बारामती, ता. २९ : लाखावर जमलेला जनसमुदाय... प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी, चेहऱ्यावर अस्वस्थता... कुटुंबातील घटक गमावल्याचे दुःख... अशी आजची सकाळ होती बारामतीकरांची. ज्या नेत्याने गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी जिवाचे रान केले, शिस्त घालून दिली त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देताना बारामतीकरांनीही शिस्तीचे दर्शन घडविले.
केवळ बारामती किंवा पुणे जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून दादांचे चाहते त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत आले होते. होणाऱ्या गर्दीचा अंदाज पोलिस विभागालाही असल्याने पोलिसांनीही अनेक जिल्ह्यातून बंदोबस्त मागविला होता. अंत्यसंस्कारासाठी पाच हजार पोलिस कर्मचारी उपस्थित होते. राज्य राखीव पोलिस दलासह रॅपिड अँक्शन फोर्स, आयबी, एसआयडी, गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.
स्वत: राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते दोन दिवस बारामतीत उपस्थित होते. अंत्यसंस्काराच्या सर्व बंदोबस्ताचे नियोजन त्यांनी स्वत: केले. अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल व तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी दोन दिवस बारामतीतील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
अजित पवार यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर कुटुंबीयांनी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला. एकाच वेळेस मोठ्या संख्येने लोक एकत्र बसू शकतील, असे हे ठिकाण होते. विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या यंत्रणेसह अजित पवार यांच्यावर प्रेम करणारे हजारो हात रात्रीत राबले आणि काही तासात अंत्यसंस्काराची तयारी झाली.
सुमारे एक लाख नागरिक अंत्यसंस्कारासाठी येतील असा अंदाज होता. त्या नुसार मैदानावर अनेक ठिकाणी एलईडी स्क्रीन लावलेले असल्याने त्याद्वारे लोकांना व्यवस्थित सर्व विधी व अंत्यसंस्कार पाहता आले. मैदानावर बसून लोकांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून मोबाइल टॉयलेटसची व्यवस्था केली होती. काही स्वयंसेवकांनी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले.
अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती बंद असल्याने बंदोबस्तासाठी आलेल्या पाच हजार पोलिस बांधवांसाठी जिजाऊ भवनच्या वतीने बिस्कीट पुडे, पाणी तसेच पोहे वाटप केले. अजितदादांना या माध्यमातून आदरांजली व्यक्त केल्याचे जिजाऊ भवनच्या सूत्रांनी सांगितले.
पोलिसांचा समन्वय
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती व दुसरीकडे येणारा प्रचंड जनसमुदाय यांचा समन्वय पोलिस विभागाने उत्तमरीतीने घातला. गर्दीचा उच्चांक होऊनही अत्यंत शांततेच्या वातावरणात बारामतीकरांनी शिस्तीचे पालन करत अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला. ज्या शिस्तीचे अजित पवार भोक्ते होते, त्या शिस्तीचे दर्शन बारामतीकरांनीही घडवत त्यांना आदरांजली वाहिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.