caring friends trust working pardhi samaj child for education at nagar
caring friends trust working pardhi samaj child for education at nagar 
सप्तरंग

फासेपारधी मुलांच्या शिक्षणाला हवा मदतीचा हात!

अरविंद तेलकर arvind.telkar@gmail.com

फासेपारधी. हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो राना-वनांत संचार करणारा, गावकुसाबाहेर अतिक्रमित जमिनींवर झोपड्या बांधून राहणारा, ब्रिटिश काळापासून चोर-दरोडेखोर म्हणून नोंदला गेलेला एक बुरसटलेला, कमालीचा अंधश्रद्ध, स्वतःच्या संस्कृतीला कवटाळून राहणारा, जात-पंचायतीचा निर्णय अंतिम मानणारा, आत्यंतिक दारिद्य्रा राहणारा, पाखरं आणि लहान प्राण्यांची शिकार करणारा, अशिक्षित आणि असंस्कृत समाज!

गावांत किंवा शहरांत कुठंही दरोडा पडला, की पोलिसांची पहिली धा़ड पडते, ती पारध्यांच्या पालावर. मुलांनी शिकावं, असं त्यांच्या पालकांनाही वाटत नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे पैसा. दोन वेळच्या हाता-तोंडाची गाठ पाडण्यासाठी शिकार करावी लागते आणि ती मिळाली नाही, तर शहरांमध्ये चौका-चौकांतील सिग्नलवर भीक मागावी लागते. सरकारी योजना यांच्यापर्यंत अगदी अभावानंच पोचतात. त्यांच्यापैकी अनेकांकडं आधार कार्ड नाही की रेशन कार्ड. ते मतदार नाहीत आणि जातीचे दाखलेही नाहीत. किंबहुना त्यांच्याकडं कोणतीच सरकारी कागदपत्रं नाहीत. स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतरही आपल्यासारखाच हाडा-मासांच्या माणसांची अवस्था अत्यंत बिकट आहे. अशा समाजापासून पूर्णपणे दुरावलेल्या समाजाला आपलं म्हणणारे फारच थोडे लोक आणि संस्था. अशाच एका संस्थेपैकी एक आहे नगरची 'केअरिंग फ्रेंड्स'!

युवराज गुंड, अंबादास चव्हाण आणि शैलेंद्र मसलेकर यांच्यासारख्या समविचारी लोकांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली. त्यांचा एकच उद्देश होता. समाजापासून दुरावलेली, दारिद्य्रात खितपत पडलेली आणि सुसंस्कृत समाजाचा गंधही नसलेल्या लोकांमध्ये काम करणं. बरोबर तीन वर्षांपूर्वी त्यांनी काम सुरू केलं. वाडे-वस्त्या पायाखाली तुडवल्या. वस्त्यांमधल्या ज्येष्ठांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात त्यांना अपयशच आलं. मात्र, या अपयशानं खचून न जाता त्यांनी वस्त्यांवरच्या मुलांवर लक्ष केंद्रीत केलं. वस्तीवरच शाळा सुरू केली. त्यातही फारसं यश मिळालं नाही. या प्रश्नाचा मुळापासून शोध घेतल्यानंतर, मुलांचे पालकच मुलांना शाळेत जाण्यापासून रोखतात, हे लक्षात आलं.

पारध्यांच्या झोपड्यांमध्ये पोरांचं लेंढार असतं. प्रत्येक झोपडीत 5 ते 10 मुलं हमखास असतात. शिकार, चोऱ्या किंवा भीक मागण्यासाठी ही फौज उपयोगी असते, हा त्यांचा समज. अगदी काहीच जमलं नाही, तर शेतमजूर म्हणूनही ते जातात. जितकी जास्त मुलं, तितके अधिक पैसे हा त्यांचं साधंसोपं गणित. या मुलांना पालकांपासून तोडल्याशिवाय या क्षेत्रात यश लाभणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी शोध सुरू केला तो जागेचा. मुलांना राहण्यासाठी एखादी जागा आवश्यक होती. त्यांनी अनेकांची भेट घेऊन, मदतीचं आवाहन केलं. या मंथनातच त्यांची भेट झाली, नगर शहरातील एक नामवंत वैद्यकीय व्यावसायिक डॉ. कुलकर्णी यांच्याशी. डॉक्टरांची नेप्ती गावाजवळ शेती आहे आणि शेताला लागूनच त्यांनी एका एकरात बंगला बांधला आहे. गेल्या काही वर्षांपासून हा बंगला रिकामाच पडला होता. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यांनंतर डॉक्टरांनी मोठ्या आनंदानं या कार्यासाठी बंगला वापरायला दिला!

नंतर शोध सुरू झाला मुलांचा. वेगवेगळ्या वस्त्यांवर फिरून, अनेक पालकांची समजूत घालून त्यांनी 55 मुलं आणि मुली मिळवल्या. त्यांना आता राहण्याची चांगली सोय झाली होती. पण सुरवात काहीशी अडखळतच झाली. वसतीगृहात आणलेल्या मुलांपैकी सुमारे 22 मुलं वयानं मोठी होती. पारधी समाजाची संस्कृती त्यांच्या अंगवळणी पडली होती. बालपणापासूनच चोऱ्या आणि मारामाऱ्या करण्यातच दिवस घालवणाऱ्या या मुलांना साधं-सरळ जीवन काही पचनी पडलं नाही. वसतीगृहातही त्यांनी चोऱ्या करणं, लहान-सहान गोष्टींवरून भांडणं-मारामाऱ्या करण्याचा पायंडा सोडला नाही. त्यांच्या पालकांएवढाच त्यांच्यावर अंधश्रद्धांचा मोठा पगडा होता. वसतीगृहातील एका मुलीचं लग्न काही कारणानं मोडलं होतं. स्वयंपाकीणबाईंनी या मुलीला हाताखाली मदतीसाठी घेतलं. या मुलांना ते समजल्यानंतर त्यांनी या मुलीनं हात लावला म्हणून जेवण वाढून घेतलं नाही. तिच्या हातचं खाल्लं तर जातीबाहेर काढतील, ही त्यांची समजूत.

सुरवातीचा हा प्रकार झाल्यानंतर फक्त लहान मुलांनाच प्रवेश देण्याचं ठरवण्यात आलं. त्यांना पालकांपासून पूर्णपणे तोडलं तरच ती शिकू शकणार होती. हळूहळू अशी मुलं मिळू लागली. त्यांच्यासाठी अभ्यासिका स्थापन करण्यात आली. त्यासाठी त्यांच्याच समाजातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेली 5-6 मुलंही संस्थेत दाखल झाली. दोन वेळचं अन्न मिळू लागल्यानं मुलांमधील कुपोषणाचा प्रश्न मिटला. मुलांना नगरच्या दादा चौधरी माध्यमिक मराठी विद्यालय आणि डहाणूकर विद्यालयांत प्रवेश मिळवून दिला. मुलींची सोय पार्वतीबाई डहाणूकर विद्यालयात झाली. रोज सकाळी मुलांना नेण्यासाठी शाळेची बस येते.

काही विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था झाल्यानं, त्यांनी वस्तीशाळा नव्या उत्साहानं सुरू केल्या. काही शाळांमध्ये त्यांच्याच समाजातील शिक्षिकांची सोय केली. पारध्यांच्या मुलांबरोबरच गावोगाव भटकणाऱ्या डोंबारी, घिसाडी आणि भिल्लांच्या मुलांनाही वसतीगृहात प्रवेश देण्यात आला. मुलं आणि मुलींच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थेची व्याप्ती वाढवण्याची त्यांची योजना आहे. त्यासाठी किमान दोन एकर जमिनीची आवश्यकता आहे. श्रीमंत शेतकरी, दानशूर व्यक्ती किंवा सरकारकडून पडीक जमीन या उपक्रमासाठी मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. या जागेवर शाळा आणि वसतीगृह उभारण्याची त्यांची योजना आहे. अलिकडंच त्यांना प्राप्तिकर खात्याकडून 'सीआयटी एक्झंप्शन' मिळालं आहे. आर्थिक मदत देणाऱ्यांना 80 जी कलमाखाली सूट मिळणार आहे. अशी जागा मिळाल्यास शेवगाव, नेवासा, कर्जत, पाथर्डी, जामखेड, पारनेर आदी गावांतले पारधी आणि अन्य समाजाच्या मुलांचीही सोय करता येणं शक्य होणार आहे.

मदत पाठवण्यासाठी संपर्कः
केअरिंग फ्रेंड्स, 49, आरोह निसर्ग, तागड वस्ती, सावेडी, अहमदनगर 414003, उत्कर्ष बालघर, छत्रपती शिवाजी महाराज इंजीनिअरिंग कॉलेजसमोर, नगर-कल्याण रस्ता, नेप्ती, ता. जि. अहमदनगर - 414005.
मोबाईल - 9975938001, 9011262226, 8888589275.
ई-मेलः caringfriendstrust@gmail.com.
वेबसाईटः www.caringfriends.org.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT