पुणे, ता. १२ : संचेती रुग्णालयाच्या ६० वर्षपूर्तीनिमित्त अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज ‘अद्ययावत अस्थिरोग सुविधा’, ‘एआय इनोव्हेशन लॅब’ आणि ‘एआय संचलित डायग्नोस्टिक्स व रिहॅबिलिटेशन सुविधा’, गरजू रुग्णांसाठी ‘मोबाईल ऑर्थोकेअर युनिटस’ आणि ‘सॅनबो’ या विशेष मॅस्कॉटचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ. के. एच. संचेती यांनी १९६५ मध्ये केवळ १० खाटांच्या छोट्या रुग्णालयाने या संस्थेची स्थापना केली होती. ‘मोबिलिटी इज डिग्निटी’ या तत्त्वावर वाटचाल करत, रुग्णालय आज दरवर्षी लाखो रुग्णांवर उपचार करण्याच्या क्षमतेपर्यंत पोहचले आहे. गेल्या सहा दशकांत सांधेरोपण, मणक्याचे उपचार, बाल अस्थिरोग शास्त्र, ट्रॉमा, स्पोर्ट्स मेडिसिनसह अनेक उपशाखांमध्ये संस्थेने आपला ठसा उमटवला आहे. हा ऐतिहासिक टप्पा साजरा करताना, रुग्णालयाने ‘संचेती अॅडव्हान्स्ड ऑर्थोकेअर हॉस्पिटल’ ही नवीन १५० खाटांची अत्याधुनिक सुविधा सुरू केली आहे. या नवीन सुविधेमुळे संचेती रुग्णालयाची एकत्रित क्षमता आता ३०० खाटांपर्यंत पोहचली आहे, अशी माहिती यावेळी संचेती रुग्णालयातर्फे देण्यात आली.
संचेती रुग्णालयाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पराग संचेती म्हणाले, ‘‘आमच्यासाठी ६० वर्षांचा टप्पा हा अभिमानाचा क्षण आहे. ‘अभिनवता’ आणि ‘सेवा’ या मूल्यांवर आधारित हा प्रवास पुढे अधिक वेगाने सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे. नवीन तंत्रज्ञान, सेवा आणि पायाभूत सुविधा वाढविल्याने अधिक रुग्णांना तत्पर व उच्च दर्जाची सेवा देता येईल.’’
------------------