women health care awareness
women health care awareness sakal
संपादकीय

जीवनशैली उंचावण्यासाठी ‘आरोग्यजागर’

सकाळ वृत्तसेवा

जनतेचे आरोग्य उत्तम राहावे, वेळीच प्रतिबंधत्मक उपायांद्वारे आरोग्यसंवर्धन व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

- गिरीश महाजन

जनतेचे आरोग्य उत्तम राहावे, वेळीच प्रतिबंधत्मक उपायांद्वारे आरोग्यसंवर्धन व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच कोणत्याही आजाराचे सुरवातीच्या टप्प्यात निदान करून उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी विविध आजारांबाबत जनजागृती मोहिमा, अभियानांचा उपक्रम हाती घेतला आहे.

‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीप्रमाणे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. प्रत्येकजण निरोगी व सदृढ असावा यासाठी नियमित व्यायाम, सकस आहार, स्वच्छता इत्यादींकडे बारकाईने लक्ष गरजेचे आहे. मात्र धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होते. बदलते हवामान, संकरीत अन्न-धान्य, बदलती जीवनशैली, चुकीची आहार पद्धती, व्यसनाधीनता, व्यायामचा अभाव इत्यादी कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर व्याधींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आरोग्याबाबत जनजागृती आवश्यक आहे. हे लक्षात घेवून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामार्फत राज्यामध्ये विविध अभियान (मोहीम) राबवले जातात.

गेल्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यभरात रक्तदान मोहीम, तसेच ४ मार्च रोजी जागतिक स्थूल दिनानिमित्त स्थूलपणा विरोधी मोहीम हाती घेतली. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्ताने स्तनाचा कर्करोग प्रतिबंधासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली. तसेच, २० मार्चपासून जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्ताने ‘स्वच्छ मुख अभियान’ सुरू केले. यातून सर्वांगिण आरोग्य संवर्धनाला अग्रक्रम दिला आहे.

रक्तदानाबाबत जनजागृती

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत़ संस्था, महाविद्यालये आणि संलग्नित रुग्णालये यांमधून आरोग्य, शैक्षणिक आणि इतर सेवा पुरविल्या जातात. वाढती लोकसंख्या आणि दिवसागणिक अपघातांचे वाढते प्रमाण पाहता भविष्यात रक्तपुरवठा मुबलक व्हावा याकरीता रक्तदान मोहीम राबविली जात आहे. मोहिमेद्वारे रक्तदानाबाबत जनजागृती, रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. रुग्णसेवेची निकड पूर्ण होईल इतक्या मुबलक प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालये व संलग्नित रुग्णालये यांच्या स्तरावर बॅनर, पोस्टर स्पर्धा, रॅली, सामाजिक कार्यक्रम याद्वारे जनजागृती करण्यात आली.

स्थूलपणाची समस्या

देशातील लठ्ठपणाचे प्रमाण राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण चार ते पाच दरम्यान महिलांमध्ये २०.६%वरून २४%; तर पुरुषांमध्ये १८.९%वरून २२.९% वाढले आहे. लहान मुलांमध्ये देखील हे प्रमाण २.१%वरून ३.४% झालेले आहे. संशोधनातून असे निदर्शनास येते की, लहान वयात लठ्ठ असलेली मुले मोठेपणी लठ्ठ होण्याची शक्यता खूप जास्त असते. वीस वयापर्यंत शरीरातील चरबीच्या पेशींची संख्या वाढू शकते. नंतरच्या आयुष्यात त्यात १०% फरक पडतो. म्हणून लहान मुलांमधील लठ्ठपणा हा प्राधान्याचा आरोग्य प्रश्न आहे. म्हणूनच शासनाने हे अभियान सुरू केले आहे.

मुले लठ्ठ होण्यामागे काही महत्त्वाची कारणे अशी: वारंवार आणि जास्त खाणे, गोड पदार्थ, जंक फूड तसेच जेवणात कर्बोदके अधिक आणि प्रथिने कमी असणे, व्यायामाचा अभाव यामुळेही लठ्ठपणा वाढत आहे. ‘वारंवार खाल्ल्याने रक्तातील इन्सुलिन वाढते. इन्सुलिनचे प्रमाण वाढल्यास लठ्ठपणा येतो, मग इन्सुलिन प्रतिरोध निर्माण होतो. त्याचे पर्यवसान टाइप-२ मधुमेहात होते’ हा अभियानातील महत्त्वाचा संदेश आहे. कडकडून भूक लागल्यावरच खाणे, नियमीत संतुलीत आहार, गोडाचे प्रमाण कमी, आहारात कर्बोदके कमी करून प्रथिनांचे प्रमाण वाढवणे, दररोज किमान तासभर मैदानी खेळ खेळणे यावर भर दिला पाहिजे.

पालकांनीही मुलांना गोडधोड, तेलकट, तुपकट पदार्थ मर्यादीत खाण्याची सवय लावावी. अंगमेहनतीचे महत्त्व त्यांना पटवून द्यावे. मेंदूत रक्तस्त्राव, उच्च रक्तदाब, रक्तातील कोलस्टेरॉल वाढणे, लवकर मोतीबिंदू होणे, यकृत, पित्ताशय यांचे आजार, सांधेदुखी, श्वसनाला त्रास, मासिक पाळीतील अनियमितता, काही प्रकारचे कर्करोग यांना वाढत्या लठ्ठपणाने निमंत्रण मिळते. वैद्यकिय शिक्षण विभागाच्या माध्यमातून स्थूलपणाला प्रतिबंधासाठी जनजागृती व उपचार अभियानाची घोषणा केली आहे. अभियानाची सुरुवात ४मार्च रोजी जागतिक स्थूलपणा दिवसापासून सुरू करण्यात आली.

चिंताजनक स्तनाचा कर्करोग

स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. मात्र, त्याचा धोका केवळ महिलांनाच नव्हे तर काही प्रमाणात पुरुषांमध्येही असतो. ‘ग्लोबोकॉन’च्या २०२०च्या आकडेवारीनुसार, स्तनाच्या कर्करोगाचे जागतिक स्तरावर २२लाख६१ हजार नवीन रुग्ण आढळले आणि सहा लाख ८४ हजार रुग्णांचा स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. भारतात महिलांमध्ये निदान झालेल्या एकूण सहा लाख ७८ हजार कर्करुग्णांपैकी एक लाख ७८ हजार३६१ (२६.३%) रुग्ण स्तनाच्या कर्करोगाचे होते.

स्तनाच्या कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास रुग्णास जीवदान मिळण्याची शक्यता अधिक असते. स्तनाच्या कर्करुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. रोगाची लक्षणे अशी - स्तनाच्या कोणत्याही भागात गाठ, अथवा वेदना होणे. स्तनावर सूज येणे, जळजळणे अथवा डाग पडणे. स्तनाग्रातून रक्त येणे, लालसर होणे, स्तनांच्या आकारात बदल दिसणे. महिलादिनी (ता.८) कामा आणि आल्बेस हॉस्पिटल, मुंबई येथे स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती व उपचार मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

या मोहिमेंतर्गत मोबाईल युनिटची स्थापना करण्यात येणार असून त्याव्दारे जनजागृती, प्रशिक्षण, तपासणी व संदर्भीय सेवा देण्यात येणार आहेत. प्रत्येक संस्थेमध्ये नोडल ऑफीसर हे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने क्षेत्रीय मोहीम राबवतील. शाळा, सार्वजनिक संस्था व कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करतील. क्षेत्रीय मोहिमेसाठी बॅनर्स, प्रचारपत्रके, भित्तीपत्रांव्दारे जनजागृती मोहीम राबविली जाईल.

स्वच्छ मुख अभियान

जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्ताने (ता.२०) ‘स्वच्छ मुख अभियान’ राज्यभरातील दंत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने तोंडाच्या आरोग्यासंदर्भात तपासणी आणि उपचार मोहीम हाती घेतली आहे. शरीर स्वास्थ्यासाठी मौखिक आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, मुख व दंत आरोग्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. तंबाखू व गुटखा खाणे आणि त्यातून होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण यात आश्चर्यकारक वाढ दिसते. मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे इतर मोठ्या आजारांनाही निमंत्रण मिळते. म्हणूनच मौखिक आरोग्य संपूर्ण आरोग्याची गुरुकिल्ली म्हटले पाहिजे. त्यामुळे शासनाने मौखिक आरोग्याबाबत जनजागृतीसाठी ‘स्वच्छ मुख अभियान’ राबविण्याचे ठरविले आहे.

कॅलेंडर, मोहीम आणि शिबिर या त्रिसूत्रीद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अभियान राबविण्याचा शासनाचा निर्धार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या जागतिक मौखिक आरोग्यदिनी या मोहिमेला प्रारंभ केला आहे. या अभियानांतर्गत पोस्टर्स, जाहिराती, व्हिडिओ, मिरवणुका, विविध स्पर्धा यांच्याद्वारे जनजागृती केली जात आहे. या अभियानांतर्गत एक मोठी पाहणीदेखील करण्यात येणार आहे.

सरकारने जनतेच्या आरोग्याबाबत जनजागृतीवर अधिकाधिक भर दिला आहे. सुदृढ महाराष्ट्राचे ध्येय ठेवून आजार होण्याआधीच दक्षता बाळगण्याला अग्रक्रम दिला आहे. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि वातावरणातील बदल व प्रदूषण यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हे तत्त्व ठेवून प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला जात आहे.

(लेखक महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास व पंचायत राज, क्रीडा व युवक कल्याण खात्याचे मंत्री आहेत.)

(शब्दांकन : दीपक नारनवर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT