पुणे - रामकृष्णबुवा वझे हे भारतीय संगीताच्या इतिहासातील एक तेजस्वी तारा. कठोर परिश्रमानं उत्तरेकडील गायकी महाराष्ट्रात आणण्याचं श्रेय मिळवणाऱ्यांच्या यादीतील हे एक अग्रगण्य नाव. त्यांच्या बंदिशी आणि गायन केलेली नाट्यपदे फेसबुकच्या माध्यमातून रसिकांना एेकायला मिळणार आहे.
सावंतवाडी संस्थानातल्या वझरे गावातील रामकृष्ण नावाचा मुलगा संगीताचा ध्यास घेऊन वयाच्या बाराव्या वर्षी घर सोडतो आणि मजल दरमजल करत उत्तर हिंदुस्थानात जाऊन, गुरुगृही राहून विद्या प्राप्त करतो, मैफिली गाजवतो, अनेक नाट्यपदांना चाली देतो. नेपाळमधे राजगायक असण्याचा सन्मानही मिळवतो. प्रचंड मान-मरातब, प्रतिष्ठा, नावलौकीक कमावतो. आता त्यांना जाऊन सत्याहत्तर वर्षे लोटली पण आजही त्यांचे गाणे रसिकांच्या मनात आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बुवांच्या काळी नोटेशनची पुस्तके नव्हती. शिष्याने गुरूला रागाचे नावदेखील विचारायची सोय नव्हती. ज्या काळी नामवंत गवई स्वतःजवळील विद्या धनसंचयाप्रमाणे गुप्त ठेवत असत त्या काळी बुवांनी स्वतः जरी अपरंपार कष्ट सोसून ही विद्या प्राप्त केली असली तरी दुस-याला तसा त्रास सोसायला लागू नये ह्या भावनेतून त्यांनी ती मुक्तपणानं स्वतःच्या शिष्यवर्गास शिकविली. अनेक दुर्मिळ रागांची माहिती व चिजा ह्या स्वरलिपी व ताललिपीसकट "संगीत- कला-प्रकाश" ह्या पुस्तकाच्या दोन भागांतून प्रकाशित केल्या. बुवांनी नऊ ध्वनिमुद्रीकांसाठी गायनही केले. वझेबुवांचे गाणे आज थोड्याफार प्रमाणात तरी उपलब्ध आहे.
पाच मे रोजी बुवांची पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांची खापरपणती श्रुती वझे हिने त्यांना आदरांजली म्हणून एक संकल्प योजिला आहे. यात सध्याचे युवा कलाकार वझेबुवांच्या संग्रहातील बंदिशी व त्यांनी संगीतबद्ध केलेल्या नाट्यपदांचं सादरीकरण करतील. ह्या सर्व सादरीकरणाचे व्हीडीओ मिलन गंधार या फेसबुक पेजवर दि. पाच मेपासून अपलोड होणार आहेत.
श्रृती वझे म्हणाल्या, "संकल्पनेवर विचार करत असताना असे लक्षात आले की वझेबुवांचे उपलब्ध असलेले ध्वनीमुद्रण खूप जुने व अस्पष्ट आहे. त्यावेळची स्वरलेखन पद्धतीही प्रगत नसल्यामुळे बंदीशींचे आकलन होण्यातही अडचण निर्माण झाली. त्यामुळेच आताचे कलाकार या बंदीशींचे आणि नाट्यपदांचे सादरीकरण हे उपलब्ध साहित्यासमवेतच स्वतःच्या आकलनानुसार व प्रतिभेनुसार करणार आहेत."
"शतजन्म शोधिताना, मर्मबंधातली ठेव ही, आपदा राज्यपदा भयदा, बोल रे पपीहरा, सुहास्य तूझे, दिव्य स्वातंत्र्य रवी, जल जमुना भरन - ठुमरी, हरदम मौला, परवशता पाश दैवी ही, अशी अनेक पदे व बंदीशी युवा कलाकार या कार्यक्रमाअंतर्गत सादर करणार आहेत. या उपक्रमात सहभागी झालेले सुमारे 37 कलाकार हे वझेबुवांची नाट्यपद आणि त्यांनी बांधलेल्या, त्यांच्या संग्रही असलेल्या बंदिशी सादर करणार आहेत.
वझे बुवांनी संगीत दिलेली नाटकं : संगीत रणदुंदुभी, संगीत सन्यस्तखड्ग, संगीत राक्षसी महत्वाकांक्षा, संगीत हाच मुलाचा बाप, संगीत शहा शिवाजी, संगीत संन्याशाचा संसार ही काही गाजलेली नाटके.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.