Dhing tang article Invitation
Dhing tang article Invitation 
संपादकीय

ढिंग टांग : निमंत्रण!

ब्रिटिश नंदी

बेटा : (धाडकन एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण....मम्मा, आय ॲम बॅक!

मम्मा मॅडम : (महत्त्वाची कागदपत्रं हातावेगळी करत) हं!

बेटा : (वैतागून) मी खूप दमलोय! कुछ खाने को दो!!

मम्मा मॅडम : (कामात बिझी...) हं...हं!

बेटा : (संतापाचा स्फोट होत) कमॉन...‘तुझ्यासाठी पिझ्झा ठेवलाय, तो खा’ असंही तू म्हणणार नाहीएस का आज?

मम्मा मॅडम : (थंड आवाजात) पिझ्झा संपलाय, बेटा!

बेटा : (धक्‍का बसून) ओह... मग आता? एक वडापाव मिळेल का, वडापाव?

मम्मा मॅडम : (शांतपणे) थोडं थांब... जेवूनच घे! मी एवढी निवेदनं मार्गी लावते तोवर!!

बेटा : या जगात भुकेल्यांना कुणीच वाली नाही का?

मम्मा मॅडम : (अचानक भानावर येत) इतकी का तुला भूक लागली आहे? कुठून येतो आहेस?

बेटा : (नाराजीने) मैं बहुत दूर से आया हूँ मम्मा!! मी काश्‍मीरहून परत येतोय!

मम्मा मॅडम : (धक्‍का बसून) काश्‍मीर? बाप रे! तिथली दुकानं सध्या बंद आहेत म्हणे! तिथं कुठला मिळणार वडापाव?

बेटा : (चिडून) पॉइण्ट नंबर वन... काश्‍मीरमध्ये वडापाव मिळत नाही! दोन, मी तिथे वडापाव खायला गेलो नव्हतो! तिथल्या गव्हर्नरसाहेबांनी मला जेवणाचं निमंत्रण दिलं होतं म्हणून गेलो होतो! 

मम्मा मॅडम : (कुतूहलानं) मग?

बेटा : (चिडचिडत) मग काही नाही! तिकडे गेलो! त्यांच्या घराच्या दारावर बेल वाजवतोय, वाजवतोय! पण कुणी दार उघडेल तर शपथ!! बराच वेळ कुणी दार उघडलंच नाही!!

मम्मा मॅडम : (आश्‍चर्याचा धक्‍का बसून) ओह माय गॉड... काय बाई हे वागणं एकेकाचं! 

बेटा : (हात उडवत) हे तर काहीच नाही! तिथं दारावर पाटी होती- ‘श्रावणानिमित्त खाणावळ बंद राहील’!! 

मम्मा मॅडम : (कपाळावर हात मारत) कर्म माझं!

बेटा : (सदरा चाचपत) तिथं दारावर आणखी एक पाटी होती- ‘कुत्र्यापासून सावध राहा!!’ मग नाइलाजाने निघून आलो! तिथं एरवी बत्तीस कोर्सचं काश्‍मिरी ‘वाझवान’ भोजन मिळतं, तिथं या वेळी वडापाव सोड, साधा चहासुद्धा नाही मिळाला!

मम्मा मॅडम : गेलास कशाला तिथं... त्यांच्यात?

बेटा : (खांदे उडवत) जायला नको? देशातल्या गरीब, मजदूर आणि किसानांसाठी आपण काम करतो! काश्‍मीर से कन्याकुमारी तक सगळ्या देशाची काळजी मला वाहायची आहे, असं तूच मला इलेक्‍शनपूर्वी सांगायचीस ना?

मम्मा मॅडम : (हताशेनं) हो रे! पण ते इलेक्‍शनच्या आधी सांगितलं होतं...

बेटा : (दुर्लक्ष करत) काश्‍मीरमधली परिस्थिती कशी आहे, हे बघायला आम्ही सगळे गेलो होतो! सगळे म्हंजे सगळ्या पक्षाचे नेते एकाच विमानाने गेलो होतो! पण विमानतळावून आम्हाला परत पाठवण्यात आलं! फुकट खेप झाली!! तिकीट वाया गेलं ते गेलंच! 

मम्मा मॅडम : (सात्त्विक संतापानं) हे काय मेलं यांचं वागणं? स्वत:च निमंत्रण द्यायचं आणि पाहुण्याला दारावरून माघारी पाठवायचं! शोभतं का हे? 

बेटा : (तावातावाने) नंतर फोन करून म्हणतात काय, तर तुम्हाला एकट्याला बोलावलं होतं, ‘तुम्ही सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्रांसह’ वरातच घेऊन पोचलात! आमच्याकडे इतक्‍या लोकांचं जेवण नव्हतं!

मम्मा मॅडम : (हाताची घडी घालून) ते तुमचं जरा चुकलंच! इतकं वऱ्हाड घेऊन गेला नसतास, तर किमान कांदेपोहे तरी मिळाले असते!

बेटा : (खचून) काश्‍मिरात कांदेपोहे?

मम्मा मॅडम : (सल्ला देत) पुढल्या वेळेला कुठंही जाताना मला सांगून जात जा! मी डबा देत जाईन... कळलं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT