पुणे - खासगी क्लासेसला महापालिकेने परवानगी दिल्याने क्लासचालकांसह विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे. गावी गेलेल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची पावले या निर्णयामुळे पुन्हा विद्येच्या माहेरघरी वळू लागली आहेत. तथापि, परवानगी मिळाली असली, तरी पूर्ण क्षमतेने ऑफलाइन क्लास सुरू होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शाळा सुरू झाल्याने क्लासेसही सुरू करा, अशी मागणी गेले काही महिने केली जात होती. क्लासेस बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले आहे. याचा क्लास व पूरक घटकांवर झालेल्या परिणामावर ‘सकाळ’ने सहा भागांत मालिका प्रसिद्ध करून वास्तव समोर आणले होते. दरम्यान, सर्वच व्यवहार अनलॉक होत असल्याने खासगी क्लास सुरू करावेत, यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू होत्या. त्यानंतर अखेर सोमवारी (ता. ११) मान्यता देण्यात आली. विशेषतः स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी पुणे सोडून गावाकडे गेले होते. हे विद्यार्थी परत येऊ लागले आहेत. ‘‘विद्यार्थी, पालकांसाठीही हा निर्णय महत्त्वाचा आहे,’’ असे एलन करिअर इन्स्टिट्यूटचे पुण्याचे प्रमुख अरुण जैन यांनी सांगितले.
मेस, चहा, पुस्तकविक्री वाढली
खासगी क्लासेसला परवानगी मिळाल्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी काही प्रमाणात पुण्यात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे गेले सात-आठ महिने आर्थिक विवंचनेत असलेले मेसचालक, चहाविक्रेत्यांकडे गर्दी वाढली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पुस्तकविक्रीतही वाढ झाली आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून शिकवणी सुरू करावी, अशी मागणी होती. ती मान्य करून सकारात्मक पाऊल उचलले आहे. पण, महामारीच्या काळात लगेच ऑफलाइन क्लास सुरू न करता काही काळ वाट पाहावी लागेल. ऑफलाइन व ऑनलाइन, अशा दोन्ही पद्धतीने शिकवले जाईल.
- दुर्गेश मंगेशकर, संचालक, आयआयटीएन्स प्रशिक्षण केंद्र
स्पर्धा परीक्षेच्या तारखा आणि क्लास सुरू होण्याची घोषणा एकाच दिवशी झाल्याने स्पर्धा परीक्षांची दिशा स्पष्ट झाली आहे. त्यामुळे गावाकडील मुले पुण्याकडे येतील. सध्याच्या जुन्या बॅच ऑनलाइन सुरू आहेत. त्या येत्या आठवडाभरात ऑफलाइन सुरू होतील, तर नव्या बॅच जानेवारीच्या शेवटी सुरू होणार आहेत.
- मनोहर भोळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, युनिक ॲकॅडमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.