व्यवस्था नीट नसल्याने मालाला उठाव नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळेही काही प्रमाणात उत्पादनांवर परिणाम होत आहे.
बारामती एमआयडीसीमध्ये 390 छोट्या; तर 10 मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये जवळपास 20 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. एमआयडीसीचे उद्योगचक्र सुरू झाले आहे. त्यामुळे उद्योजकांसह कर्मचारी व पूरक व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे. मागणीनुसार टप्याटप्याने उत्पादन वाढल्यानंतर हे चक्र सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. वाहतुकीची परिस्थिती जर व्यवस्थित झाली, तर अजून उत्पादनात फरक पडेल. जे कर्मचारी राज्य सोडून गेलेले आहेत, तेही कालांतराने परत येतील व स्थिती सुरळीत होईल, असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला आहे.
(बातमीदार : मिलिंद संगई)
पिरंगुट परिसरात एकाच पाळीत काम
पिरंगुट : मुळशी तालुक्यातील सुमारे नव्वद टक्के कंपन्या सुरू झाल्या असून, मालाला मागणीचा अभाव, वाहतूक समस्या, मजुरांची कमतरता आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्याची कमतरता आदी अडचणी काही प्रमाणात निर्माण झाल्या आहेत.
कोरोनामुळे लॉकडाउनची परिस्थिती निर्माण झाल्याने पिरंगुट औद्योगीक परिसरातील सर्वच कंपन्या बंद झाल्या होत्या. सरकारने आता या कंपन्या सुरू करण्यास परवानगी दिली असून, तीन पाळ्यांऐवजी एकाच पाळीत काम करण्याचे बंधन घातले आहे. तालुक्यात सुमारे साडेतीनशेच्या आसपास कंपन्या असून, जास्त कामगार असलेल्या कंपन्यांची संख्या सुमारे शंभर आहे. सध्या बहुतांशी म्हणजे किमान नव्वद टक्के कंपन्या सुरू झाल्या असून, उत्पादनांना नवीन मागणी नाही. वाहतुकीचीही समस्या असल्याने कच्चा माल मिळण्यास अडचणी येत आहेत. मार्च महिना असल्याने वर्षअखेरमुळे अनेक कंपन्यांनी कच्चा माल घेतला नव्हता. त्यामुळे सध्या हा कच्चा माल मिळविताना वाहतूक खर्च दुप्पट येत आहे. पिरंगुट परिसरातील बऱ्याचशा कंपन्या पिंपरी, चाकण, भोसरी आदी औद्योगिक परिसरातील कंपन्यांवर अवलंबून आहेत.
पिरंगुट परिसरातील कंपनी मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मालाची मागणी कमी असून, रात्रपाळी बंद आहे. कंत्राटी कामगारांचा तुटवडा असल्याने जड व शारीरिक कष्टाच्या कामांसाठी मजूर कमी आहेत. शारीरिक मेहनतीची कामे करणारे कंत्राटी कामगार निघून गेल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. ज्या कामगारांना कंपनीने सेवेत कायम केलेले आहे, अशा कामगारांना बहुतांश कंपन्यांनी लॉकडाउनच्या कालावधीतील गेल्या दोन महिन्यांचे वेतन दिलेले आहे. संबंधित कामगारांना पुन्हा काम मिळेल व कंपनी सुरू होईल, ही आशा असल्याने परप्रांतीय अथवा परजिल्ह्यातील कामगार गावी गेले नाहीत. मात्र, कंत्राटी कामगारांना रोजगाराची शाश्वती नसल्याने त्यांनी गावाला जाणे पसंत केले. त्यांचा तुटवडा वाटू लागला आहे. सध्या बहुतांशी कंपन्यांत वीस ते तीस टक्के कामगार कामावर रुजू झाले असून, उत्पादनही कमी प्रमाणात होत आहे. येत्या महिन्याभरात बहुतांशी कंपन्या पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करतील. त्यावेळी या कंत्राटी कामगारांची प्रचंड कमतरता निर्माण होणार आहे.
याबाबत ब्रिंटन कार्पेट कंपनीचे मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक सतीश करंजकर म्हणाले, मुळशीत सुमारे साडेतीनशे छोटे मोठे कारखाने आहेत. सध्या एकाच पाळीत कामगार करीत असल्याने तुटवडा जाणवत नाही. परंतु, कंपनी पूर्ण क्षमतेने सुरू होईल, त्यावेळी कामगारांचा तुटवडा जाणवणार आहे. मुबिया कंपनीचे मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक लक्ष्मण कारभारी म्हणाले, ""आमच्या कंपनीत रोज एकाच पाळीमध्ये उत्पादन सुरू असून, तीस ते पस्तीस टक्के कामगार काम करीत आहेत. परिसरातील बऱ्याचशा कंपन्यांचे उत्पादन टाटा, मारुती व अन्य उद्योगांना पुरविले जाते. मात्र सध्या टाटा, मारुती व अन्य मोठ्या उद्योगांचेच प्लांट बंद असल्याने मागणी नाही. त्यामुळे उपलब्ध कामगारांच्या उपस्थितीत कामे केली जात आहेत. जे. बी. केमिकल्सचे मालक श्रीधर जोशी, बसवराज बिन्नी, अमोल निंबाळकर यांनीही उत्पादन, मागणी, कामगार तुटवडाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
(बातमीदार : धोंडिबा कुंभार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.