कळस, ता. ३० ः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुळशीचे पाणी पुण्याला देऊन, फुरसुंगी बोगद्याचे काम दोन वर्षांत पूर्ण करून खडकवासलाचे वाचणारे पाणी इंदापूरच्या तहानलेल्या शेतीला देण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यादृष्टीने त्यांनी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. परंतु, काम पूर्ण होण्याआधीच काळाने घाला घातल्याचे सांगताना प्रतापराव पाटील यांच्या स्मृतींना पाझर फुटला.
कळस (ता. इंदापूर) येथील प्रतापराव पाटील यांचे पवार कुटुंबीयांशी गेल्या तीन पिढ्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. कै. गोविंदराव पवार यांच्याबरोबर प्रतापराव पाटील यांचे आजोबा कै. सीताराम पाटील यांचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मैत्रीपूर्ण संबंध होते. कै. गोविंदराव पवार यांच्या माध्यमातून त्यांना लोकल बोर्डावर काम करण्याची संधी मिळाली. पुढे कै. गणपतराव पाटील यांनीही लोकल बोर्डापासून राजकीय वाटचालीस सुरवात केली होती. यानंतर जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून व नंतर इंदापूर तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी राजकीय जबाबदारी सांभाळली होती. या दरम्यान शरद पवार यांच्या सोबत काम करून त्यांनी तालुक्यात खडकवासला कालव्याच्या माध्यमातून शेती सिंचनासाठी पाणी आणले. वर्ष १९८३- ८४मध्ये दिवंगत अजित पवार यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रतापराव पाटील यांनी अजित पवार यांच्या प्रचारात सहभाग घेतला. यानंतर अजितदादांशी पाटील यांचे चांगले ऋणानुबंध जुळले. मात्र, पवार यांच्या आकस्मिक निधनाने पाटील कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
पाटील म्हणाले, ‘‘दादांनी जेव्हा हा शब्द दिला, तेव्हा त्यांच्या डोळ्यात इंदापूरच्या शेतकऱ्यांविषयी असलेली कळकळ स्पष्ट दिसत होती. ते म्हणाले होते, प्रताप, काळजी करू नका, इंदापूरचा पाणीप्रश्न मी कायमचा मिटवणार. आज दादा आपल्यात नाहीत, पण त्यांचे ते शब्द माझ्या कानात घुमत आहेत.’’
फोन करताच मिळायचे पाणी
प्रतापराव पाटील म्हणाले, ‘‘पालकमंत्री म्हणून पुण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या दादांनी कायम शहरी व ग्रामीण भागातील पाण्याची गरज ओळखून समतोल साधण्याचा प्रयत्न केला. एकीकडे शहराची वाढती पाण्याची मागणी व दुसरीकडे शेतीसाठी खडकवासला कालव्याच्या पाण्याची गरज ओळखून त्यांनी पाणी सोडण्याबाबत शहरवासीयांचा रोष पत्करून निर्णय घेतले. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासला कालव्याचे पाणी सोडण्याची फोनवरून मागणी केली तरी पाणी सोडले जायचे. कायम लोकांची कामे मार्गी लावत मी कामाचाच माणूस असल्याचे त्यांनी अखेरच्या घटकेपर्यंत सिद्ध करून दाखविले.’’
3321
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.