satirical-news

हौस ऑफ बांबू : गारवड्याचे जोशी आणि ओतुरचे अवचट!

कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! ‘आला वसंत देऽहीऽ मज ठाऊकेंच नाऽऽही...’ हे जुने गीत गुणगुणतच सकाळी जाग आली. कोकिळ ओर्डत होती. उठून पाहिले तर गुलमोहर फुललेला. दोन साळुंक्या कुलकुलाट करत उडत डावीकडून उजवीकडे गेल्या. मनात म्हटलं, आज काही तरी शुभ कानावर पडणाराय! तस्संच झालं. चहाचा वाफाळ कप ओठांना लावताना वर्तमानपत्रात बातमी वाचली : डॉ. नम जोशी आणि डॉ. अनिल अवचट यांना मसापचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर! हातातला चहाचा कप अक्षरश: आनंदाने हिंदकळला! कोकिळेच्या सुरात सूर मिसळून तेव्हापास्नं गुणगुणत्ये आहे, आला वसंत देऽहीऽऽ... दोघाही डॉक्टरांचं मन:पूर्वक अभिनंदन! आमच्या नमंचं नम:पूर्वक अभिनंदन!!

डॉ. नमंच्या बालकथा वाचून वाचून तर मी लहानाची मोठी झाल्ये! (मोठी म्हणायचं आपलं उगाच! अजून लस मिळत नाही, आणि म्हणे मोठी! हुं:!!) नमगोष्टी, नमएकांकिका आणि नमकादंबऱ्यांवर तर आमचा नमपिंड पोसला गेला आहे, म्हटलं! (एका अर्थी मराठी साहित्याच्या क्षेत्रातला हा नमप्रवाहच म्हटला पाहिजे.) आमच्या नमंचं वैशिष्ट्य म्हंजे ते दिसायला अतिशय मृदू (काहीसे वसंत बापटांसारखे) असले तरी शिक्षणाच्या बाबतीत ते भयंकर गंभीर प्रकृतीचे आहेत. अजिबात नमतं घेत नाहीत. गारवड्याचा (ता. पाटण, जि. सातारा) नरसिंह महादेव जोशी नामक बालवीर पुढे (फत्तेवाडीचा झुंजार) शिक्षणतज्ञ म्हणून नावाजला, ते काही उगीच नाही. बालसाहित्य, गांधीसाहित्याच्या संस्कारक्षम निर्मितीमुळे मराठी वाङमयात आदराचे स्थान बनलेल्या नमंच्या कामगिरीचे वृत्त टिळकरोडवरच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कचेरीत एकदाची पोचली, याचेच समाधान आहे. त्या निमित्ताने मसापच्या कचेरीत झाडलोट आणि दीपप्रज्वलन वगैरे झाले, हेही नसे थोडके! ‘आंखो में नम, और हसीं लबों पर’ अशी माझी अवस्था झाली आहे.

गारवड्याच्या डॉ. नमंची एक कथा, तर ओतुरच्या डॉ. अवचटबाबांची दुसरीच. ‘मसाप’चा पुरस्कार जाहीर झाल्याचं त्यांच्या कानावर घातलं, तेव्हा ते नुसतंच ‘हं’ असं म्हणाले म्हणे. त्यावेळी ते कागदाचा करकोचा तयार करण्यात बिझी होते, असंही ऐकिवात आलंय. कागदाचा बेडूक, करकोचा, मोर करण्यात डॉ. अवचटबाबा माहीर आहेत. (होड्या, विमानं आपण करायच्या) शिवाय ते बासरीदेखील वाजवतात. (पावा वाजवणारा एकमेव मराठी साहित्यिक म्हणूनही त्यांचा लौकिक आहे.) ओरिगामी, बासरीवादन, समाजसेवा, यासारखी कृत्ये करता करता ते लेखनही करतात हे विशेष. त्यांना ‘जीवन गौरव’ नेमक्या कुठल्या कृत्याबद्दल द्यायचा यावर मसापच्या जोशी-पायगुडे आदींच्यात बरीच वर्षे खल सुरु होता. शेवटी ‘सरसकट जीवन गौरव’ द्यावा असं ठरल्याचं समजतं.

‘मसाप’च्या पुरस्कारांना कोविडने ग्रासलं. गेल्या वर्षी टिळकरोडच्या कचेरीत झाडलोटसुध्दा नव्हती. यंदा तेवढी झाली म्हणायची. रोख रक्कम आणि मानचिन्ह असं या जीवन गौरव पुरस्काराचं स्वरुप आहे, असं बातमीत म्हटलंय. रोख रक्कम गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. ती नेमकी किती याचं कुतुहल स्वस्थ बसू देईना. म्हणून नमंनाच फोन करुन विचारलं. त्यांनी काहीच न कळल्यासारखा चेहरा केलान! तिथून अवचटबाबांकडे गेले, तर त्यांनी माझ्याकडे बघून कागद उचलून घड्या घालायला सुरवात केली. शेजारीच पावा पडलेला होता, हे बघून मी वेळीच तिथून निघाले. जाऊ दे. किती का असेना रोख रक्कम? आपल्याला काय त्याचं? असा विचार करुन गप्प बसल्ये आहे. कुणाचं काय, तर कुणाचं काय!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav ने मला खूप मेसेज केले होते...' बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक दावा; नेमकं काय म्हणाली?

VIRAL VIDEO : एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये धक्कादायक घटना; मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशांवर केली लघवी, लज्जास्पद व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : जागा वाटपाची चर्चा फिसकटल्याने पिंपरी चिंचवड शहरात भाजप शिवसेना युती तुटली : श्रीरंग बारणे

Air India Express Offers : नववर्षाची विमान प्रवाशांसाठी मोठी ऑफर! Air India Express ची Pay-Day Sale सुरू; तिकिटांवर बंपर सवलत

पुण्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला अजितदादांनी दिलं तिकीट, NCP नेत्याच्या दोन मुलांना वेगवेगळ्या पक्षांची उमेदवारी

SCROLL FOR NEXT