लेखक - के. सी. पांडे
हल्ली स्पर्धा परीक्षांचं युग आहे. तरुण मुलं-मुली राज्यसेवा, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी वयाची मर्यादा संपेपर्यंत करत राहतात. हे करत असताना नेमका कुठला दृष्टिकोन ठेवून तयारी करत आपली स्वप्न पूर्ण करता येऊ शकतात, त्याचा नेमका फॉर्म्युला कोणता....?
मनाची एकाग्रता आणि इच्छाशक्ती यांचा फार जवळचा संबंध आहे. जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर प्रथम ती गोष्ट करण्याची प्रबळ इच्छा पाहिजे. मानवी जीवनात इच्छाशक्तीला फार महत्त्व आहे. ही शक्ती मनसामर्थ्याचा एक भाग असून ती एक अमूर्त ऊर्जा आहे. त्याची प्रचीती माणसाच्या कार्यातूनच येते. इच्छाशक्ती म्हणजे कल्पनेतली इच्छा किंवा मनोरथ नव्हे. जी इच्छा अविरत परिश्रमाने प्रत्यक्षात आणता येते, ती म्हणजे इच्छाशक्ती! इच्छांची पूर्तता होण्यासाठी नैतिक शक्ती आणि निश्चय असावा लागतो. लहानसहान गोष्टींमधून इच्छाशक्तीला बळकटी मिळते. जेव्हा एखादी गोष्ट जाणीवपूर्वक नित्यनेमाने केली जाते, त्यातून इच्छाशक्ती दृढ होते.
युवा पिढीला माझे नेहमी सांगणे असते, की देशसेवेसाठी आपण प्राधान्य द्यायला हवे. देशसेवेसाठी आपल्या आवडीची एखादी युनिफॉर्म सेवा दिल्यानंतर अगदी वयाच्या तिशीनंतर देखील अन्य शासकीय नोकरी माजी सैनिकांसाठी अनेक खात्यांमध्ये उपलब्ध होतात. त्याचादेखील फायदा युवावर्गाला होऊ शकतो. हल्ली स्पर्धा परीक्षांचं युग आहे. तरुण मुलं-मुली राज्यसेवा, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी वयाची मर्यादा संपेपर्यंत करत राहतात. अनेकांच्या पदरी निराशा येते. पूर्ण क्षमतेने परिश्रम करुन प्रयत्नवादी राहायलाच हवे. पण योग्य वयात जर आपण युनिफॉर्म संबंधित सेवेचा विचार केल्यास काही वर्षे नोकरी व नंतर पुढे नोकरी किंवा व्यवसाय अशी दोन्ही मार्ग आपल्यासाठी खुले राहतात. शिवाय देशसेवेसारखा आयुष्यभराचा आनंद आपल्या खात्यात जमा होतो. हाच माझा करिअर निवडतानाचा फॉर्म्युला होता, जो मी शेअर केला.
नौदलातील सेवेच्या दरम्यान अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळत गेली. इतिहासात सुप्रसिद्ध असलेली आयएनएस विक्रांत, विराट, हंसा, कुंजाली, गरुडा, एचएएल बंगळुरु, नेवल एयरक्राफ्ट कोचीन, मिसाईल स्टेशन करंजा, उरण, नेव्हल हेडक्वार्टर दिल्ली व गोवा या भव्य-दिव्य जहाजांवर देखील मी काही वर्ष मी सेवा केली. हा कालखंड अत्यंत रोमहर्षक होता. इंडियन कोस्ट गार्डमधील माझी सेवा देखील संस्मरणीय ठरली.
