Torna fort esakal
सप्तरंग

क्षमतेचा केंद्रबिंदू ‘किल्ले तोरणा’

सकाळ डिजिटल टीम

लेखक : देवदत्त गोखले

इतिहासात तोरणा किल्ल्याचे (Torna Fort) विशेष महत्त्व आहे. पुण्याजवळचा हा किल्ला इतिहासप्रेमी, ट्रेकर्स आणि सर्वसामान्यांना अनेक वर्षांपासून खुणावतो. तसाच एकेकाळी तो शिवरायांना खुणावत होता. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वराज्य स्थापनेच्या सुरवातीच्या काळातच हा किल्ला जिंकून एक इतिहास रचला. महाराजांनी या किल्ल्याचे नामकरण प्रचंडगड असे केले. वयाच्या १६ व्या वर्षी जिंकलेला हा किल्ला मराठी साम्राज्याचा केंद्रबिंदू ठरला. एक प्रकारे स्वराज्याचं तोरणच बांधलं गेलं!

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात, सह्याद्रीच्या कुशीत, नैसर्गिक सौंदर्य आणि संरक्षण लाभलेला हा स्वराज्याचा शिलेदार आजही तेवढ्याच भक्कमपणे उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि त्या वेळी विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यामध्ये असलेला तोरणा सर्वप्रथम सर केला. या पहिल्याच लढाईत त्यांचे शौर्य, चातुर्य आणि साम्राज्य निर्माण करण्याची आत्मीयता अधोरेखित होते. तसेच या घटनेमुळे आपणही आपले स्वतंत्र राज्य स्थापन करू शकतो, ही क्षमता महाराजांनी ओळखली. याच क्षमतेचा उपयोग स्वराज्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी झाला. पुरंदरच्या तहात हा किल्ला महाराजांकडेच होता. तोरण्यावर अनेक शाह्यांनी सत्ता गाजवली. आधी बहामनी, मग निजामशाही, त्यानंतर अनेक वर्ष स्वराज्य, मग मोगल आणि पुन्हा स्वराज्य! अशी अनेक स्थित्यंतरे या किल्ल्याने बघितली.

Torna Fort entrance

‘गरुडाचे घरटे’

हा किल्ला समुद्रसपाटीपासून साधारण चार हजार ६०० फूट उंचीवर आहे. झुंजार आणि बुधला या दोन माचींच्या मधोमध उंचीवरचा बालेकिल्ला हे तोरण्याचे स्वरूप! थेट आकाशाला भिडणाऱ्या या किल्ल्याला ‘गरुडाचे घरटे’ म्हणूनदेखील संबोधले गेले आहे. किल्ल्याच्या संरक्षणासाठी हनुमान, भेल, साफेली, मालेचा, फुटका असे अनेक बुरूज आहेत. झुंजार माचीला जाणारी वाट थोडी अवघड आहे. बुधला माचीकडून गडाकडे जाताना कोकण दरवाजा, महार टाके, टकमक बुरुज आणि शिवगंगा, पाताळगंगा हे पाण्याचे टाके दिसतात. याव्यतिरिक्त गडावर कोठी दरवाजा, तोरणजाई देवीचे मंदिर, मेंगाई देवीचे मंदिर, तोरणेश्वर महादेवाचे मंदिर आहे. बालेकिल्ल्यापासून गडाचा भलामोठा विस्तारही नजरेस पडतो.
स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन शिवराय तोरण्याच्या खाली पोचले. गड विजापूरच्या बादशाहकडे होता; पण दुसऱ्याच दिवशी मोठ्या शिताफीने हा किल्ल्या महाराजांनी मावळ्यांच्या मदतीने आपल्या ताब्यात घेतला. गडावरचे बादशाही निशाण खाली उतरले आणि मराठी जरीपटका फडकू लागला.

गड स्वराज्यात आला. दुरुस्तीचे आदेश झाले आणि त्या दुरुस्तीतच एकाजागी मोहरांनी भरलेले २२ हंडे मिळाले. स्वराज्यासाठी हा शुभसंकेतच! महाराजांनी याकडे फक्त शुभसंकेत म्हणून पहिले नाही. क्षमता ओळखून सकारात्मक भावनेने काम करायला सुरवात केल्यावर सगळेच घटक आपोआप मदतीला धावून येतात. यातूनच कार्यक्षमता वाढते, कार्यसंस्कृतीसाठी पोषक वातावरण तयार होते आणि पुढील वाटचालीसाठी दिशा मिळते. या महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करून, याच संपत्तीतून शेजारीच असलेल्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर राजगडाचे काम सुरू केले. याच राजगडावरून महाराजांनी पुढील अनेक वर्ष स्वराज्याच्या कारभार बघितला.

तोरणा अतिशय उंच आणि दुर्गम किल्ला असूनदेखील स्वराज्य बांधणीच्या सुरवातीच्या काळातच महाराजांनी हा पहिला मोठा किल्ला जिंकून याच किल्ल्याभोवती मराठी राज्याचा पसारा वाढविला. एखादा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी कृतीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते, हे महाराजांना ठाऊक होते. म्हणूनच ते फक्त स्वराज्याची शपथ घेऊन थांबले नाहीत, तर स्वराज्यनिर्मितीच्या दृष्टीने पावलं टाकायला सुरवातदेखील केली. याच कृतीची पहिली फलश्रुती म्हणजे किल्ले तोरणावर प्रस्थापित केलेला विजय. ज्या स्वराज्याने मुघल बादशाहचे आसन हलविले, त्याच स्वराज्याचे हे उगमस्थान. म्हणून या किल्ल्याचे महत्त्व विशेष आहे. साडेतीनशे वर्षांहून जास्त काळ किल्ले तोरणा आपल्या अंगावर असंख्य लढायांच्या खुणा घेऊन ताठपणे गतकाळाची साक्ष देत उभा आहे. स्वतःतील क्षमता ओळखून काम केल्यास कोणतीही अशक्य वाटणारी गोष्टदेखील साध्य होते, हेच तोरणा शिकवतो. प्रत्येक व्यक्तीला आपली क्षमता ओळखून, ध्येय निश्चित करून तिथपर्यंत पोचण्यासाठी अधिक कार्यक्षमतेने काम करण्याची गरज आहे.

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि तोरणा जिंकून पहिलीच मोहीम फत्ते केली. यामुळेच त्यांना स्वतःच्या व मावळ्यांमध्ये असलेल्या क्षमतेची खात्री झाली. ‘आपण काय करू शकतो आणि काय नाही’, याची जाण ठेवून महाराजांनी पुढील सर्व मोहिमा आखल्या. तसेच स्वतःच्या आणि मावळ्यांच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करून त्यानुसारच नियोजन केले. म्हणूनच ‘असाध्य ते करिता साध्य... कारण क्षमता तोरणा म्हणे’ असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. स्वराज्य उभारणीचा कणखर विचार आणि महाराजांच्या अतुलनीय पराक्रमामुळेच किल्ले ‘तोरणा’ म्हणजे क्षमतेचा केंद्रबिंदू हे समीकरण अधोरेखित होते.

(लेखक जळगावस्थित गोखलेज अॅडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (‘गती’)चे संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT