satirical-news

ढिंग टांग  : दिल्लीश्‍वरी!

ब्रिटिश नंदी

जेहत्ते काळाचें ठायी। ऐसे नगर दुजें नाही।
बरहुकूम लवलाही। धावें जैसे।।
सत्ताकारणाची वाट। कोरिली जयाने चखोट।
ऐशा नगरीचा कोल्हाट। अवधारिजो जी।।

जैं सम्राटाचे अंकी बिल्ली। मार्जार नव्हे, अमृतवल्ली।
नाम तिचे हो असे दिल्ली। कुर्वाळिता पुण्य लाभे।।
जैं समर्थाघरचे श्‍वान। त्यासी सर्वहि देती मान।
येथ तो श्‍वानचि सामर्थ्यवान। मुक्‍कामी जाहले।।

या नगरीचा महिमा थोर। अंगणी नाचती येथ मयुर।
सत्तालोलुपांचे कॉरिडॉर। गजबजले साचे।।
वाडे, हवेल्या, प्रासाद। बंगले, इमारती आणि सौध।
पांच ताऱ्यांची सुधबुध। सुटाबुटात वावरे।।

मल्मली हिर्वळींचे गालिचे। पुष्करिणी आणि बगिचे।
मोटारताफे व्हीआयपींचे। नित्य येथे धावती।।
बगलेत घेऊनि फाइल। हरएक नेता येथील।
देशाची चिंता करील। अहोरात्र।।

चखोट ठेविला बंदोबस्त। पहारेकरी दरोबस्त।
तयांच्या आडोशाला मस्त। नेते मंडळी राहती।।
देशविदेशांचे राजदूत। उंची वस्त्रे, पवित्र धूत।
परराष्ट्रनीतीचे भूत। बाटलीबंद येथे।।

वाटाघाटींच्या मिषें। महासत्ताधीशांचे जलशे।
आगत स्वागताचे ढोलताशे। नित्य येथे झडती।।

महासत्ताधीशाचे बिढार। तयाचे आतिथ्य की उदार।
खर्व निखर्वांचे करार। स्वाक्षरांकित होती।।

साहेब म्हणती माय फ्रेंड। खुशीने बहलती विदेशी धेंड।
पाठीमागुते फुटते बेंड। बेरकी मैत्रक।।
ऐसा या नगरीचे भारुड। सर्वांवरी तिचे गारुड।
सिंहासनी जो आरुढ। तयाची बटिक तीच की।।

हे खरे आहे, पण-
एक्‍या महानगराचे आर्त। पुरविता पुरेना सार्थ।
इन्स्टण्ट विकासाप्रीत्यर्थ। पुरुषार्थ मांडिला।।

येथ सारेचि आम आदमी। रस्त्यात सुरु धमाधमी।
भाईचाऱ्याची बेगमी। झुग्गी झुग्गी करितसे।।

एकतेतही विविधता। सांधोनी सकल सर्वमता।
एकजुटीची महत्ता। प्रकटली ऐसी।।
फोडिली मस्तके बहुत। तोडिले बहुतांचे पायहात।
सडकेवरी सांडियले रक्‍त। येकमेकांचे।।

कुणी सरसावले ‘त्यांचे’। उतरले मग महाभाग ‘यांचे’।
दगडफेक केली अंदाजपंचे। घराघरांच्या माथ्यावरी।।
ऐसी अबलख राजधानी। धुधु:कारे पेटली आगजनी।
जाळपोळीची ही कहाणी। नुरले शब्द वर्णाया।।

कोठे गेली ती माणूसकी। की तिला आज आली पटकी।
पुढाऱ्यांची भाषणे लटकी। गुणगान तरीही गाती हो।।
जैं कामयनीचे उत्तमांगे। सुवर्णलंकार वरपांगे।
कमरपट्ट्याखालतें खांजे। गजकर्ण ऐसे।।

तैं नगरीचे हे वरलिया रूप। त्याचे देखावे अप्रुप।
झांकिले वस्त्रांते कुरूप। न दिसे कोणाला।।
कोठली नगरी म्हणावी खरी?। सुखी किंवा जळणारी?।
आकांताच्या नाना परी। खऱ्या कैशा मानाव्या?।।

कोठे गेला बंधुभाव। कां एकतेचे फुका नाव।
जातीपातीत लावालाव। हाचि खरा धर्म हो।।
परिसा नगरीचे स्वप्नरंजन। कुटिलनीतीचे साधन।
रुपांतरी साचे वॉशिंग्टन। होआवे जी।। 

मतगठ्ठ्यांवर माराया डल्ला। माणुसकीवरी करा हल्ला।
निर्ममपणे पाही लाल किल्ला। देखतां डोळां।।
ऐसा गा नगरीचा दरवेश। ‘जय हिंद’चा करा उद्‌घोष।
जेणे महात्म्यांचा हा देश। धन्य होई।।

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT