marathi poet yashwant & madhav julian esakal
सप्तरंग

‘आई’ ज्युलियनांची नि यशवंतांची!

- डॉ. नीरज देव

माधव ज्युलियन नि यशवंत दोघेही ‘यश’वंत कवी होते. दोघांची धाटणी वेगळी असली तरी अत्यंत रेखीव नि मोहक आहे. ‘आई’ विषयाचा विचार केला, तर ज्युलियनांच्या कवितेतील मुलगा संयत दिसतो, समंजस दिसतो. पण यशवंतच्या कवितेतील मूल नुकतेच समज आलेले अन् भावनोत्कट दिसते. त्याचे विलक्षण प्रतिबिंब यशवंताच्या या काव्यात पडलेले दिसते. त्यामुळेच कोणताही शब्दांचा थाटमाट नसताना यशवंताची ‘आई’ मोहिनी घालते.

र सिका! ‘आई’ हे केवळ मानवाच्याच नव्हे, तर प्राणिमात्रांच्या जीवनातील अत्यंत मौलिक नि मूलभूत नाते होय. प्राण्यांच्या जीवनात लवकर सरणारे हे नाते मानवी जीवनात मात्र दीर्घकाळ टिकणारे नि हळवे असते. ‘आई’ या नात्यावर बहुतेक कवी अत्यंत आर्ततेने भावना व्यक्तविताना सापडतात. वीर सावरकरांसारखा रणधीरही त्यांच्या आईची आठवण काढताना ‘तिचा चेहराही मला आठवत नाही.’ म्हणत व्याकूळ होतो. (Dr neeraj Dev marathi article on marathi poetry of poet yashwant madhav julian nashik Latest marathi news)

त्याच व्याकुळतेतून एका कवितेत नऊ-दहा दिवसांच्या, ज्याची आई हरवली आहे, अशा कोकराला उद्देशून ते लिहितात,

तव माता क्षणभर चुकली । म्हणुनि का तनू तव सुकली
माताही माझी नेली । यमकरें
भेटेल उद्या तव तुजला । मिळणार न परि मम मजला
कल्पांत काळ जरी आला । हाय रे

यातील व्याकूळता नि आर्तता वेगळे वर्णन करायची गरजच नाही. सावरकरांसारख्या महापुरुषाची ही कथा, तर प्रेम नि प्रीतीत रममाण होणाऱ्या इतर कवींची आर्तता कितीतरी पटींनी अधिकच असणार. रविकिरण मंडळातील दोन रवी; माधव ज्युलियन नि यशवंत या दोघांची ‘आई’वरील कविता आपण पाहुया. ‘आईची आठवण’ या सुंदर रचनेत माधव ज्युलियन आरंभीच गातात-

प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई!बोलावुं तुज आता मी कोणत्या उपायीं!

पहिल्याच कडव्यात आपल्या लक्षात येते, की गेलेल्या आईला कवी करत असलेले हे आवाहन आहे. तो तिला प्रेमस्वरूप, वात्सल्यसिंधू संबोधताना जणू ‘आई’ या शब्दाचीच पुनरावृत्ती करून जातो. प्रेम नि वात्सल्य दोन्ही आईचीच प्रतिरूपे असतात, तिचा स्वभाव असतो. किंबहुना आई सोबत हे सारे भाव आपसूकच येतात.

पण कवीला उसळणाऱ्या भावना मांडण्यासाठी अशा शब्दांचा आसरा निरुपायाने घ्यावा लागतो. गेलेली आई पुन्हा येणार नाही, हे माहीत असूनही कवीला तिला बोलवावेसे वाटते. म्हणून तो स्वतःलाच पुसतो अन् पुसतानाच स्वत:ला उत्तर देतो, ‘तिला बोलवायचा उपायच नाही.’

पण ‘नाही’ हा शब्द त्याला बोचणारा असल्याने मोठ्या खुबीने तो टाळत, ‘कोणत्या उपायीं’ अशी सुबक रचना तो करतो. त्यामुळेच यात प्रश्नार्थक चिन्ह न घालता तो उद्‍गारवाचक चिन्ह घालतो. ज्युलियनांपेक्षा हळुवार नि अप्रतिम रचना करताना यशवंत,

‘आई!’ म्हणोनी कोणी । आईस हांक मारी
ती हांक येई कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी?। आई घरी ना दारी।

असे ते म्हणतात. यात कवी आईला कोणतीही उपाधी लावण्याच्या भानगडीत पडत नाही, तर सरळ ‘आई’ एवढेच लिहिताना दिसतो. त्यामुळे कवितेला साध्या सरळपणासोबतच एक वेगळी उंची लाभते. कोणीतरी स्वतःच्या आईला हाक मारत असताना ती हाक कवीच्या कानावर पडते. ती हाक ऐकताच त्याला त्याच्या हृदयावर घाव घातल्यासारखे होते.

कारण त्याची आई घरीदारी कोठेच नाही. येथेही कवीची करामत बघा, कवी ‘आई मृत पावली’ असे म्हणत नाही, तर ‘घरीदारी दिसत नाही’ असे मोघम बोलत हयात नाही म्हणणे अलगद टाळतो. पण हे टाळले, तरी दुःख मात्र टळत नाही, व्यथा काही सरत नाही, म्हणून अत्यंत व्याकुळतेने ‘‘स्वामी तिन्ही जगाचा। आईविना भिकारी’’ची ग्वाही देत तो मोकळा होतो.

कवीने दिलेली ही ग्वाही मराठीचे लेणे होऊन बसली, लोकोक्ती बनली. जणू काही ती आई गमावलेल्यांची द्वाहीच मिरवीत बसली. यशवंतांनी जानेवारी १९२२ मध्ये मांडलेले हे सत्य ज्युलियनांना मात्र सप्टेंबर १९२१ मध्येच उमगले होते.

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्तीं आई तरीहि जाची

आई नसलेल्या पोरांची जगात आबाळ होते, हे सर्वांना माहिती आहे. पण कवी सांगतो, की आई नसतानाही मला खूप चांगले सांभाळले, काही कमी पडू दिले नाही. आईची आठवणसुद्धा येऊ नये, असे प्रेम, माया दिली. येथे कवी कुठेतरी त्याला आईपेक्षाही अधिक ममतेने सांभाळणाऱ्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.

पण ते कोण, हे मात्र स्पष्ट सांगत नाही. असे असले तरी मनात आईची उणीव सदा लागलेली राहते. ही सल आणखी ठळक करताना माधव ज्युलियन कळवळून सांगतात,

सारे मिळे, परंतू आई पुन्हा न भेटे,
तेणे चिताच चित्तीं माझ्या अखंड पेटे

जगात सारे काही मिळू शकते; पण जन्मदात्री एकमेवच असते. हे तथ्य व्यक्तविताना आई नाही म्हणून जळणारं त्याचं मन ‘चिताच चित्ती पेटते’ या पंक्तीत व्यक्तविते. कवी ज्वालामुखी म्हणत नाही, वणवा म्हणत नाही, तर चिता म्हणतो. खरंतर दोन्हीही चितेपेक्षा भयानक नि दाहक असतात. पण चितेत जी तीव्र उदासीनता असते, ती दोहोतही नसते.

ज्वालामुखी असो की वणवा अनेकांसाठी चिता बनतो. पण त्या चिता समूहाच्या असतात, व्यक्तीच्या नसतात. त्यामुळे त्यात एखाद्या चितेशी असलेली व्यक्तीविशेषाची तादात्म्यता नसते. म्हणूनच कवी चिता हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक वापरतो. त्याचा आई नसल्याचा दाह त्यातून समर्पकपणे व्यक्त होतो. हे वाचताना वाटते, की जणू काही दोन्ही कवी एकच भावना वेगवेगळ्या शैलीत मांडताहेत.

ही भूक पोरक्याची होई न शांत आई,
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही

किती चपखलपणे कवीने ही भावना पकडली आहे. जी व्यक्ती नसते, जी उपस्थित नसते, तिची आठवण आपल्याला सुख-दुःखात मुद्दाम येते. हीच भावना व्यक्तविताना माधव ज्युलियन दिसतात. तीच भावना केंद्रिभूत मानून यशवंत काव्याचा आरंभ करतात. पुढे अधिक विवेचन करताना, ते चिमणी नि तिची पिले, गाय-वासरू यांचे उदाहरण देत; त्यांचे वात्सल्य पाहून आपला अंतरात्मा सुखावण्याऐवजी व्याकूळ होत असल्याची कबुली देतात.

आईचे वात्सल्य वर्णिताना त्यांच्या वाणीला बहर यायला लागतो. शाळेतून घरी आल्यावर बाळासाठी राखून ठेवलेला खाऊ भरवणारी, बाळ ते खात असताना त्याच्या उष्ट्या मुखाचा मुका घेणारी, त्याला सायंकाळी ‘शुभम् करोति’ म्हणायला लावणारी आई कवीला हटकून आठवते. पण त्याच्या लहान बहिणीला याची काही समजच नाही. कशी असणार बरे?

तिच्या जन्माच्या वेळीच तर आई गेली. तिला बिच्चारीला आईची माया, प्रेम काय नि कसे कळावे? कुणाचे तरी बोल ऐकून खेळताना कधी कधी ती इतर मुलींना सहजतेने सांगते, ‘आम्हास नाहि आई’. ते ऐकून आताशातच समज आलेल्या या मुलाला गहिवरून येते. हा प्रसंग त्याला किती व्याकूळ करतो हे वर्णन करताना तो सांगतो-

ऐकूनि घे परंतु । ‘आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलींना । ‘आम्हास नाहि आई’
ते बोल येती कानी । ‘आम्हास नाहि आई’

कवी यशवंतांच्या या ओळी वाचताना सहृदय वाचक द्रवून गेला नाही, तरच नवल! त्याला त्याच्या आईचे गुण आठवायला लागतात.

आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अव्दैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वास्तव्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे

या पंक्तींना यथोचित न्याय द्यायला स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. कवीला आईच्या ठायी दुर्गेचे सामर्थ्य, सागराचे गांभीर्य, धरतीचे औदार्य, ढगांचे वात्सल्य, तपस्व्यांचे तप दिसते. त्यामुळेच तो तिला ‘सर्व मंगलप्रद गुणांचे माहेर’ संबोधतो. यशवंतांच्या या ओळी मराठी भाषेस ललामभूत ठराव्यात अशाच आहेत.

आई गेली, तेव्हा लहान असणारा तो आता मोठा झालाय. कोणत्यातरी कार्यक्रमात त्याने छान सादरीकरण केले. साऱ्यांनी मुक्तकंठाने त्याची प्रशंसा केली. पण आईच नसल्याने तिच्या कौतुकाला तो पारखा झालाय. याचेच वैषम्य त्याला अधिक वाटते. हीच भावना व्यक्तविताना माधव ज्युलियन लिहितात-

विद्या धन प्रतिष्ठा लाभे मला अता ही
आईविणे परी मी हा पोरकाच राही

त्यामुळेच कळवळून ते म्हणतात,
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगें

‘उल्का जशी प्रचंड वेगाने येते तशीच आई, तूही कैलासावरून निघून ये.’ अशी विनंती ते करतात. पण ती येणार नाही, याची जाणीव असल्याने ते ‘तू फिरून जन्म घे, मी पण तुझ्याच पोटी जन्म घेईन.’ अशी आस व्यक्तवित कवितेला पूर्णविराम देतात. तर कवी यशवंत, आईला तू परतून केव्हा येशील? असे विचारत उल्केसारखी कोणतीही उपमा न देता वेगाने निघून येण्यास सांगतात. आईचे राहिलेले कर्तव्य करण्यास तिने यावे, असे सांगत असताना ते भावूक होऊन तिला आश्वासन देतात,

रुसणार मी न आता । जरी बोलशील रागे
ये रागवावयाही परी येई येई वेगे

खरोखर, यशवंतांच्या या पंक्ती काव्यरसात त्यांना यशवंत करून जातात. या काव्यपंक्तीत लपलेली निरागसता सांगण्याची गरज तरी आहे का? पुढील जन्माची वाट न पाहता तीच आई, याच जन्मात परत यावी हा भोळा तरी खराखुरा भाव त्यामागे दिसतो.

माधव ज्युलियन नि यशवंत दोघेही ‘यश’वंत कवी होते. दोघांची धाटणी वेगळी असली तरी अत्यंत रेखीव नि मोहक आहे. ‘आई’ विषयाचा विचार केला, तर ज्युलियनांच्या कवितेतील मुलगा संयत दिसतो, समंजस दिसतो. पण यशवंतच्या कवितेतील मूल नुकतेच समज आलेले अन् भावनोत्कट दिसते. त्याचे विलक्षण प्रतिबिंब यशवंताच्या या काव्यात पडलेले दिसते.

त्यामुळेच कोणताही शब्दांचा थाटमाट नसताना यशवंताची ‘आई’ मोहिनी घालते. या मोहिनीपासून आचार्य अत्र्यांसारखा साहित्यसम्राटही दूर राहू शकला नाही. त्यामुळेच ‘श्यामची आई’ या चित्रपटातील मुख्यगीत म्हणून त्यांनी यशवंतांच्या आईलाच पहिली नि अखेरची पसंती दिली. राष्ट्रपतीपदक विजेत्या त्या चित्रपटाच्या यशात कथानका इतकाच किंबहुना कांकणभर अधिक वाटा या गीताचा आहे, हे कोणाही समीक्षकालासुद्धा मान्य करावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT