eat salt sparingly who warning human health
eat salt sparingly who warning human health sakal
संपादकीय

मिठाचा हट्टाग्रह!

सकाळ वृत्तसेवा

मीठ आणि आपला जीवनव्यवहार यांचा अन्योन्य संबंध आहे. समाजव्यवहारात मिठावरून म्हणी, वाक्प्रचारही रुढ आहेत. ‘खाल्ल्या मिठाला जागणे’ असे आपण म्हणतो.

आपली महागडी जीवनशैली टिकविण्यासाठी जे सतत प्रयत्न करीत राहतात, ते खरे गरीब..

— होजे मोहिका, उरुग्वेचे माजी अध्यक्ष

मीठ आणि आपला जीवनव्यवहार यांचा अन्योन्य संबंध आहे. समाजव्यवहारात मिठावरून म्हणी, वाक्प्रचारही रुढ आहेत. ‘खाल्ल्या मिठाला जागणे’ असे आपण म्हणतो. मिठावरील कर कमी करावा या मागणीसाठी ब्रिटिश आमदनीत महात्मा गांधींनी प्रसिद्ध दांडीयात्रा काढली.

त्यावेळी ‘उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया’ या ओळी सर्वतोमुखी झाल्या. पण आधुनिक काळात जास्त मीठ रिचवल्याने आरोग्याचा खचला पाया असे म्हणण्याची वेळ आली आहे. मिठाशिवाय माणसाचं जगणं आळणी आणि मिळमिळीत आहे, सगळं बेचव आहे, हे तर खरेच.

पण ते प्रमाणाबाहेर गेले की धोकादायक ठरते. मिठाचे हे आख्यान मांडायचे कारण म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगातील तमाम जनतेला ‘मीठ जरा जपूनच खा’, जेवणातून ते शक्य तितके कमीच करा, असा धोशा लावला आहे.

दैनंदिन आहारातील मीठ तीस टक्क्यांनी कमी करण्याचा निर्धार २०१३मध्ये करण्यात आला होता. हे उद्दिष्ट २०२५पर्यंत पूर्ण व्हावे, असे ठरले होते. तथापि, त्या दिशेने जगभरातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच देशांनी पावले उचलली. यामध्ये ब्राझील, चिली, चेक प्रजासत्ताक, उरुग्वे, सौदी अरेबिया, स्पेन, मेक्सिको अशा निवडक देशांचा समावेश होतो.

मात्र, भारतासह बहुतांश देशांनी त्या दृष्टीने भरीव आणि ठोस पावले उचलली नाहीत. मिठाच्या वापराबाबत जनजागृती आणि त्यासाठी अन्नपदार्थ उत्पादकांना मार्गदर्शक सूचना करण्याबाबत या देशांच्या शासनसंस्थांनी मिठाची गुळणीच घेतलेली आहे. धोरणात्मक ठोस कार्यवाही केलेली नाही, ही खेदाची बाब आहे.

काही दशकांमधील वेगवान औद्योगिकीकरण, अन्नप्रक्रिया उद्योगांचा विस्तार, जागतिकीकरण, पोटापाण्यासाठी घरदार सोडून इतरत्र जाणे आणि अन्य स्थित्यंतरांमुळे आपल्या जीवनशैलीत आणि खानपान पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. बैठी जीवनशैली वाढल्याने आरोग्यविषयक नवनव्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

आहारातील वाढलेल्या मिठामुळे हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे विकार, आजार, पक्षघात, मूत्रपिंड तसेच इतर आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रदुषणापासून इतरही कारणे यामागे आहेत. पण याचे मुख्य कारण घरच्या रुचकर, ताज्या अन्नापेक्षा पॅकेज्ड, प्रोसेस्ड फूडची नको इतकी लागलेली गोडी आणि असलेली क्रेझ. फास्टफूडची भुरळ सातत्याने वाढतच आहे.

मॉलमधील आकर्षक वेष्टनातील सीलबंद देशी-विदेशी पदार्थांची रेलचेल ग्राहकांना खेचत आहे. मात्र, त्यातील मिठाचा अवाजवी वापर पदार्थांची लज्जत वाढवण्याबरोबर आरोग्याच्या गंभीर समस्येला निमंत्रण देत आहे. गरीब आणि श्रीमंत अशा दोन्हीही देशांना अतिरिक्त मीठ सेवनाने ग्रहण लावले आहे.

उच्च उत्पन्न गटातील देशात प्रक्रिया केलेल्या पदार्थांमुळे आहारातील मीठाचे प्रमाण ७५टक्क्यांनी वाढते आहे. निम्न उत्पन्न गटातील देशात सॉस, सूपसह घरगुती पदार्थांमधील मिठाचा वाढता वापर चिंताजनक आहे. लोणची, पापड, नमकिन, फरसाणसह सीलबंद आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा वापर आपल्याकडेही फार वेगाने वाढलेला आहे. त्यातून गरजेच्या कितीतरी पट मीठ आपण रोज रिचवत असतो.

जगात दररोज आठ ते एकोणीस ग्रॅम मीठ विविध माध्यमातून एक व्यक्ती सेवन करते. आरोग्य संघटना सांगते की, मोठ्या व्यक्तीने दररोज विविध माध्यमातून पाच ग्रॅम मीठ (दोन ग्रॅम सोडियम); तर मुलांनी तीन ग्रॅम मीठ सेवन करणे योग्य आहे. या प्रमाणाबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत, तथापि त्याच्या अतिरिक्त सेवनाच्या धोक्याबाबत दुमत नाही.

आरोग्य संघटनेच्या सूचनेचे पालन केल्यास वर्षाला हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, पक्षघाताने होणारे २५ लाख मृत्यू टाळता येतील, असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या आकड्याबाबत दुमत होऊ शकेल. परंतु आरोग्य यंत्रणेवरील ताण कितीतरी कमी होईल, हे तर खरेच आहे.

‘सरदार मैंने आपका नमक खाया हैं,’ या ‘शोले’तील संवादाची आठवण आता वेगळ्या संदर्भात होते. ‘जादा नमक खाया, तो अब (दवा की) गोली खां’ असे जणू आजचा ‘गब्बरसिंग’ म्हणतो आहे. गरज आहे ती तो इशारा गांभीर्याने घेण्याची आणि गोळ्या खाण्याची वेळ येऊ न देण्याची. आहारातील मीठ कमी करण्यासाठी सरकारने धोरणात्मक पावले उचलली पाहिजेत.

जनजागृतीद्वारे मिठाचा वापर कशा प्रकारे कमी करता येईल, यावर भर द्यावा. धकाधकीच्या या काळात प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे अशक्य असले तरी त्यातील मिठाचे प्रमाण घटवणे शक्य आहे. त्यासाठी सीलबंद पदार्थ उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांमधील मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रवृत्त करावे. वेष्टनावर ‘कमी मिठाचा पदार्थ’ असा ठळक उल्लेख करायला भाग पाडावे.

कोणत्या प्रकारच्या पदार्थात मिठाचे तसेच सोडियम घटक असलेल्या पदार्थांचे कमाल प्रमाण किती असावे, याचीही मानके निश्‍चित करावीत. त्याच्या जोडीला मिठाच्या अतिरिक्त वापराने जगण्याला बसणारी खीळ किती जीवघेणी आहे, हे पटवून देण्यासाठी जनजागृती करावी. मिठाच्या अतिरिक्त सेवनाने आजार बळावतात, तर त्याचे शरीरातील प्रमाण घटल्यानेही प्रसंगी गुंतागुंतीचे आजार किंवा समस्या उद्भवतात. त्यामुळे तारतम्यानेच मीठ खाणे उत्तम!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT