Shivshahir Babasaheb Purandare esakal
पुणे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली श्रद्धांजली अर्पण

राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, कला अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर विविध राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, कला अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

"शिवशाहीर पुरंदरे यांनी केवळ लेखणीने व वाणीनेच नाही तर, तन आणि मनाने शिव चरित्राला वाहून घेतले होते. नव्या पिढीला शिव चरित्राचा परिचयच नव्हे, तर प्रत्यय आणून द्यावयाचे काम त्यांनी केले. शिवचरित्राला इतिहासातच नाही तर आधुनिक काळात त्यांनी जिवंतपणा आणून दिला."

- प्रतिभा पाटील (माजी राष्ट्रपती)

"इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्त्वाचा साक्षीदार हरपला आहे."

- अजित पवार (उपमुख्यमंत्री)

"बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत. तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघ शाखेतून प्राप्त झाला. तो ध्यास मनात ठेवून ध्येय प्राप्तीकरिता तत्त्व रूप आदर्श पुरुष म्हणून छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांची भक्ती त्यांनी जीवनभर निष्ठेने चालवली. दादरा नगर हवेलीच्या मुक्तिसंग्रामात सैनिक म्हणून तेही लढले होते. त्यांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले, तरी त्यांचे स्फूर्तिदायक जीवन समाजामध्ये पिढ्यानपिढ्या शिवरायांचा प्रताप व प्रेरणा सतत जागृत ठेवील."

- मोहन भागवत (सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)

"बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख कोणती तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सीम प्रेम केले. ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व, वेळ-शब्दांचे पक्के, सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कठोर परिश्रम असे बाबासाहेब आता पुन्हा होणे नाही."

- देवेंद्र फडणवीस (विरोधी पक्ष नेते)

"शिवशाहीर पुरंदरे यांनी संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांची आराधना करण्यासाठी वाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी केलेला अभ्यास, संशोधन हे आपणासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरले आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे."

- अमित देशमुख (सांस्कृतिक कार्यमंत्री)

"बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी दु:खद आहे. महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे."

- नाना पटोले (प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस)

"शिवस्तुती हा बाबासाहेबांचा आत्मा होता. शिवसृष्टीची साधने गोळा करून ती त्यांनी जनसामान्यांसमोर आणली. शिवशाहीचे मराठी आणि महाराष्ट्रीयन पैलू बाबासाहेबांनी त्रिखंडात नेले."

- गिरीश बापट (खासदार)

"बाबासाहेबांनी आपले आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केले. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, परंतु मला पितृतुल्यही होते. ते मला नेहमी सांगत, ‘महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला, तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे, महाराज जिथे गेलेत तिथे जायची!’ शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला..."

- राज ठाकरे (अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

"शिवशाहीर बाबासाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना केंद्रबिंदू मानून संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या नसा-नसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. ही शिवसृष्टी लवकर पूर्ण होण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, ही केंद्र आणि राज्य सरकारला विनंती."

- उदयनराजे भोसले (खासदार)

"गेल्या अनेक वर्षांपासून आमचे बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबाशी वैयक्तिक ऋणानुबंध आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील कानाकोपऱ्यात अनेक वर्षे ज्या पद्धतीने, ज्या शैलीने त्यांनी इतिहास घराघरांत पोचवला. तो प्रत्येक पिढीसाठी ठेवा आहे. त्यांच्या आठवणी, त्यांनी केलेले काम, त्यांचे लिखाण, साहित्य येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी कायम जिवंत राहील."

- सुप्रिया सुळे (खासदार)

"शिवशाहीचा खरा इतिहास जनतेसमोर आणण्यासाठी बाबासाहेबांनी घेतलेले प्रयत्न मोलाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घराघरांत पोहोचविणे ही त्यांना श्रद्धांजली ठरेल."

- श्रीपाद नाईक (केंद्रीय राज्यमंत्री)

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सातत्याने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे मार्गदर्शन लाभले. शिवसृष्टी उभारण्यासाठी अधिकाधिक काय सहकार्य करता येईल, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न राहतील."

- नीलम गोऱ्हे (उपसभापती, विधान परिषद)

"बाबासाहेब पुरंदरे हे मुळात इतिहास संशोधक होते. नंतर ते शिवशाहीर झाले. शिवचरित्र हे मुळातच चित्तथरारक आहे. चांगल्या हिऱ्याला उत्तम कोंदण लागते, बाबासाहेबांचे लिखाण तशा प्रकारचे होते. ‘जाणता राजा’ हे महानाट्य त्यांच्या प्रतिभेचे एक लखलखीत उदाहरण म्हणावे लागेल."

- गजानन मेहेंदळे (इतिहास संशोधक)

"अखेरपर्यंत भारत इतिहास संशोधक मंडळाच्या कामात बाबासाहेब रस घेत होते. दसऱ्याच्या आदल्याच दिवशी नव्या योजनांची त्यांनी माहिती करून घेतली. सुमारे २२ मिनिटे मंडळाच्या पूर्वसुरींविषयी अप्रतिम भाषण त्यांनी केले. असा व्रतस्थ इतिहास संशोधक आपल्यातून गेला आहे."

- प्रदीप रावत (अध्यक्ष भारत इतिहास संशोधक मंडळ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray: कोण होत्या मिनाताई ठाकरे? बाळासाहेबांच्या झंजावात राजकारणात होता सिंहाचा वाटा

Nagpur Municipal Corporation: 'नागपूर मनपा निवडणुकीला महागाईचा फटका'; २० कोटींचा अंदाजित खर्च, २४ लाखांहून अधिक मतदार

Nano Banana AI Durga Puja 2025 Saree Look Prompts: 'हे' 5 प्रॉम्प्ट कॉपी करा अन् जनरेट करा फेस्टिव्हल साडी लूक

Bhosari MIDC : भोसरी एमआयडीसी पोलिसांचा पर्यावरणासाठी पुढाकार, देशी वृक्षांची लागवड

Mumbai Local Viral Video: दिव्यांगजन कोचमध्ये सामान्य प्रवाशांची घुसखोरी, आरक्षित डब्ब्यात चढण्यासाठी दृष्टिहीनांचे हाल

SCROLL FOR NEXT