writer shirish kenekar interview eightieth birthday by sakal mahima thombare
writer shirish kenekar interview eightieth birthday by sakal mahima thombare sakal
संपादकीय

Shirish Kanekar : लेखणीमुळेच आयुष्याला ‘चार चाँद’

सकाळ वृत्तसेवा

प्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर आज (ता. सहा जून) वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करत आहेत. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी वाचकांना हसवलं, रिझवलं. क्रिकेट व चित्रपटावरील लिखाणासह ललित, व्यक्तिचित्रणात्मक अशा विविधांगी प्रांतात त्यांनी लेखन केलं. ‘कणेकरी शैली’तील लिखाणाची वाचकप्रियता आजही कायम आहे. त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ‘सकाळ’च्या प्रतिनिधी महिमा ठोंबरे यांनी घेतलेली त्यांची मुलाखत.

प्रश्न : वकिलीचं शिक्षण ते पत्रकारिता ते लेखन, असा आपला प्रवास. लेखक म्हणून पहिल्यांदा काहीतरी सुचलं, तो क्षण आठवतो का?

कणेकर : आयुष्यातील अनेक निर्णय आपण तसे ठरवून घेत नाही. पहिलं लिखाण केलं तेदेखील ठरवून केलं नव्हतं. एका माणसाची माहिती वाचली आणि त्यावर लिहावंसं वाटलं. माझ्या पिंडाला ते पोषक होतं. पुढच्या पन्नास वर्षांतील लेखन पाहिलं तर ते फार सूचक वाटतं.

तो लेख होता, ‘जॉर्ज गन- एक लहरी फलंदाज’. त्याच्यावर लिहायला तो काही ब्रॅडमन नव्हता. पण त्याच्याविषयी वाचल्यानंतर मला ते खूप ‘अपील’ झालं आणि मी लिहिलं. तो लेख प्रसिद्धही झाला. मग मी लिहित गेलो आणि ते प्रसिद्ध होत गेलं.

क्रिकेट आवडीचा विषय असल्याने आणि त्यात गती असल्याने सुरवातीला त्यावर लिहिलं. चित्रपट काही अंशी अधिकच आवडीचा विषय असल्याने त्यावरही लिहित गेलो. मग ललित लेखनाकडे वळलो.

आपल्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे ‘कणेकरी’ शैली. तिचा कसा उगम झाला?

ः ती एक गंमतच आहे. सुरुवातीला प्रथम माझ्या लेखन शैलीचा `कणेकरी’ असा उल्लेख झाला, तेव्हा मला गुदगुल्या झाल्या. मला एक लेखनशैली आहे आणि तिचा माझ्याच नावाने उल्लेख केला जातो, हा एक फार मोठा ‘ईगो मसाज’ होता.

हळूहळू यातली अपूर्वाई व गंमत विरत गेली. लोक माझ्याकडे ‘कणेकरी’ शैलीत लेख मागायला लागले, तेव्हा माझं डोकं गेलं. मीच ना तो शिंचा कणेकर(?) मी लिहीन तीच ना कणेकरी शैली(?) मग माझ्याकडे कसला ‘कणेकरी’ शैलीतला लेख मागताय? माझा गोंधळ उडाला. आता मी तरी, प्रांजळपणे, प्रामाणिक मत योग्य वाटेल त्या शब्दात मांडणे म्हणजे ‘कणेकरी’ शैली, असं मानतो.

गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ आपण सातत्याने लिहीत आलात. या सातत्यामागची प्रेरणा काय आहे?

ः एक म्हणजे लेखन मला स्वतःला प्रचंड आवडतं. लेखनातून मला खूप आनंद मिळतो. अर्थात ते कोणी छापलं नसतं तर तो आनंद विरला असता. त्यामुळे ते सतत प्रसिद्ध होत गेलं, ही एक प्रेरणा आहेच. दुसरं म्हणजे वाचकांचं प्रेम. ते सर्वात मोठं प्रोत्साहन होतं. माझ्या प्रत्येक पुस्तकावर वाचकांच्या उड्या पडल्या. आजही गावागावांतून मला वाचकांचे फोन येतात, ते भेटायला येतात. अजून काय हवं?

वाचकांच्या या प्रेमामागचं, तुमचं लेखन लोकप्रिय होण्यामागचं कारण काय वाटतं?

ः क्रिकेट, चित्रपट अशा लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर माझ बरंचसं लिखाण आहे, हे एक कारण असू शकतं. पण त्यावर लिहणारे अनेक आहेत. बहुतांश वाचकांच्या मनात असणारी गोष्ट मी मांडत असेल, त्यामुळे ते लोकांना आपलंसं वाटलं असेल. मी जे मांडतो आणि ज्या भाषेत मांडतो, ते लोकांना ‘अपील’ होणारं असेल. अर्थात हे केवळ माझे तर्क आहेत.

लेखनासह तुमचे एकपात्री प्रयोगही खूप गाजले. त्याकडे वळण्याचा विचार कसा सुचला?

ः खरं सांगायचं तर आज ते आठवत नाही. माझा तसा रंगमंचाशी कधीच संबंध आला नव्हता. शाळेत, महाविद्यालयात देखील कधी मी स्टेजवर इकडून तिकडेही गेलो नव्हतो. असं असताना ही कल्पना मला कशी सुचली, हे काही आठवत नाही.

पहिला एकपात्री कार्यक्रम म्हणजे ‘फिल्लमबाजी’. त्याची गंमत म्हणजे या कार्यक्रमाची संहिता म्हणून मी काहीही तयार केलं नाही. एरवी जे बोलत होतो, तेच पहिल्यांदा कार्यक्रमात सादर केलं. मग नंतर त्याची संहिता तयार केली.

असे तीन कार्यक्रम केले, ‘फिल्लमबाजी’, ‘कणेकरी’ आणि ‘फटकेबाजी’. चौथाही एक कार्यक्रम केला, ‘या कातरवेळी’. पण त्याचा एकच प्रयोग केला, अमेरिकेत. या प्रयोगांसाठी कोणाचेही सल्ले घेतले नाही, कोणाचेही दिग्दर्शन घेतलं नाही. जसं सुचतं गेलं, तसं करत गेलो.

क्रिकेट-समीक्षक, चित्रपट-मल्लीनाथ आणि ललित लेखक, यातलं तुमचं कुठलं रूप तुम्हाला जास्त आवडतं व का?

ः तसा तिन्ही रूपांत मी सारखाच रमतो. तरीही विचारांती वाटतं की ललित-लेखक म्हणून चोखंदळ वाचकांनी स्वीकारल्याचा मला सर्वाधिक अभिमान आहे. कारण म्हणाल तर क्रिकेट व चित्रपट यांचं काहीतरी माझ्यासमोर असतं. त्यावर मी लिहितो, मला म्हणायचं ते म्हणतो. ललित लेखनाचं तसं नाही. कल्पनेपासून विस्तारापर्यंत सगळीच माझी निर्मिती असते. तिचं यश मला जास्त आंतरिक समाधान मिळवून देते.

तुमची पन्नासच्या वर पुस्तके प्रसिद्ध झालीत. त्यातलं तुमचं सगळ्यात आवडतं पुस्तक कोणतं?

ः ‘लता’ असू शकेल. लता आवडती, म्हणून तिच्यावरचे पुस्तक आवडते, हा त्यामागचा तर्क असू शकतो. ‘डॉ. कणेकरांचा मुलगा’ हीदेखील माझी मर्मबंधातील ठेव आहे. पुस्तकाच्या शीर्षकामुळेच मी पुस्तकाच्या प्रेमात आहे.

काही लिहायचं राहून गेलं, अशी चुटपुट आहे का?

ः नाही. मी पसरलेत तेवढेच हातपाय पसरू शकतो. नाटक, चित्रपट, मालिका यातला एखादा प्रकार हाताळायला जमला असता की नाही, हे मी सांगू शकत नाही.

तुम्हाला मिळालेली सगळ्यात मोठी दाद कोणती?

ः जानेवारी १९६४ च्या ‘अमृत’मध्ये माझा पहिला लेख प्रसिद्ध झाला. १५ मार्च १९६६ ला माझे वडील गेले. दरम्यानच्या काळात माझे चारसहा लेख छापून आले असतील. ते वाचून ते मला म्हणाले, ‘‘तू कधी कंटाळवाणे लिहीत नाहीस.’’ ही मला मिळालेली सर्वोत्कृष्ट दाद.

पन्नास वर्षांत मला याहून मोठी दाद मिळालेली नाही. ज्येष्ठ विनोदी लेखक भा. ल. महाबळ आज ९१ वर्षांचे आहेत. त्यांचा परवा मला मेसेज आला. ते लिहितात, ‘‘कणेकर म्हणजे पूर्णविराम. दुसरा कणेकर होणे नाही.’’ मी मोहरून आलो. वाटलं ओरडून सांगावं, ‘‘एवढी योग्यता नाही हो माझी.’’ मी वाचकप्रिय आहे व त्यासाठी मी स्वतःला धन्य समजतो.

लेखनक्षेत्रात आता काय इच्छा आहे?

ः आहे ना! हातात लेखणी असतानाच माझा ‘शेवटचा दिस गोड व्हावा’. या लेखणीनेच माझ्या आयुष्याला ‘चार चॉंद’ लावलेत. जगण्यातला आनंद शिकवला, जगण्याला अर्थ दिला. हे लेखणी, तुझे लाख लाख उपकार. पुढल्या जन्मीही अशीच साथ देशील का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT