तळेगाव ढमढेरे, ता. ८ : कासारी (ता. शिरूर) येथील शासकीय तळ्याच्या शेजारी असलेल्या पडीक जमिनीत अज्ञात टँकरद्वारे रात्रीच्या वेळी रसायनयुक्त पाणी सोडल्याने प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित झाला असून पाणी सोडणाऱ्या अज्ञाताविरुद्ध ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कासारी येथील शेतकरी शिवाजी काळकुटे यांच्या शेताशेजारील पडीक जमिनीत रात्रीच्यावेळी अज्ञात टँकरमधून रसायनयुक्त पाणी सोडल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या ठिकाणी रसायनयुक्त पाणी सोडले जाते त्या ठिकाणचे गवत पूर्णपणे जळून गेले असून जमिनीला भेगाही पडलेल्या आहेत. गेल्या दोन महिन्यापासून अनेकवेळा रसायनयुक्त पाणी येथील पडीक जमिनीत सोडले असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. येथून सुमारे २०० मीटर अंतरावर शासकीय तळे आहे. रसायनयुक्त पाणी पावसाच्या पाण्याबरोबर शेजारी असलेल्या शासकीय तळ्यात वाहून गेल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रसायनयुक्त पाणी सोडलेल्या जागेची शनिवारी (ता.८) शेतकरी शिवाजी काळकुटे, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत नरके, संतोष काकडे, रामदास भुजबळ यांच्यासह काही ग्रामस्थांनी केली. येथील रसायनयुक्त सोडलेले पाणी पावसाच्या पाण्यात शासकीय तलावात वाहून गेले असून शेजारीच गावची पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीच्या पाण्यातही हे रसायनयुक्त पाणी पाझरून गेले असावे असे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावची पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाण्याची तपासणी करावी तसेच संबंधित प्रदूषित रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या अज्ञात टँकर चालकाविरुद्ध त्वरित कारवाई करावी, अशी मागणी प्रशासक असलेल्या ग्रामसेवकांकडे ग्रामस्थांनी केली आहे.
कासारी येथील शासकीय तळ्याशेजारी असलेल्या पडीक जमिनीत रसायनयुक्त पाणी सोडण्यात आले असल्याची तक्रार भ्रमणध्वनीद्वारे ग्रामस्थांनी केली असून, त्यानुसार संबंधितावर नजर ठेवून त्वरित कारवाई करण्यात येईल तसेच विहिरीच्या पाण्याची त्वरित तपासणी केली जाईल.
- वसंत पवार, ग्रामसेवक
08326