Marriage
Marriage esakal
सप्तरंग

पती-पत्नीतील सहसंवेदनेचे प्रश्‍नोपनिषद : कुणी कोडें माझें उकलिल का?

- डॉ. नीरज देव

रसिका, साधारणपणे प्रेम कवितांत प्रेमाची याचना, विरहाची व्यथा वर्णिलेली पाहायला मिळते. उर्दू शायरीचा विचार केला, तर त्यात प्रेमिकेने केलेली प्रियकराची प्रतारणाच मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. गालिब म्हणतो, की प्रेमाने त्याला निकम्मा केलंय, नाहीतर तोही काहीतरी कामाचा होता. एका ठिकाणी तर व्यथित होऊन तो म्हणतो,

मर गया सदामा-ए- यक जुंबिशे-लब से गालिब ।

नातवानीसे हरीफे- दमे इसा न हुआ ।।

अर्थात

गालिब मेला दो ओठांच्या कंपन आघाते ।

या दुर्बलतेने मुकला तो प्रेषितपदाते ।।

पण तांब्यांची कविता अशा प्रताडनांनाही योगायोग मानून विफलतेकडे न वळता राखेमध्ये कुठेतरी दडलेला आशेचा अंकुर ‘जीवन दे त्या, डुलूं दे तरुवर’ म्हणत सुफलतेकडेच वळते. विरहापेक्षा ती सफल प्रेमात अधिक गुंतते. तरीही विरहाचे अत्यंत उत्कट वर्णन तांब्यांनी त्यांच्या ‘कळा ज्या लागल्या जिवा’ कवितेत केलेले आहे. कवीच्या मनांत विरहामुळे होणारी आपली दशा इतरांना कशी कळणार? अशी शंका उपस्थित होते. ती व्यक्तविताना तो आर्त स्वरात पुसतो,

कळा ज्या लागल्या जिवा मला कां ईश्‍वरा ठाव्या!

आणि व्यथित होऊन स्वतःच उत्तरतो

कुणाला काय हो त्यांचे? कुणाला काय सांगाव्या?

समुद्री चौकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही

कवीने व्यक्तविलेला हा अनुभव खोटा नाही, अशीच साक्ष विरहाने व्याकूळ जिवाची असेल. योगायोग असा, की ही कविता कवीने अजमेर येथे ३० जानेवारी १९२२ मध्ये लिहिली. तिला आज १०० वर्षे पूर्ण होताहेत. तरीही ती आजही तितकीच मधूर वाटते. पण, रसिका तिच्यात न गुंतता प्रेमाच्या पुढच्या लक्षणाकडे आपण वळणार आहोत.

पती-पत्नी दोन शरीर एक आत्मा, असे आपण मानतो. याचीच प्रचिती तांब्यांच्या कुणी कोडें माझें उकलिल का? कवितेत पाहायला मिळते. या कवितेत कवी एकाहून एक सरस नि मधूर प्रश्‍न विचारत जातो, नि प्रश्‍नांनीच कवितेचा शेवट करतो. गंमत म्हणजे, त्या प्रश्‍नांकित अवस्थेतच समाधान दडलेले असते. तांब्यांना अध्यात्माची ओढ होती. त्यामुळे मनांत प्रश्‍न उद्‌भवतो, की प्रश्‍नोपनिषद वाचताना तर कवीला हे सहसंवेदनेचे प्रश्‍नोपनिषद सुचले नसावे ना?

प्रारंभीच कवी पुसतो-

कुणी कोडें माझें उकलिल का?

कुणी शास्त्री रहस्य कळविल का?

हृदयी तुझ्या सखी, दीप पाजळे,

प्रभा मुखावरीं माझ्या उजळे;

नव रत्नें तूं तुज भूषविलें,

मन्मन खुललें आंतिल कां?

कवी विचारतो, सखीच्या मुखावर खुशीचे तेज पसरले. त्यामुळे माझ्याही मुखावर आनंद झळकू लागला. तिने नवरत्नादी विविध अलंकार परिधान केले. ते पाहून माझे मन आपोआप खुलले. हे कसे काय घडते? माझे कोडे कुणी उकलून सांगणार आहे का? यात दडलेले रहस्य कुणी शास्त्री सांगणार आहे का? खरेतर यात कुणी उत्तर द्यावे, ही इच्छाच नाही. उलट हे एकत्व सांगण्याचा अट्टहास आहे. ते वाचकांना नीट कळावे म्हणून कवी नवरत्नाचे उदाहरण देतो. त्यातून वाचकाला कळते, की सखीने परिधान केलेले अलंकार हे पतीच्या कर्तृत्वाचे प्रतीक आहे. कर्तृत्व पतीचे भाग्य पत्नीचे असा तो समसमा संयोग आहे.

मी जेव्हा हसतो तेव्हा माझ्या सखीच्याही चेहऱ्यावर हास्यरुपी गुलाब फुलतो अन् मी जेव्हा संकटात वा चिंतेत असतो तेव्हा माझ्या पत्नीलाही ती वेदना सलत राहाते. माझे मन दाटून आले, की माझ्या सखीच्या डोळ्यांतून आसू वाहतात. मात्र मी जेव्हा खूष असतो, तेव्हा तीही प्रसन्न असते, असे कवी दुसऱ्या नि तिसऱ्या कडव्यात म्हणतो. हास्य, चिंता, उदासता, प्रसन्नता यांसाठी कवी गुलाब,

काटा, ढग नि चंद्र या उमपा वापरतो, त्या समर्पक बसतात. पती-पत्नीतील ही सहसंवेदना आपणसुद्धा नेहमीच अनुभवत असतो. कवी ती अचूक हेरतो, हे कोणाही रसिकाला पटते. मात्र, जेव्हा शेवटच्या कडव्यात तो म्हणतो,

मद्याचा मी प्यालो प्याला,

प्रिये, तयाचा मद तुज आला

तेव्हा सामान्य रसिक विचारात पडतो, की हे कसे काय? कुणी मद्य म्हणजे दारू, ती पिऊन घरी गेले तर बायको सारा मद उतरवते. मग कवीने हे कसे काय गायले असेल? रसिका, येथे मद्य म्हणजे दारू नाही, तर यश होय. पतीला जेव्हा यशावर यश मिळत जाते तेव्हा त्याची नशा पतीपेक्षा पत्नीलाच अधिक चढते, असे कवीला सुचवायचे आहे. कवितेवर कळस चढविताना कवी मर्मावर बोट ठेवत प्रश्‍न विचारतो,

कुणीं जखडिलें दोन जिवाला,

मंत्रबंधनीं केवळ? कां?

दोन जिवांना केवळ मंत्रबंधनी जखडल्यानेच असे होते का? येथे कविला सुचवायचे असते, की हे केवळ मंत्रबंधन नसून हे मनबंधन ही असते. ही कविता वाचताना पती-पत्नीतील सहसंवेदना कवीने अलगदरीत्या उलगडत नेली. हे जसे रसिकाच्या ध्यानात येते तसेच तांब्यांच्या या कवितेचा पोत दुःखीकष्टी गालिबपेक्षा

प्रियतम को पतियां लिखुं

जो कोई होय विदेस

तन में मन में नैन में

ताकों कहा संदेस?

अशी प्रियकर-प्रेयसीची अद्वैतता वर्णिणाऱ्या कबीराशी साधर्म्य दाखवणारा आहे, हेही ध्यानात येते.

(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT