Study Education
Study Education Sakal
सप्तरंग

स्विच ऑन आणि स्विच ऑफ

संजीव लाटकर

परिस्थितीशी खूप संघर्ष करून उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना मी जेव्हा भेटतो, तेव्हा मला त्यांचं प्रचंड कौतुक वाटतं.

काही मुलं-मुली घरातली सर्व कामं करून उरलेल्या वेळेत अभ्यास करतात. त्यांचे लाड करायला कोणीच नसतं. ती जेव्हा अभ्यास करतात, तेव्हा त्यांचा आजूबाजूच्या प्रतिकूल परिस्थितीशी असलेला संबंध तात्पुरत्या स्वरूपात स्विच ऑफ असतो. अशा वेळी त्यांचा फक्त अभ्यास स्विच ऑन असतो. आजूबाजूची परिस्थिती स्विच ऑफ करणं हे सहजपणेही जमू शकतं किंवा सवयीने आणि कौशल्यानेही जमू शकतं.

परिस्थितीशी खूप संघर्ष करून उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना मी जेव्हा भेटतो, तेव्हा मला त्यांचं प्रचंड कौतुक वाटतं. कौतुक अशासाठी, की प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता, किंबहुना, आपल्या अवतीभवतीची परिस्थिती प्रतिकूल आहे याची जाणीवसुद्धा न होता, ते आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत आपली कामगिरी उंचावतात आणि देदीप्यमान यश मिळवतात. वेगवेगळ्या कार्यशाळांमधून मी दहावी-बारावी, यूपीएससी-एमपीएससी, इंजिनिअरिंग, मेडिकल अशा शाखेचे असे विद्यार्थी पाहिले आहेत, की ज्यांनी खरोखरच परिस्थितीवर मात करून प्रचंड यश मिळवलं आहे. त्यांच्या यशात सिंहाचा वाटा हा त्यांच्या एकाग्रतेचा आहे, हे विसरून चालणार नाही. बुद्धिमत्ता ही काही आपल्या हातातली गोष्ट नाही. तुम्हाला कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता प्राप्त झाली आहे, यावर तुमची त्या त्या क्षेत्रातली करियर उभी राहते. पण बरेच जण आळसामुळे किंवा खरं तर आत्मविश्वासाच्या अभावामुळे आपल्या स्वतःतल्या बुद्धिमत्तेला ओळखत नाहीत आणि सहाजिकच ते यशाची उत्तुंग उंची गाठू शकत नाहीत.

पण सर्वसाधारणपणे सरासरी बुद्धिमत्तेच्या व्यक्तीला जेव्हा एकाग्रतेची आणि प्रयत्नांची साथ मिळते, तेव्हा ती व्यक्ती केवळ अभ्यासात नव्हे, तर करिअरमध्ये आणि पुढच्या आयुष्यातसुद्धा उत्तुंग उंची गाठतेच गाठते. परिस्थितीशी संघर्ष करणारी मुलं ही नेमकं काय वेगळं वागतात? अभ्यास तोच असतो. पुस्तके तीच असतात. खरं तर ते अशा वस्तीत राहत असतात, की जिथे खूप गोंगाट असतो. मला अशाही काही वस्त्यांमधील मुलं माहिती आहेत ज्या वस्त्या या दारू पिणे, मारामाऱ्या, शिवीगाळ यांच्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. सतत कसले ना कसले आवाज सुरू असतात. सतत कुणाच्या ना कुणाच्या घरात समारंभ असतो. त्यांचा लाऊड स्पीकर सुरू असतो. डान्स सुरू असतो. लक्ष विचलित करणाऱ्या शंभर गोष्टी तिथे घडत असतात. घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. कधी कधी शेजारपाजारचे किंवा घरातले लोकसुद्धा मद्यपि असू शकतात. मारहाणीचे प्रकार हे सर्रास घडतात. आर्थिक हलाखी इतकी असते, की भावंडांच्या शिक्षणाचा प्रश्न भेडसावत असतो. पुरेशी पुस्तकं नसतात. योग्य मार्गदर्शन नसतं. क्लास परवडत नाही. अशा परिस्थितीतसुद्धा ही मुलं ज्या नेटाने आणि ज्या जोमाने अभ्यास करतात, त्याचं कौतुक मला केव्हाही जास्त वाटतं. प्रश्न असा येतो, की ही मुलं एकाग्रता कशी साधतात? आज मला उच्चभ्रू घरातील अशी मुलं माहिती आहेत, की कुठे खुट्ट झालं तरी त्यांची एकाग्रता भंग पावते. कुठलीही विचलित करणारी गोष्ट घडली, की अशी मुलं रागावतात. त्यांना त्रास होऊ नये म्हणून पालकांचे अखंड प्रयत्न सुरू असतात. अभ्यास नीट झाला नाही, लक्ष नीट लागलं नाही तर ही मुलं आजूबाजूच्या परिस्थितीला दोष देतात.

आजूबाजूच्या परिस्थितीला दोष देणं वर वर सयुक्तिक वाटलं तरी ते तितकंसं बरोबर नाही. आपली उद्दिष्टं ही स्पष्ट असली आणि आपली आपल्या उद्दिष्टांबद्दल घट्ट बांधिलकी असेल तर तुम्ही इतके एकाग्र होता, की आजूबाजूच्या प्रतिकूल परिस्थितीचे तुम्हाला भान राहत नाही. तुम्हाला जेवायला काय मिळालं, जेवणात तुमच्या आवडीचे पदार्थ आहेत की नावडीचे, तुम्हाला चहा मिळाला का, तुम्हाला शाळेत किंवा कॉलेजात जाताना चालत जावं लागतं की बसने, तुमच्याकडे पुस्तकं कमी आहेत की जास्त... या कशाकशाचाही फरक पडत नाही. कारण ही मुलं आपल्या उद्दिष्टांनी, आपल्या ध्येयाने भारलेली असतात. तुमचं ध्येय हे तुमच्या जितकं जवळ असतं, तितके तुम्ही एकाग्रतेच्या जवळ जाता आणि हे ध्येय जर लांब असेल, अस्पष्ट आणि धूसर असेल तर आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्रास देऊ लागतात. काही व्यक्तींना एअर कंडिशन्ड बेडरूममध्ये गुबगुबीत गादीवर तासन् तास झोप येत नाही आणि काही व्यक्ती एसटीच्या खडखडातही भर रणरणत्या दुपारी अनावर घोरू शकतात, हा फरक आपल्याला नेहमीच दिसत आला आहे.

गरीब घरातली मुलं आणि मुली घरातली सर्व कामं करून उरलेल्या वेळेत अभ्यास करतात. त्यांचे लाड करायला कोणीच नसतं. काही मुलं बाहेरील कामंसुद्धा करतात. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. ती मुलं जेव्हा अभ्यास करतात, तेव्हा त्यांचा आजूबाजूच्या प्रतिकूल परिस्थितीशी असलेला संबंध हा तात्पुरत्या स्वरूपात बंद असतो. स्विच ऑफ असतो. अशा वेळी त्यांचा फक्त अभ्यास स्विच ऑन असतो. म्हणजे जेव्हा तुमचं अभ्यासात लक्ष नसतं, तेव्हा तुम्ही अभ्यासात पूर्ण स्विच ऑन नसता आणि आजूबाजूची परिस्थिती तुम्ही पूर्णपणे स्विच ऑफ केलेली नसते, असा त्याचा अर्थ आहे. आजूबाजूची परिस्थिती स्विच ऑफ करणं हे सहजपणेही जमू शकतं किंवा सवयीने आणि कौशल्यानेही जमू शकतं. हा प्रश्न केवळ अभ्यास करणाऱ्या मुलांपुरताच मर्यादित नाही. अनेक पालक ऑफिसात काम करतात, पण ऑफिसात काम करताना त्यांच्या डोक्यात घरातले विचार सुरू असतात आणि घरात काम करताना त्यांच्या डोक्यात ऑफिसचे विचार सुरू असतात. साहजिकच त्यांची कामगिरी खालावण्याची शक्यता जास्त असते. याचे कारण ऑफिसमध्ये त्यांनी फक्त ऑफिसचा विचार स्विच ऑन ठेवायला पाहिजे आणि घरात फक्त घरातला विचार स्विच ऑन ठेवायला पाहिजे. म्हणजे घरात असताना त्यांचं १०० टक्के लक्ष आणि १०० टक्के फोकस हा घरातल्या माणसांवर, मुलांवर, घरातल्या गरजांवर राहू शकतो. घरातलं सौख्य आणि आनंद अबाधित राहण्यासाठी मग ते आपोआप प्रयत्न करतात, पण स्विच ऑन आणि स्वीच ऑफ याची सरमिसळ झाली, तर मात्र कठीण प्रसंग उद्‍भवतात आणि एकाग्रतेपासून माणसं वंचित राहतात.

स्विच ऑन होणं म्हणजे त्या गोष्टीवर आपलं पूर्ण अवधान ठेवणं, असा होतो आणि स्विच ऑफ करणं म्हणजे त्या गोष्टीपासून तात्पुरतं दूर जाणं किंवा लांब राहणं असा होतो. एकाग्रतेसाठी हे तंत्र जमणं खूप आवश्यक आहे. माणसाच्या जीवनात असंख्य वेळा अनेक चढ-उतार येत असतात. वाट्याला सुखदुःख येतच असतात. अशा वेळी विचलित न होता आपलं ध्येय गाठायचं असेल तर अशा दुःखांपासून, अशा आघातांपासून आपल्याला तात्पुरतं का होईना, स्विच ऑफ व्हायला जमलं पाहिजे. आपल्याला प्रिय असलेल्या उद्दिष्टांसाठी स्विच ऑन व्हायलाही जमलंच पाहिजे. हे एकदा जमलं, की एकाग्रता साध्य झालीच म्हणून समजा!

sanjeevlatkar@hotmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT