पुणे - वस्तू किंवा पदार्थांच्या नगात किंवा वजनात फसवणूक झाली, तर वैधमापन शास्त्र विभाग उत्पादक, वितरक किंवा विक्रेत्यांवर कारवाई करते. मात्र, पदार्थाच्या आकारमानात फरक असला आणि ते ग्राहकांना सहज ओळखता येत नसेल तर त्यांची फसवणूक होते.
बाजारपेठेत सध्या इंग्लिश अंडी मोठ्या, मध्यम व लहान आकारांत मिळतात. मात्र, यामध्ये ग्राहकांची फसवणूक झाली तर यासाठी नियम किंवा कायदाच नसल्याचे राज्याचे वैधमापन शास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ अशी टॅगलाईन असलेली जाहिरात खूपच गाजली. अंड्यातील पोषणमूल्यामुळे आबालवृद्धांच्या आहारात अंड्याला प्रथम प्राधान्य आहे. मात्र, अशी अंडी तीन आकारात मिळतात, याची माहिती सर्वसामान्यांना असतेच असे नाही. याचे मुख्य कारण सध्या बाजारपेठेत इंग्लिश अंडी तीन आकारात मिळतात.
त्यामध्ये मोठे (कमर्शियल) ५० ते ५५ ग्रॅमचे असून दर शेकडा ४६५ रुपये आहे. मध्यम आकाराचे ४० ते ४५ ग्रॅमचे असून त्याचा दर शेकडा ४४० रुपये आहे. तर लहान आकाराचे (पुलेट) २५ ते ३० ग्रॅमचे असून, शेकडा ३९० रुपयांना मिळते. सध्या बाजारात सुटी अंडी उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना सहज फसवता येऊ शकते. मात्र, याची माहिती राज्याच्या वैधमापन शास्त्र विभागालाच नाही.
बाजारपेठेत तीन प्रकारची अंडी मिळतात, याची माहिती नाही. वस्तू किंवा पदार्थाच्या नग किंवा वजनात फसवणूक होत असेल, तर संबंधित उत्पादक, वितरक किंवा विक्रेत्यांवर कारवाई करता येते. मात्र, आकारात फसवणूक होत असेल तर तसे नियम करण्याची गरज आहे. याबाबत मुख्य कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले जाईल.
- सीमा बैस, उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र विभाग, पुणे
होलसेलमध्ये अंड्यांची खरेदी आकारमानानुसार होते. मात्र किरकोळ ग्राहकांपर्यंत हा दर पोचत नाही. मध्यम आकाराचे अंडे मोठ्या दरात विकले जाण्याची शक्यता आहे. मात्र, पॅकिंगमधील अंड्याच्या दरात फसवणूक अशक्य आहे.
- रूपेश परदेशी, अंडी व्यापारी, मार्केट यार्ड, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.