कोस्टगार्डसोबत कार्यरत असताना कोस्टगार्डचे जवान गस्त घालण्यासाठी समुद्रात गेल्यानंतर त्यांना बॅकअप म्हणून हेलिकॉप्टर पाठविण्याची जबाबदारी नेव्हीची असते, हे बंधनकारक आहे. पण एकदा आमच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झालेला होता. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेवून बॅकअप न पाठवण्याचा निर्णय मी घेतला होता. यानंतर वरिष्ठांकडून विचारणा झाल्या नंतर कोणत्या परिस्थितीत मी निर्णय घेतला हे स्पष्ट केले. पुढची व्यवस्था होईपर्यंत बॅकअप होल्ड करणे शक्य होते. मात्र उलट जर आपल्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला असता तर पायलटचा जीव धोक्यात आला असता. हेलिकॉप्टरपेक्षाही पायलटचा जीव आपल्यासाठी अधिक मौल्यवान आहे. त्यामुळे सहकाऱ्याच्या जीवाचे मोल ओळखून त्यास मी सर्वोच्च प्राधान्य दिले. या उत्तराने वरिष्ठ प्रभावित झाले, आणि माझ्या निर्णयाबद्दल मला शाबासकीही मिळाली. बॅकअपसाठीची पुढची व्यवस्थाही अल्पावधीत करण्यात मला तेव्हा यश आले. नौदलात सेवेत असताना आलेले असे अनुभव आपलं आयुष्य समृद्ध करुन जातात. वेळेचे महत्त्व, निर्णय क्षमता हे गुण केवळ पुस्तक वाचून किंवा भाषणं ऐकून विकसित होत नसतात, त्यासाठी प्रत्यक्ष तसा विचार करुन फिल्डवर त्यांची अंमलबजावणी करावी लागते, त्यातूनच आपणही अधिक सक्षम होत जातो.
माझ्या गारगोटी दगड संकलित करण्याच्या छंदाबाबत म्हणाल तर मला बालपणापासूनच ही आवड होती. गारगोटीबद्दल कमालीचे आकर्षण मला होतं. शालेय जीवनानंतर मी नौदलात करिअर करण्याची मनाशी खूणगाठ बांधली, कारण देशसेवा करण्याची संधी मला हवी होती. किंबहुना हाच एकमेव उद्देश त्यामागे होता. मी सुरुवातीपासूनच शिक्षणात टॉपर होतो. त्यामुळे मी कुठल्याही क्षेत्रात करिअर अगदी सहजपणे करू शकलो असतो. त्यावेळी आजच्या इतकी तीव्र स्पर्धा देखील नव्हती. पण देशसेवा ही सर्वोच्च सेवा आहे. म्हणून मी मनापासून या सेवेचा स्वीकार केला. वयाच्या सोळाव्या वर्षी नौदल जॉईन केल्यानंतर मी वयाच्या एकतिसाव्या वर्षी रिटायर झालो. निवृत्तीनंतर लहानपणाचा गारगोटीच्या छंदाला व्यावसायिक स्वरुप देणे शक्य आहे का, हाच माझ्या मनात एकमेव विचार होता. या संदर्भातील माझी इच्छाशक्ती एवढी तीव्र होती, की गारगोटीसाठी पुढील आयुष्य समर्पित आहे, हे मी निश्चित केलेलं होतं.
आपण सगळ्यांनी, एक गोष्ट मात्र निश्चित लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपली इच्छाशक्ती दुर्दम्य असेल व आपण मनापासून एखाद्या गोष्टीचा विचार करत असाल, तर संपूर्ण विश्वातील शक्ती आपल्या बाजूने सकारात्मकपणे ऊर्जा निर्माण करते. त्यातून आपला मार्ग सुलभ व सहज होतो, मी साकारलेले गारगोटीचे विश्व हे त्याचेच ज्वलंत उदाहरण आहे, हे विश्वात एकमात्र आहे, ते केवळ आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने...म्हणूनच जग देखील अशा प्रयत्नांना मनापासून स्वीकारते आणि मानवंदनाही देते, हे मात्र निश्चित...
(लेखक सिन्नरस्थित आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गारगोटी संग्रहालयाचे संस्थापक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.