लेखक : डॉ. हेमंत ओस्तवाल
गेल्या ३१ ऑगस्टपासून ते ९ सप्टेंबर २०२२ पर्यंत गणपतीबाप्पा आपल्या सर्वांकडे विराजमान होते. सकारात्मक ऊर्जेने जणू काही सर्वत्र भारलेले वातावरण होते. श्रीगणराय म्हणजे सकारात्मक ऊर्जेची देवताच. म्हणून तर आपण कुठल्याही शुभकार्याला सुरवात करण्यापूर्वी श्रीगणेशालाच वंदन करतो. आज आपण हा वेगळाच दोन रुग्णांमधील सकारात्मकता व नकारात्मकतेचा रंग आणि त्याचा त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम अनुभवणार आहोत. (saptarang Latest Marathi Article by Dr Hemant Ostwal Nashik News)
आपण रोज सकाळी देवाचे नामस्मरण करून दिवसाची सुरवात करतो. विशिष्ट दिवसांमध्ये अजून जास्त वेळ नामस्मरण करीत असतो. ध्यानधारणा व वेगवेगळ्या मार्गांनी आपण भक्ती करीत असतो. कुठलेही महत्त्वाचे काम असेल, तर आपण हमखास देवाचे नामस्मरण करूनच निघतो. ज्या वेळी आपण मनोभावे देवाचे नामस्मरण केलेले असते त्या वेळी कित्येकदा आपल्याला चांगला अनुभवही येत असतो.
आपण स्वतः सकारात्मक ऊर्जेने जणू काही भारलेले असतो. ते काम पूर्ण करण्यासाठी आपली संपूर्ण ताकद, इच्छाशक्ती वापरत असतो, ते काम मग कितीही कठीण असो. देवाचे नामस्मरण केल्याने खरेच आपले कार्य सिद्धीस जात असते का? कोणी हो म्हणेल, कोणी नाही म्हणेल. हा वादाचा विषय होईल, पण शांतचित्ताने विचार केला तर आपणा सर्वांच्या लक्षात येईल, की नामस्मरण केल्याने आपली एकाग्रता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. आपले काम कितीही कठीण असले, तरीही हीच ऊर्जा त्या कठीण प्रसंगावर मात करते आणि आपण ते कार्य सिद्धीस नेतो.
आपल्या दैनंदिन जीवनात जी सकारात्मकता काम करते, ती अशीच करते मग आपण कुठेही असो, कुठल्याही क्षेत्रात असो. मग ते अगदी युवा वयामधील शिक्षण असो, तरुण वयामध्ये नोकरी मिळविणे व कुठलाही व्यवसाय स्थिर करणे असो, पुढे जाऊन मुला-मुलींचे शिक्षण, लग्नकार्य असो, आपल्या मुला-मुलींना प्रगतीच्या मार्गावर नेणे असो आणि त्यांचा सर्वांगीण विचार केला, तर आयुष्यालाच प्रगतिपथावर नेणे असो.
हा विषय आपण आता थोडा सविस्तर बघू या. या विषयातील सकारात्मकता म्हणजे काय? आपण आपल्या संपूर्ण आयुष्याचा विचार केला असता रोजच आपल्या आयुष्यात नानाविध घटना घडत असतात. त्यातील काही घटना अत्यंत छानशा, सकारात्मक असतात, तर कितीतरी घटना ना खूप सकारात्मक असतात, ना नकारात्मक. म्हणजे फार मोठ्या घटना नव्हे, तर ज्या घटनांनी आपण फार आनंदीही होत नाही वा फार दुःखी-कष्टी, निराशही होत नाही.
काही घटना ज्या अत्यंत नकारात्मक ज्यांचा आपल्या आयुष्यावर कदाचित कायमस्वरूपीदेखील वाईट परिणाम होऊ शकतो, अशा नकारात्मक घटना असतात; परंतु अशाच घटनांना कधी आपण पूर्ण ताकदीने, सकारात्मकतेने सामोरे गेलो, तर अशा गोष्टींचाही आपण परिणाम पूर्ण तर नाही, परंतु बऱ्यापैकी त्यांचा धक्का आपल्यास कमी बसेल, अशा पद्धतीने आपण स्वीकारू शकतो.
सर्वप्रथम येथे आपण सकारात्मकता आणि कुठलेही आजार यांचा काय परिणाम होऊ शकतो, याबद्दल बघू या. आपण येथे उदाहरणादाखल दोन रुग्णांचा अनुभव बघू या. एकाचे नाव आहे गौतम, तर दुसऱ्याचे नाव सुयश.
दोघांचेही वय वर्षे ४५. दोघांनाही हार्टअटॅक येतो. आपण पहिले बघू या सुयशबद्दल. सुयशला अटॅक येतो. त्याला हॉस्पिटलमध्ये आणण्यात येते, ईसीजी, कार्डिॲक, एंजाइम्स इत्यादी तपासणीअंति सुयशच्या आजाराचे निदान होते. त्याला मोठा हार्टअटॅक आलेला असतो. त्याच्या जिवाला धोका असतो.
आम्ही सर्व काही सुयशला समजावून सांगतो, असा असा तुला अटॅक आलेला आहे. आम्ही आता थ्रोंबोलाइज करणार. तुझ्या हृदयाच्या रक्तवाहिनीतील गाठ विरघळवणार मग जसजसा तू स्टेबल होशील, त्या वेळी अँजिओग्राफी करू. मग त्यामध्ये जसे निदान होईल त्या पद्धतीने पुढची उपचाराची दिशा ठरवू या म्हणजे अँजिओप्लास्टी करण्यासारखी असेल तर ती करू या. बायपाससारख्या शस्त्रक्रियेची गरज असेल, तर तेही करू या.
असे सर्व व्यवस्थितपणे सुयशला समजावून सांगितले आणि हे सर्व ऐकल्यानंतर आमचा शेवटचा शब्द पूर्णही झाला नव्हता, तोपर्यंतच सुयशचीच्या प्रतिक्षिप्त क्रियेने प्रतिक्रिया आली ‘Let me say thanks to GOD’ ‘‘देवाचा मी मनापासून आभारी आहे. देवाने मला आजतागायत निरोगी ठेवले. मला कॅन्सर झाला नाही, माझा अपघात होऊन जागच्या जागी मृत्यू झाला नाही. माझा कोविड, स्वाइन फ्लू किंवा इतर कुठल्याही आजाराने मृत्यू झालेला नाही.
आता हार्टअटॅक आला असला, तरी मला योग्य डॉक्टरांच्या हातात चांगल्या हॉस्पिटलमध्ये भगवंताने पोचविले. आता मला रक्तातील गुठळी विरघळणारे इंजेक्शन देतील. माझी हार्टअटॅकमधून सुटका होईल. मग माझी पुढची तपासणी अँजिओग्राफी करतील आणि गरजेनुसार अँजिप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करतील. अर्थातच या आजारातून मी नक्कीच व्यवस्थित बरा होईन. त्यानंतर मी माझी लाइफस्टाइल पूर्ण बदलून माझे आयुष्य निरोगी निरामय आनंदी करेन.’’ ही प्रतिक्रिया सुयशची होती.
अशीच घटना गौतमबरोबरही घडली. आम्ही सर्व काही गौतमलाही सुयशसारखेच समजावून सांगितले. दोघांच्या आजारामध्ये काहीही फरक नव्हता; परंतु फरक होता आणि तोही साधा नव्हता, तर अगदी दोन ध्रुवांएवढा होता. अगदी दोन टोकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या. गौतमची ही प्रतिक्रिया रिफ्लेक्स अॅक्शनच आली. ‘‘त्या देवाला मीच दिसलो का?, त्याला तो प्रकाश नाही दिसला, त्याला तो हेमंत नाही दिसला, त्याला तो भास्कर नाही दिसला, त्याला तो भरत नाही दिसला, तो तर एवढी दारू पितो, तो तर एवढ्या सिगारेटी फुंकतो, तो तर एवढी तंबाखू खातो, हा तर दिवसातून दहा-दहा गुटख्याच्या पुड्या संपवतो, हा तर एवढा जाडा आहे, हा तर एवढा मोट्या आहे, हा तर असा आहे, हा तर तसा आहे मग देवाला काय मीच दिसलो का?
अरे बापरे! आता मला ही डॉक्टर मंडळी एवढी महागडी रक्त पातळ करणारी इंजेक्शन देतील आणि मग काय अँजिओग्राफी आणि पुढे अँजिओप्लास्टी किंवा बायपास. मेलो रे मेलो! आता काही खरं नाही. या डॉक्टर मंडळीला आता माझ्याकडून कायमची पेन्शन.’’ ही प्रतीक्षिप्त क्रिया गौतमची डॉक्टरांचे कौन्सिलिंग संपल्या संपल्या होती. इतकी दुसऱ्या टोकाची प्रतिक्रिया डॉक्टरांच्या समजावणीला गौतमची होती.
आता आपल्याला दोघांचीही प्रतिक्रिया म्हणजे नेमके काय, त्याचा अर्थ काय घ्यायचा, त्याचे परिणाम कसे कसे होतात, हे समजावून घ्यायचे आहे. पहिली प्रतिक्रिया आपण सुयशची बघितली. सुयशच्या आयुष्यामधील हा सगळ्यात मोठा नकारात्मक क्षण त्याच्यावर बेतला होता, की ज्यामध्ये त्याचा जीवदेखील जाऊ शकत होता; परंतु सुयशने तो क्षण अत्यंत सकारात्मकतेने घेत त्याला सामोरे गेला. म्हणजे सुयशने नेमके काय केले बरे? ज्या मिनिटाला सुयशला कळले, की त्याला हृदयविकाराचा मोठा झटका आला आहे, त्याच वेळी त्याने त्याच्याकडे कसे बघितले?
अनेकांच्या आयुष्यात अनेक प्रकारचे आजार येतच असतात आणि काही लोकांचा त्यात जीवदेखील जात असतो किंवा काही लोकांचे अशा आजारांमध्ये कायमस्वरूपी नुकसान म्हणजे अपंगत्व येते. जसे की अपघातामध्ये, अनियंत्रित मधुमेहाच्या रुग्णांमध्ये भरून न येणाऱ्या जखमांमध्ये, कॅन्सरसारख्या आजारामध्ये कित्येक वेळा जीव जात असतोच की. ज्या आजाराने संपूर्ण जगाला कसे जगावे, याचा धडा दिला त्या कोविडमध्ये लाखो लोकांचे जीव गेलाच ना आणि मग मला तर हार्टअटॅकच आला ना! मी तर ऑलरेडी चांगल्या हॉस्पिटलमध्ये पोचलेलो आहे.
चांगल्या डॉक्टरांच्या हातामध्ये मी सुरक्षित आहे. आता यांना हे सर्व काही म्हणजे रक्त पातळ करणे, अँजिओग्राफीनंतर गरज पडल्यास प्लास्टिक किंवा बायपास. डॉक्टरांना डॉक्टरांचे काम करून घेऊ दे मग माझ्याकडून माझ्या गतआयुष्यामध्ये, जीवन जगण्यामध्ये ज्या काही चुका घडल्या आहेत, ज्या काही त्रुटी राहून गेल्या आहेत त्या सर्व मी बाजूला सारून माझे आयुष्य अगदी तणावमुक्त आनंदाने जगेन. हे सर्व सुयशने दोन-चार दिवस विचार करून ठरविलेले नव्हते, तर अक्षरशः फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये झरझर त्याच्या मनाने अगदी ॲडव्हान्स कॉम्प्युटरच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने विचार करून दिलेली प्रतिक्रिया होती आणि अगदी गौतमचीही प्रतिक्रिया अशीच फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये कॉम्प्युटरपेक्षाही जास्त वेगाने विचार करूनच आलेली होती; परंतु गौतम मात्र आपल्या आयुष्यात आपण कसे वागलो आहोत, कुठे कुठे चुकलो आहोत, आपण काय काय करायला पाहिजे होते, हे सर्व करावयाचे सोडून तो देवाला दूषणे देत सुटला होता.
जणू काही देवाची आणि याची दुश्मनीच आहे. देवाला फक्त याला आणि यालाच संपूर्ण जगामध्ये त्रास द्यायचा होता, अशा पद्धतीची संपूर्णपणे नकारात्मक प्रतिक्रिया गौतमने प्रतीक्षिप्त क्रियेने दिली होती. एक जण देवाचे मनापासून आभार मानत होता, तर दुसरा देवाची आणि त्याची दुश्मनी आहे, असे दाखवत होता. दोन्हीही प्रतिक्रिया या प्रतीक्षिप्त क्रियेने आलेल्या होत्या आणि त्यामुळेच त्या प्रतिक्रियांतूनच दोघांचेही व्यक्तिमत्त्व सकारात्मक आहे की नकारात्मक, हे ताबडतोब कळत होत. आपण विश्वास ठेवा अगर नका ठेवू , सुयशच्या तब्येतीत अत्यंत झपाट्याने सुधारणा झाली.
अँजिओप्लास्टी झाली. अगदी लवकरच सुयशने आपल्या दैनंदिन कामकाजास सुरवातही केली. ताणतणावाचे अगदी व्यवस्थित व्यवस्थापन केले. ज्या काही वाईट सवयी होत्या, त्या पूर्णपणे बंद केल्या. योग्य तो आहार घ्यायला सुरवात केली. छानपैकी व्यायाम सुरू केला. थोडक्यात काय केले, तर एक आदर्श जीवनशैली सुयशने अंगीकारली आणि झालेल्या अँजिओप्लास्टीला, हृदयात टाकलेल्या स्टेंटला हृदयातच ठेवले. जरासुद्धा त्या स्टेंटचा शिरकाव आपल्या मेंदूत होऊ दिला नाही. त्याची काळजी मात्र त्याने सर्वार्थाने शंभर टक्के घेतली.
जसे की अँजिओप्लास्टी केलेल्या रुग्णांना रक्त पातळ ठेवण्याच्या गोळ्या आयुष्यभर घ्यायला लागतात. त्या गोळ्या वेळच्या वेळी घेणे, कार्डिओलॉजिस्टकडे वेळच्या वेळी तपासणीला जाणे, त्याने दिलेल्या सूचना तंतोतंत पाळणे हे सर्व शंभर टक्के करावयाचे. इतर वेळी मात्र ते स्टेंट फक्त आणि फक्त शारीरिक हृदयातच तो ठेवत होता आणि जणू काही आपल्याला कुठलाही आजार नाही, या पद्धतीनेच त्याचे तणावरहित जीवन सकारात्मकतेने सुयश आजही आनंदाने जगतो आहे. अर्थातच याउलट गौतमरावांचे आयुष्य होते.
हार्टअटॅक आल्यानंतरची त्याची प्रतिक्रिया हे त्याचे व्यक्तिमत्त्वच होते. नकारात्मकता त्याचा काही भाव होता. जशी त्याने पहिली प्रतिक्रिया दिली होती तशा अनेक प्रतिक्रिया तो वेळोवेळी देतच होता आणि आत्ताआत्तापर्यंत शेवटपर्यंत देतच होता. त्याने प्रत्येक गोष्टीचा बाऊ करून घेतला होता. प्रत्येक वेळी तो कोणाला न कोणाला दूषणे देतच होता. औषध-गोळ्या घेणे म्हणजे जणू काही धर्मसंकटच आणि डॉक्टरकडे जाणे म्हणजे गौतमसाठी किती अवघड असेल आपण विचार करा.
या सर्व नकारात्मक गोष्टींचा जो काही परिणाम गौतमवर व्हायचा होता तो बरोबर झालाच. त्याच्या तब्येतीत सुधारणा तर सोडाच, त्याही पुढे जाऊन त्याला पुढच्या चार महिन्यांमध्येच मधुमेहाचे निदान झाले आणि त्याच्या पुढच्या चार-सहा महिन्यांमध्येच त्याचा रक्तदाब वाढत असल्याचेही निदान झाले. या सर्व गोष्टींचा प्रचंड बाऊ केल्यामुळे गौतम खूपच जास्त ताणतणावाखाली राहू लागला. दिवसेंदिवस त्याची तब्येत खालावतच गेली आणि अँजिओप्लास्टी झाल्याच्या तिसऱ्या वर्षी पुन्हा एकदा हृदयविकाराचा फार मोठा झटका गौतमला आला आणि दुर्दैवाने गौतमची प्राणज्योत मालावली.
हा फरक आहे सकारात्मकता आणि नकारात्मकता यांचा. ही सकारात्मकता आणि नकारात्मकता फक्त आजारांच्या बाबतीतच असते का हो? नाही. आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये ते खासगी आयुष्य असो की ऑफिसमधील असो की अगदी आपली स्वतःची मोठी कंपनी असू देत त्यातलं असो या प्रत्येक ठिकाणी नानाविध घटना ा यघडतच असतात. त्यातल्या काही सकारात्मक असतात, तर काही नकारात्मक. सकारात्मक गोष्टी आपण अतिशय आनंदाने स्वीकारत असतोच. प्रश्न येतो तो आयुष्यातील या नकारात्मक क्षणांना सामोरे कसे जातो त्याचा!(लेखक नाशिकमधील प्रथितयश सुयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.