mr shef article in saptarang
mr shef article in saptarang 
सप्तरंग

‘मिस्टर’ शेफ

सकाळवृत्तसेवा

एक लांबलेलं ‘भजी’पुराण
लग्न होऊन दोनच वर्षं झाली होती. माझी बायको ‘अश्‍विनी’ अगदी अन्नपूर्णा, सुगरण होती. स्वच्छतेची भोक्ती होती. मी पसारा, कचरा केलेला तिला अजिबात आवडत नसे. मग स्वयंपाकघरात तर मला मज्जावच असायचा. फार मोह व्हायचा, तिला मदत करावी, काही पदार्थ शिकावेत, तिच्यासोबत स्वयंपाकघरात काही क्षण काढावेत, पण तसं काही शक्‍य झालंच नाही.
ती एकदा महिला मंडळाच्या ट्रिपला महाबळेश्‍वराला गेली. पहाटे सहा वाजता तिला स्टॅंडवर सोडून आलो. ती आता संध्याकाळी सात-आठ वाजता येणार होती. मी एकदम निर्णय घेतला, आज आपण स्वयंपाकघराचा ताबा घ्यायचा. सकाळचा स्वयंपाक ती करून गेली होती. रात्रीच्या जेवणासाठी स्वयंपाक मी करायचं ठरवलं! भजी आणि शिरा करायचा असं मी ठरवलं.

चांगले तीन-चार कांदे, कोथिंबीर घेतले चिरायला. विळीनं शक्‍य नव्हतं म्हणून सुरी, भाजीपाट घेतला. ‘साधारण मोठाच चिरतात नाही का,’ असं म्हणत मोठ्या उत्साहानं चिरायला सुरवात केली. एक चिरेपर्यंत डोळ्यांची आग-आग व्हायला लागली. डोळ्यांतून पाणी यायला लागलं, नव्हे तर घळाघळा वाहायला लागलं. पुढचं काही दिसेचना. डोळे त्याच हातानं पुसत होतो; पण जमत नव्हतं. ‘डरनेका नही’ म्हणत नेटानं काम सुरू होतं. गडबडीत सुरी बोटावरच फिरली. रक्ताची धार लागली, झोंबायला लागलं. कसा तरी हात धुतला. बोटाला पट्टी लावली. पुन्हा काम सुरू केलं. परत तसंच होत होतं; पण लक्ष न देता चिरणकाम पूर्ण केलं. मग डाळीचं पीठ शोधलं. चार-पाच डब्यांत पिठं होती. डाळीचं पीठ साधारण पिवळसर असतं एवढंच माहीत होतं. पिवळी पिठं दोन होती. पैकी एकाला खमंग वास येत होता. म्हणजे थालीपीठ भाजणी असणार, म्हणून दुसरं घेतलं. एका पातेल्यात दीड ते दोन वाट्या पीठ घातलं. तिखट, मीठ, तेल सगळं घातलं. ओवा बाटलीपण सापडली. तोपण घातला. पिठापेक्षा चिरलेला कांदा जास्त वाटला, म्हणून थोडा कमी केला. पाणी घालून कालवायला सुरवात केली; पण पाण्याचं प्रमाण जास्त झालं. मग परत पीठ घालायला हवं. मग मोठंच पातेलं घेतलं. त्यात आणखी पीठ, उरलेला कांदापण घातला. ते पातेलंपण भरलं. सगळंच प्रमाण चुकलं; पण हार मानली नाही. कांदा, कोथिंबिरीचे राहिलेले भाग आणि त्याची साधनं यांनी टेबल भरून गेलं. किचन कट्टा तर तिखट, मिठाचे सट, ओवा बाटली, पाण्याचा तांब्या, पातेली, चमचे सर्वांनी भरून गेला होता. काम करता-करता ओव्याच्या बाटलीला धक्का लागला आणि ती खाली फरशीवर पडून फुटली. झालं! सगळीकडं ओवा आणि काचा पसरल्या. त्यातली एक परत पायालापण लागली. त्याच पिठाच्या हातानं झाडू आणून सगळं गोळा करून तिथंच एका बाजूला लावलं. लंगडत लंगडत हात धुऊन पायाला पट्टी लावली. फरशीवर रक्तपण सांडलं. बारा वाजता कामाला लागलेलो; दुपारचे चार वाजले. स्वयंपाक असून जेवलोपण नव्हतो. भूकच विसरलो होतो. समोरचं ध्येय साध्य करायचं एवढा एकच विचार समोर होता. मग मोठी कढई गॅसवर ठेवली. तेल किती घालावं कळेना; पण अर्ध्याच्या वर घातलंच. म्हटलं पीठपण बरंच आहे ना? भजी भरपूर करूया म्हणजे रात्री बाकी काही करायलाच नको. तेल तापलं समजून तळायला घेतलं. तळणं जमत नव्हतं. सारखं हातावर तेल उडत होतं. त्या जखमा वेगळ्याच होत्या. काही सुचत नव्हतं. सहा-सात वाजेपर्यंत हे काम संपवून बायकोला आणायला जायचं होतं. प्रचंड थकवा, घामाच्या धारा वाहणं सुरू होतं. भूक विसरलोच होतो; पण तहान लागली. मग त्याच हातानं घागरीतून पाणी घेतलं. तांब्या, पेला, घागर, कपडे, चेहरा आणि कट्टा सगळ्यावर भजीचं पीठ लागून नक्षी झाली होती. पाणी पिता-पिता कढईतल्या तेलात पाणी उडलं. जाळ व्हायला लागला. शेवटी गॅस बंद केला. ताटभर झालेली भजी झाकून ठेवली. बराच वेळ उभं राहून, लंगडून खूपच थकलो होतो. कपड्याचा, चेहऱ्याचा अवतार झाला होता.

पाय, हात सगळंच दुखत होतं. प्रचंड थकवा आला होता. या सर्व अनुभवावरून नव्या वर्षाचा एक संकल्प मात्र केला. या नवीन वर्षी अश्‍विनीकडून व्यवस्थित रेसीपी शिकायची आणि ती पुढच्या वर्षी यशस्वीरीत्या करायचीच. (आता भजी कशी झाली होती, अश्‍विनीला आवडली का, पसारा कसा आवरणार, हे सगळं लिहिलं तर आणखी एक दुसरा अध्याय होईल. म्हणून तूर्त हे ‘भजी’पुराण थांबवतो.)
- मुकेश देशपांडे, सातारा

चहाची ‘पाक’कला
बऱ्याच वर्षांपूर्वीची ही गोष्ट. माझं वय असेल ११-१२च्या आसपास. आम्ही तेव्हा नुकतंच पुण्यात राहायला आलो होतो. कसबा पेठेतल्या जुन्या वाड्यात वरच्या मजल्यावर दोन खोल्यांत आमचा मुक्काम होता. दोन खोल्या म्हणजे लाकडी पार्टिशननं केलेल्या. एके दिवशी माझ्या आईकडं तिच्या जवळच्या माहेरच्या चार-पाच स्त्रिया आल्या होत्या. त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. माझ्या आजीप्रमाणं आईलाही चहा प्रचंड आवडायचा. अर्थात, मीही तसाच ‘चहा’बाज झालो आहे. त्या महिलांच्या गप्पा रंगात आल्या असतानाच आईनं त्यांना चहाचं विचारलं आणि एकजात साऱ्या ‘हो’ म्हणाल्या. त्या वेळी मी नुकताच स्टोव्ह पेटवून चहा करायला शिकलो होतो. पार्टिशनपलीकडून मी ते बोलणं ऐकलं आणि आईला ‘मी चहा करतो’ म्हणून सांगितलं. गप्पांत खंड पडायला नको, म्हणून आईनंही होकार दिला. मी आत येऊन काकडा लावून स्टोव्ह पेटवला. त्यावर पातेल्यात चार-पाच कप पाणी घातलं. तेव्हा आम्ही नुकतंच गुळाकडून साखरेकडे वळलो होतो, त्यामुळं आईनं मला चहा करण्याच्या सूचना दिल्या. जितके कप पाणी; तितके चमचे चहापावडर आणि साखर. ‘मोजून चमचे टाक,’ असं आईनं बजावून सांगितलं. स्टोव्ह मध्येच विझत होता, मध्येच फुरफुरत होता. शेवटी मी त्याचा वायसर घट्ट केल्यावर तो नीट पेटला. मी एकीकडं गप्पा ऐकत, चहासाठी पाणी स्टोव्हवर ठेवून त्यात चहापावडर टाकून साखर टाकू लागलो. माझं सगळं लक्ष बाहेर त्या महिलांच्या गप्पांकडंच होतं. रंगलेल्या गप्पा ऐकता-ऐकता मी साखरेचे चमचे मोजत होतो. आठ-नऊ-दहा-पंधरा-वीस... माझं मोजणं चालूच होतं; पण सगळं लक्ष मात्र गप्पांकडेच होतं. शेवटी साखर संपल्यावर डब्यातली उरलेली साखर चमच्यात ओतत आकडा मोजला- ‘चाळीस’!

आणखी साखर काढण्यासाठी साखरेचा मोठा डबा कोणता ते आईला विचारलं. तिनं ते सांगताच मी स्टीलचा साखरेचा डबा घेऊन तिकडं गेलो. ‘‘अर्धा डबाच काढ रे - सांडू नकोस,’’ आई ओरडली. ‘‘एक्केचाळीस आकडा लक्षात ठेव,’’ असं मी ओरडलो आणि छोटा डबा मोठ्या डब्यात घुसवून साखर काढू लागलो. तेवढ्यात नक्की काय झालंय ते आईच्या लक्षात आलं. ‘‘चाळीस- चाळीस चमचे साखर टाकतोस?’’ असं ओरडत आईनं माझ्या दिशेनं धाव घेतली. पुढची ‘हाणामारी’ चुकवण्यासाठी मी वेगानं जिन्यावरून खाली पळालो खरा; पण तो साखरेचा पाक आणि चहा यांचं मिश्रण पुढचे बरेच दिवस येता-जाता मला मार मिळायला कारणीभूत ठरलं!
- दिलीप कुलकर्णी, पुणे

अशी झाली उपवासाची ‘मसालेदार’ खिचडी
मी  १४ वर्षांचा असतानाची गोष्ट. एकदा अचानकपणे आईला पंधरा दिवसांसाठी तिच्या माहेरी जावं लागलं. घरातली सगळी कामं मलाच करायची होती. गावी जाताना मला आई म्हणाली, ‘‘उपवासाची खिचडी तुला करता येईल ना?’’ त्यावर मी ‘हो’ म्हटलं. वडिलांच्या ऑफिसमधल्या एका मित्रांचे पुण्यात कुणी नातेवाईक नसल्यामुळं ते आमच्याकडं राहायचे. ते दर शनिवारी उपवास करायचे. आई गावी गेल्यानंतर दोन दिवसांनी शनिवार होता. शुक्रवारी मोठ्या वाटीभर साबुदाणा भिजत घातला. पाण्याचं प्रमाण किती असावं हे न समजल्यानं, दुसऱ्या दिवशी तो साबुदाणा वाटाण्याएवढा झालेला मला दिसला. ‘बापरे!’ म्हणत मी तो साबुदाणा परतायला घेतला. कढई गरम करायला ठेवली. नंतर अंदाजेच भरपूर तेल ओतलं. तेल गरम झाल्यावर मोहरी ओतली. ती तडतडल्यानंतर हिंग घातला, लाल तिखट, हळद घातली आणि साबुदाणा कढईत टाकला. तो थोडा वर-खाली केला. त्यानंतर त्यात कढीपत्ता, कोथिंबीर आणि खिचडीला चांगली चव यावी म्हणून कांदा-लसूण मसाला घातला, मीठ घातलं. खिचडी चांगली वर-खाली हलवली. थोडा वेळ कढईवर झाकण ठेवलं आणि खिचडी झाल्यावर अशी गरमागरम खिचडी काकांना आणि वडिलांनाही दिली. ‘‘राजा, अरे खिचडीचा रंग पांढरा नाहीये,’’ वडील म्हणाले. काकांनी मला विचारलं, ‘‘खिचडी कशी केली? काय घातलं त्यात?’’ मी माझी सर्व कृती त्यांना सांगितली. हसत-हसत काकांनी डोक्‍यावर हात ठेवला. ‘‘वा.. वा..! छान झालीय खिचडी!’’ असं म्हणाले. त्या ‘मसालेदार’ खिचडीची आजही आठवण झाली, की मला खूप हसू येतं.
- द. ज्ञा. जोशी, नऱ्हेगाव, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT