Mukund Vetal Writes About India First india toy fair 2021 Narendra modi
Mukund Vetal Writes About India First india toy fair 2021 Narendra modi  
संपादकीय

हा ‘खेळ’ बाजारपेठेचा!

मुकुंद वेताळ

लहान मुलांची खेळणी तयार करण्यात व त्याच्या निर्यातीत चीनने आघाडी घेतली आहे. वास्तविक भारतालाही या क्षेत्रात पुढे जाण्यास मोठा वाव आहे. पंतप्रधानांनी उद्योजकांना केलेल्या आवाहनाची त्यामुळेच दखल घ्यायला हवी. बाजारपेठेच्या "खेळा''त तयारीनिशी उतरायला हवे. 

हजारो वर्षांपासून भारतात अनेक प्रकारची खेळणी बनविली जात आहेत. मोहेंजोदडो आणि हडप्पामधील उत्खननात सापडलेल्या मातीच्या पक्‍क्‍या भाजलेल्या खेळण्यांमधून हे स्पष्ट झाले आहे. तत्कालिन अखंड भारतवर्ष घनदाट अरण्यांनी व्यापलेले होते. पुढच्या काळात  लाकडांच्याही खेळण्यांची निर्मितीही झाली असावी; पण कालौघात अनेक संस्कृती अनेक नैसर्गिक आपत्तींत लोप पावल्या आणि लाकडासारख्या नाशवंत वस्तू आणि खेळणी यांचे महत्त्वाचे इतिहासाचे पुरावे नष्ट झाले असल्याने रामायण आणि महाभारतासारख्या पुराणांतून व्यक्त झालेले खेळ आणि खेळण्यांचे उल्लेख हे निर्मितीचे प्रमाण मानायला हरकत नाही. खेळण्यांच्या या दुनियेत अनेक स्थित्यंतरे झाली असतीलही; पण जगातले प्रत्येक मूल त्याच्या बाल्यावस्थेत त्याच्या उपलब्ध खेळण्यांबरोबर खेळता खेळताच प्रौढ होते, ही बाब संपूर्ण मानवी संस्कृतीला लागू पडते. 

बेरोजगार तरुणांसाठी सरकारचं 'सक्षम' पाऊल; पोर्टलमधून मिळणार १० लाखांना रोजगार

''सात समंदर पार करके, 
गुडियोंकी बाजारसे 
अच्छि सी गुडिया लाना 
पापा जल्दी आ जाना,''

यात व्यक्त झालेले मनोगत भाषा, प्रांत, देशांच्या सीमा ओलांडून सर्वत्र लागू पडते. सातासमुद्रापारच्या बाहुल्यांचे आकर्षण जसे आपल्या इथल्या बालकांना असते, तद्वतच भारतीय खेळण्यांकडेही  सातासमुद्रापारची बालके आकर्षित होत. पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधने आजच्यासारखी विकसित नसली, तरी भारतीय लाकडी खेळण्यांचा व्यापार जलमार्गाने चालत होता. याचाही उल्लेख अनेक साहित्यात आढळतो. अनेक दिव्ये पार करून जादुईनगरीत पोहोचलेला राजकुमार आम्ही वाचला आहेच ना! असं म्हणतात, की त्या त्या काळातील निर्मित खेळण्यांमधून त्या त्या देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब त्यात उमटते.  पाश्‍चिमात्य जगतातून निर्माण झालेल्या ‘बार्बी डॉल’ने जगालाच भुरळ घातली. जागतिक निर्यात आणि विक्रीचे उच्चांक तिने पार केले आणि चीनसारख्या देशाने तिचा मूळ आकार तसाच ठेऊन पण नाक, डोळे, तोंड चिनी ढाच्यात बदलवून तिची पुनर्निर्मिती केली आणि आज जागतिक बाजारपेठेत चंचूप्रवेश केला आहे. नंतर तर अनेक खेळण्यांच्या नकला करत पूर्णतः खेळण्यांचा बाजार काबीज केला. आज चीन जगातला खेळणी निर्यात करणारा प्रथम क्रमांकाचा देश ठरला आहे. पण खेळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकमध्ये अनेक घातक रासायनिक घटकांचा वापर केल्याचे आढळल्याने बालकांमध्ये अनेक प्रकारचे विकार उत्पन्न होऊ शकत असल्याने त्या खेळण्यांच्या विक्रीवर परिणाम होताना दिसत आहे. शिवाय "यूज अँड थ्रो''च्या स्वरूपातल्या या तकलादू वस्तू पर्यावरणासाठीही अनेक अंगांनी घातक ठरू पाहत आहेत. सद्यःस्थितीत चीन आपली विश्‍वासार्हताच गमावून बसला आहे. त्यात "घर फिरले की घराचे वासेही फिरतात'' प्रमाणे "कोरोना''ने जगात थैमान घातले आहे. यात आजतागायत लाखो लोक मरण पावले आहेत. कोट्यवधी लोक बाधित होताना दिसत आहेत. याचा "कर्ता करविता'' कोण आहे हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे अनेक उद्योग-व्यवसाय तिथून स्थलांतरित होत आहेत. या सर्व घटनांचा सारासार विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच देशातील पहिल्या खेळणी प्रदर्शनाचे उद्‌घाटन करताना पर्यावरणपुरक खेळण्यांच्या निर्मितीचे भारतीय उद्योजकांना आवाहन केले आहे.
 
EPFO : भविष्य निर्वाह निधीवर मिळणार इतकं व्याज; जाणून घ्या कसा चेक करणार बॅलन्स​

शंभर अब्ज डॉलरच्या जगातील खेळणी उद्योगात आहे. त्यामुळे ८५ टक्के खेळणी आपणाला आयात करावी लागतात. पंतप्रधानांना चीनच्या हातातून सुटू पहात असलेली खेळण्यांची बाजारपेठ डोळ्यापुढे असली तरी भारतीय बाजारपेठही गृहीत धरून मूळ खेळण्यांच्या भारतीय उद्यमशीलतेला नवी पर्वणीच आता निर्माण झाली आहे. प्रश्‍न आहे तो पर्यावरणपुरकतेचा. आजच्या घडीला भारतात लाकडांपासून पाहिजे तशी खेळणी तयार होत आहेत. यासाठी फर, साग, देवदार, बेल, खैर, चंदन अशा लाकडांचा उपयोग करून छान ‘विंटेज कार’ची प्रतिकृति खेळण्यातून निर्माण होताना दिसत आहे. पण त्यासाठी वृक्षतोड केली जाऊ नये. शेतकऱ्यांनी हजारो हेक्‍टरवर आधीच साग आणि चंदनांच्या झाडांच्या लागवडी व्यापारी दृष्टिकोनातून सुरू केल्या आहेतच. त्याच म्हणजे चंदनाच्या सुवासिक गाभ्याला काढल्यानंतर उर्वरित लाकूड उपयोगात आणता येऊ शकते. कारण चंदनासारखे मृदू आणि मुलायम लाकूड दुसरे तरी नसावे. निव्वळ महाराष्ट्राचा विचार करता सावंतवाडीला आजही लाकडी खेळण्यांचे छोटे-मोठे कारखाने आहेत. त्यातील कुशल कारागिरांची या कामी निश्‍चित मदत होऊ शकते. पुण्यात आप्पा बळवंत चौकाजवळ नातूंच्या वाड्यात फक्त कापडापासून बाहुल्या बनविण्याचा कारखाना होता. या बाहुल्या कित्येक वर्षे निर्यात होत होत्या. अशा बंद अवस्थेतील उद्योगांना ऊर्जितावस्था निर्माण करण्यायोग्य वातावरण सध्या तरी आहे. याशिवाय ‘डिजिटल खेळण्या’चे एक मोठे दालनही आहे. आपल्याकडचे अनेक बुद्धिमान तरुण युरोप-अमेरिकेत आय.टी.क्षेत्रात काम करीत आहेत. खरे म्हणजे त्यांच्या प्रतिभेला वाव मिळेल, असेच हे खेळांच्या उत्पादनाचे क्षेत्र आहे. कथनाधारित खेळ तयार करण्यासाठी समृद्ध असे सांस्कृतिक धन आपल्या परंपरेत आहे. त्याचा उपयोग करता येईल. डिजिटल खेळणी तयार केली, तर अब्जावधी डॉलरच्या बाजारपेठेत वाटा मिळवू शकतो.  

राहाता राहिला खेळण्यांसाठी एखादे पर्यावरणपूरक माध्यम शोधण्याचा भाग. या इथे बुद्धिवंतांना काहीच कमी नाही हेच ओळखून पंतप्रधानांची हाक महत्त्वाची ठरते. आपल्या निसर्गात कावळीसारखी वेलवर्गीय वनस्पती एकच पान खुडता भळभळा त्यातून पांढरा चिक निथळत रहातो. त्यातून टणक आणि तन्यता गुणधर्म असलेला चेंडू बनवून पाहिला आहे. बांधावरचा शेवगा आणि त्याच्या खोडावर आलेला चिकट लिबलिबित रबरासारखा डिंक प्रक्रिया करून खेळण्यांसाठीचे माध्यम होऊ शकते; पण त्यावर संशोधनाची गरज आहे. गंगायमुनेच्या सुपीक किनाऱ्याच्या मातीतून अतिशय सुंदर भांडी बनू शकतात; मग खेळणीही बनतीलच ना! आज भारतातील धातुशास्त्र खूप प्रगतिपथावर आहे, कॉपर आणि ब्राससारखं माध्यम खेळण्यांसाठी वापरून पर्यावरणपूरक खेळण्यांची निर्मिती होऊ शकते. कारण धातूंचे विघटन लवकर होते.

हेही वाचा - ताज महलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवाच; नोकरभरती रद्द केल्याच्या रागातून केला प्रताप

राज्याराज्यात असे खास खेळण्यांसाठीच ‘राखीव झोन’ निर्माण केल्याने पडीक, क्षारपड, चिबड जमिनी वापरात आणता येऊन हजारो हातांना रोजगार निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बेरोजगार आपल्या मिळणाऱ्या रोजीरोटीवर छान जीवन जगू शकतात. एकूणच अशा उद्यमशीलतेने भारताची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते. आज इंडोनेशियाजवळ समुद्रात प्लॅस्टिकचे एक मोठे बेटच तयार झाले आहे. त्याने अनेक जलजैविकांच्या जातींचे या निसर्गातून कायमचे उच्चाटन होत आहे. म्हणून तर प्लॅस्टिकचा हा अनिर्बंध वापर टाळता येऊ शकतो. शिवाय बालबच्चे हातात दिलेली वस्तू तोंडात घालतातच हा त्यांचा स्थायीभाव आहे. नकळत होत असलेला हा त्यांच्या जीवाशी खेळ पर्यावरणपूरक खेळण्या निर्मितीतून टाळता येऊ शकतो. त्यातून देशाचा मोठा लाभ होईल. 

(लेखक ‘खेळ व शिक्षण' या विषयाचे अभ्यासक असून निवृत्त शिक्षक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT