पुणे

संतविचारांचे बीज पेरा

CD

संतविचारांचे बीज पेरा

प्रगतीच्या शर्यतीत धावणारी सध्याची पिढी आधुनिक साधनांनी सक्षम झाली आहे. पण या वेगाला नीतिमत्तेचा ताबा नसेल, तर समाज दिशाहीन होऊ शकतो. म्हणूनच संतविचारांचे संस्कार नव्या पिढीसाठी अत्यावश्यक ठरत आहेत.
- विद्या अरुण काशीद, इंदोरी, मावळ

स माज सतत बदलत असतो. प्रत्येक पिढी नवीन तंत्रज्ञान, नवीन सुविधा आणि आधुनिक जीवनशैली स्वीकारते. ही प्रगती आवश्यक आहे. पण याच आधुनिकतेसोबत मूल्यांची जपणूकही तितकीच गरजेची असते. आज अनेक ठिकाणी असे दिसून येते की युवक आणि मुले पैशाच्या मोहाने, तसेच आभासी जगाच्या आकर्षणाने किंवा आधुनिकतेच्या बाहेरील चमकधमक पाहून चुकीच्या वाटेला जातात. त्यांची चूक म्हणावी की परिस्थितीची, हा वेगळा प्रश्न आहे. पण या सर्व प्रक्रियेत पालक, गुरुजन आणि समाजातील ज्येष्ठ मंडळी आपला प्रभाव हरवत चालल्याचे चित्र दिसते.
सध्याची पिढी बिघडत चालली आहे असे वारंवार म्हटले जाते. पण या बिघडण्याला केवळ मुलांचाच दोष नसतो. ज्यांनी संस्कार द्यायचे, मार्गदर्शन करायचे, योग्य-अयोग्याची जाण द्यायची त्या पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजानेही स्वतःकडे पाहायला हवे. नवी पिढी जशी आहे, ती तिच्या आसपासच्या वातावरणातूनच घडत असते. घरातील वडिलधारी मंडळींची वागणूक, बोलण्याची ढब, मूल्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सर्व मुलांवर थेट परिणाम करतात. म्हणूनच पिढी बिघडते तेव्हा जबाबदारी दोन्ही पिढ्यांची असते.
आजच्या पालकांनी अत्यंत कष्ट करून आपली मुले शिक्षित केली आहेत. त्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पण केवळ सुविधा पुरेशा नसतात. मुलांशी संवाद साधणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे, योग्य दिशेने प्रेरणा देणे, त्यांना समाजासाठी उपयोगी व्यक्ती म्हणून तयार करणे ही पालकांची महत्त्वाची भूमिका आहे. मुलांच्या हातात स्मार्टफोन दिला जातो, पण त्याचा वापर कसा करावा हे शिकवले जात नाही. इंटरनेटचा महापूर उपलब्ध आहे, पण कोणते ज्ञान आवश्यक आहे, हे सांगितले जात नाही. अशा परिस्थितीत मुले चुकीच्या दिशेला वळण्याची शक्यता वाढते.
याच वेळी संत विचारांचे महत्त्व अधोरेखित होते. महाराष्ट्राला संत परंपरेची समृद्ध देणगी आहे. संत तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर गाथा लिहिली. त्यांच्या अभंगांमधून आजही नीतिमत्ता, न्याय, समता आणि भक्ती यांचे संदेश मिळतात. जवळच आळंदी हे ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून एका संपूर्ण समाजाला अध्यात्म, कर्तव्य आणि सद्गुणांची शिकवण दिली. अशी महान संतपरंपरा असलेल्या परिसरातसुद्धा आज नीतिमत्ता कमी होत चालल्याची खंत जाणवते. हे संतांच्या शिकवणीपासून दूर जाण्याचेच परिणाम आहेत.
संतांनी कधी आधुनिकतेला विरोध केला नाही. त्यांनी विरोध केला तो अहंकाराला, लोभाला, अन्यायाला. आजचे तंत्रज्ञानही उपयोगी आहे. मोबाईल, इंटरनेट, आधुनिक शिक्षण पद्धती, डिजिटल सुविधा हे जीवन समृद्ध करण्यासाठीच आहेत. पण या सोयींनी माणसाला संवेदनाशून्य केले तर त्याचा उपयोग काय, प्रगती होत राहणे आवश्यक आहे, पण त्याच वेळी मनात नीतिमत्ता आणि मूल्यांचे स्थान घटू नये. हा संतांचा मूलभूत संदेश आहे.
आजच्या पिढीला संतविचारांची गरज आहे. त्यांच्यापुरते हे विचार केवळ आध्यात्मिक नाहीत. हे विचार जीवन जगण्याची पद्धत शिकवतात. सत्य, प्रेम, करुणा, संयम, कर्तव्य, समाजसेवा, समानता या मूल्यांची शिकवण संतांच्या वाड्मयातून मिळते. ही शिकवण कुटुंबात रुजली, तर समाजाची मुळेही नैतिकतेतच घट्ट बसतात. ज्येष्ठांचे संस्कार, संतसाहित्य, आदर्श व्यक्तिमत्त्वांचे अनुकरण आणि पालकांचे मार्गदर्शन या सर्वांचा समतोल हवा.
जुनी पिढीही अनेकदा आधुनिकतेला विरोध करताना दिसते. पण विरोध करण्यापेक्षा समजून घेणे गरजेचे आहे. मुलांना तंत्रज्ञान हवेच असते. कारण जग त्या दिशेने चालले आहे. मात्र, तंत्रज्ञानाच्या वापरात शिस्त, जाण आणि विवेकही आवश्यक आहे. हा विवेक देण्याचे काम घरातील ज्येष्ठांनी आणि पालकांनी करायचे असते. मुलांनी जसे ऐकायला हवे, तसेच पालकांनीही बदल स्वीकारायला हवा. दोन्ही पिढ्या एकत्र वाटचाल करतील, तेव्हाच संतविचारांचा वारसा पुढे नेला जाईल.
समाजातील अनेक घडामोडींमध्ये आज मूल्यांचा अभाव दिसतो. स्वार्थ, लालसा, हिंसा, असंवेदनशीलता यांचा प्रभाव वाढताना दिसतो. अशा वातावरणात तरुण मन अधिक गोंधळते. त्यांना
कोणावर विश्वास ठेवावा, कोणाचा आदर्श घ्यावा हे कळत नाही. म्हणूनच समाजातील मार्गदर्शक व्यक्ती, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, धार्मिक व सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन मुलांना बळ द्यायला हवे. त्यांच्या मनात आदर्श मूल्यांची बीजे पेरली, तर ती भविष्यात मोठे वृक्ष म्हणून उभी राहतील.
आजच्या पिढीला संस्कारांचे, संतविचारांचे आणि नैतिकतेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, तरच समाज सुदृढ राहील. प्रगतीचा वेग वाढतच जाणार आहे. आधुनिकता आणखी वाढणार आहे. पण मूल्यांना कधीही तडा जाऊ नये. संतांची शिकवण ही नेमकी हाच संतुलित जीवनमार्ग शिकवते. त्यांच्या विचारांवर चालले तर आधुनिकतेतही मनुष्यत्व टिकून राहू शकते. नवी पिढी बदलणारच. जग बदलणारच. परिवर्तन जगाचा नियम आहे, हे श्रीकृष्णाने महाभारतात सांगितले आहे. पण या बदलांना मूल्यांचा आधार असेल, तर समाजही सक्षम राहील आणि मनुष्यत्वही जपले जाईल. म्हणूनच संतविचारांचे संस्कार आज सर्वाधिक गरजेचे आहेत.

खरा विकास कोणता?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेला ‘खेड्यांचा विकास म्हणजे देशाची प्रगती’ हा मंत्र मावळ तालुक्याच्या वास्तवाशी आजही तितकाच लागू पडतो. मावळ हा निसर्गसंपदेने नटलेला भाग आहे. इंद्रायणीसारखी पवित्र नदी, गड किल्ले, वारकरी परंपरेचे अधिष्ठान आणि शेती, पशुपालनाला पोषक भौगोलिक स्थिती यामुळे येथे माणसाला आनंदी, सुरक्षित आणि समाधानी जीवन जगण्यासाठी आवश्यक सर्व घटक उपलब्ध आहेत. पूर्वी इंद्रायणीच्या स्वच्छ पाण्यावर आधारित शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांची मर्यादित गरज यातून मावळचा विकास आरोग्यदायी आणि संतुलित स्वरूपाचा होता. मात्र, गेल्या दोन दशकांत आधुनिकतेची झपाट्याने झालेली चाहूल मावळात मोठे बदल घडवून आणत आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, पर्यटनवाढ आणि शहरीकरणाच्या लाटेमुळे विकासाची नवी गंगा या भागात आली आहे. रस्ते, गृहनिर्माण प्रकल्प, व्यापार क्षेत्राची वाढ झाली आहे. रोजगाराच्या संधीही अधिक उपलब्ध होऊ लागल्या आहेत. परंतु या विकासासोबत काही सामाजिक प्रश्न गंभीरपणे पुढे आले आहेत. परप्रांतीयांचे प्रमाण वेगाने वाढत असून, स्थानिकांच्या जीवनशैलीवर आणि सांस्कृतिक संतुलनावर परिणाम जाणवू लागला आहे. वाहतूक, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणीय ऱ्हास आणि इंद्रायणीच्या प्रदूषणाचे प्रश्न गंभीर होत आहेत. पारंपरिकता जपणारा, नैसर्गिक जीवनशैली असलेला मावळ आज नागरी ताणतणावांना सामोरे जात आहे. म्हणूनच मावळच्या विकासाचा पुढचा टप्पा ‘समतोल विकासा’कडे वळण्याची गरज आहे. विकास झाला पाहिजे, पण तो माणूस आणि निसर्ग दोघांनाही पोषक असायला हवा. मावळची ओळख हीच त्याची ताकद आहे आणि भविष्यातील विकासही त्या ओळखीभोवतीच उभा राहायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

SCROLL FOR NEXT