लेखक : राजाराम पानगव्हाणे
सोशल मीडिया शिवाय आजच्या काळात जगण्याची कल्पनाही करता येत नाही, इतका तो आपल्या दैनंदिन आयुष्याचा हिस्सा बनला आहे.
माहिती मिळवण्याचा उत्तम स्रोत, आपले विचार मांडण्याचे मुक्त व्यासपीठ, आनंद किंवा दु:ख वाटून घेण्याचे हक्काचे माध्यम म्हणजे सोशल मीडिया. एकूणच या माध्यमाच्या व्यापकतेवर आणि उपयुक्ततेवर प्रकाशझोत टाकणारा दृष्टिकोन.... (saptarang latest marathi article by rajaram pangavane on digital innovation of social media remarkable nashik)
आजचे युग हे माध्यम युगासोबतच डिजिटल युग म्हणूनही ओळखले जाते. सध्याच्या काळात तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग दिवसागणिक होताना दिसत आहे. या वाढत्या तंत्रज्ञानाच्या विकासात सोशल मीडियाच्या क्षेत्राचा प्रचंड आविष्कार झालेला दिसून येतो.
फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियावरील अॅप्लिकेशन्सचा ट्रेंड लक्षणीय म्हणावा लागेल. या सर्व सोशल नेटवर्किंग साइट्समध्ये फेसबुकचे महत्त्व व युजरची संख्या अब्जावधींच्या घरात आहे. या सगळ्यात फेसबुक सर्वसमावेशक सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म मानले जाते.
आज प्रत्येक व्यक्ती दिवसभरात सरासरी दोन ते तीन तास सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे सर्वेक्षण सांगते. एक काळ असाही होता, की आपल्यापैकी कोणालाही सोशल मीडिया म्हणजे काय हे देखील माहीत नव्हते.
आपले पूर्वज संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी कबुतरांचा वापर करायचे. जलद दळणवळणासाठी उंट, घोडे यांचासुद्धा वापर होत असे. सध्याच्या काळात तर कित्येक गोष्टींसाठी आपण पूर्णपणे सोशल मीडियावर अवलंबून आहोत.
सोशल मीडिया म्हणजे नक्की काय? तर वेबसाइट्स किंवा अॅप्लिकेशन्स यासारखी माध्यमे. जे युजर्सला कंटेंट तयार करण्याची आणि इतरांबरोबर शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करून देते.
एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मेसेज, कॉमेंट यासारखे वेगवेगळे पर्याय या माध्यमांवर उपलब्ध आहेत. जेव्हा संगणक आले, तेव्हा ते एकमेकांशी जोडण्याची गरज निर्माण झाली. त्या गरजेतून इंटरनेटचा जन्म झाला. जगातील पहिला ईमेल ‘रे टॉमलिंसन’ या व्यक्तीने १९७१ मध्ये पाठवला होता.
माहितीची आदानप्रदान, मीटिंगच्या वेळा शेअर करणे, फाइल डाउनलोड करणे, मेसेज पाठवणे अशा सुविधा सध्या प्रचलित आहेत.
सोशल मीडियाची खरी सुरुवात १९९७ मध्ये ‘सिक्स डिग्रीज’ या साइटपासून झाली, असे म्हणता येईल. सिक्स डिग्रीजवर प्रोफाइल तयार करणे, मित्र जोडणे, नवीन लोकांना या साइटवर येण्यासाठी आमंत्रण पाठवणे अशा सुविधा होत्या.
आज जे सोशल मीडियाचे स्वरूप आहे, त्याची सुरुवात झाली ती पहिली सोशल नेटवर्किंग साइट ‘फ्रेंडस्टर’ पासून. २००२ मध्ये आलेल्या या साइटने सोशल मीडियाचा चेहरामोहराच बदलून टाकला, कारण फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची सुविधा सर्वप्रथम इथेच उपलब्ध झाली होती.
अल्पावधीतच फ्रेंडस्टरला लोकप्रियता लाभली, पण पुढे अनेक प्रतिस्पर्धी या क्षेत्रात आल्याने फ्रेंडस्टरला अस्तित्व टिकवता आले नाही. सर्वांत अगोदर सुरू झालेली व आजही अस्तित्वात असणारी सर्वांत जुनी नेटवर्किंग साइट लिंक्डइन होय.
लिंक्डइनची लोकप्रियता अद्यापही टिकून आहे. नोकरी संदर्भात माहिती या साइटवर प्रसिद्ध केली जाते. ‘मायस्पेस' ही सोशल नेटवर्किंग साईट सुरू झाल्यापासून सुरू झाल्यापासून कमी काळात सर्वांत मोठी नेटवर्किंग साइट बनली.
यात असंख्य अशा सुविधा दिल्या गेल्या होत्या, ज्याने तरुणाईला भुरळ पाडली, यामध्ये कलर कॉम्बिनेशन बॅकग्राऊंड म्युझिक, प्रोफाइलमध्ये अनेक नवनवीन आयडिया समाविष्ट केल्यामुळे ती अधिक लोकप्रिय बनली.
विविध रंगाची बॅकग्राउंड बदलण्याची सुद्धा यात सुविधा होती. याच काळात त्यानंतर सुरू झालेल्या ‘ऑर्कुट’लाही बरीच लोकप्रियता मिळाली. ऑर्कुट ही भारतात सर्वांत जास्त व्हिजिट मिळणारी साइट होती.
भारतात सोशल मीडियाचा सुवर्णकाळ ऑर्कुटनेच आणला. पण मायस्पेस आणि ऑर्कुट या दोन्ही सोशल नेटवर्किंग साइट्स एवढ्या लोकप्रिय असूनही काळाच्या ओघात मागे पडल्या.
२००४ मध्ये मार्क झुकेरबर्गने फेसबुक सुरू केले, तेव्हा त्याला कदाचित कल्पनाही नसेल की फेसबुक इंटरनेट जगतात उलथापालथ करेल. सुरुवातीला फक्त हार्वर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना एकमेकांशी संवाद साधता यावा, एवढाच हेतू फेसबुकच्या निर्मितीमागे होता.
परंतु, कालांतराने ही कल्पना लोकांना इतकी आवडली की फेसबुक जगभरात पसरत गेले. अन्य नेटवर्किंग साइट्सची दुकाने फेसबुकने बंद करून टाकली. फेसबुकच्या वापरकर्त्यांना प्रचंड सुविधा उपलब्ध आहेत.
इथे मित्रांशी, नातेवाइकांशी, एवढेच काय तर अनोळखी लोकांशीही संवाद साधता येतो. फेसबुकवर व्यवसाय वाढवता येतो, तसेच आपल्या दैनंदिन जीवनातल्या खाजगी गोष्टीही इतरांशी शेअर करता येतात.
‘न्यूजफीड’हे फेसबुकचे फिचर क्रांती घडवणारे ठरले. फेसबुकच्या माध्यमातून लोकांशी अथवा समाजाशी संवाद साधताना अनेक देशातील सरकारांवर व राज्यकर्त्यांवर सत्ता गमवण्याची सुद्धा वेळ आली.
इमेज बिल्डिंग समोरच्यांपेक्षा आपण कसे योग्य आहोत, हे पटवून देण्यात तसेच जनमत तयार करण्यासाठी लोकांना एकत्र आणणे हे फेसबुकच्या माध्यमातून अतिशय सहजपणे करता येऊ लागले.
इतर सोशल नेटवर्किंग साईट अथवा प्लॅटफॉर्मचा विचार केला असता फेसबुक हे सर्वांत लोकप्रिय आहे. लोकांच्या गरजा ओळखून इनोव्हेशनचे काम फेसबुक तत्परतेने करते, हेच त्यांच्या यशाचे रहस्य देखील आहे.
फेसबुक खालोखाल दुसरी लोकप्रिय नेटवर्किंग साइट म्हणजे ट्विटर. ट्विटरवर कमी शब्दात पोस्ट टाकता येतात, ज्याला ‘ट्वीट’ म्हणतात. २००६ मध्ये ही टिवटिव सुरु झाली. आपल्या आवडत्या कलाकारांशी, नेत्यांशी याद्वारे संवाद साधता येतो.
या सुविधेमुळे ट्विटर लोकप्रिय झाले. ऑनलाइन बातम्या देणारे माध्यम म्हणूनही ट्विटर जगभर प्रिय आहे. ट्विटरवरील ट्रेंडिंगमधील हॅशटॅग रेडिओ, टीव्हीपेक्षाही जास्त वेगाने काही क्षणात जगभर पोहोचतात.
सध्या तरुणाईला इन्स्टाग्रामने जणू वेड लावले आहे. २०१० मध्ये सुरू झालेला हा प्लॅटफॉर्म वेगळेपणामुळे एवढा लोकप्रिय बनला की अल्पावधीतच फेसबुक आणि ट्विटर यांच्या जोडीला तो येऊन बसला. फेसबुक, इन्स्टाग्राम एकाच व्यवस्थापनाच्या असल्या तरी युजरच्या दृष्टीने त्या वेगवेगळ्या साईट आहेत.
या सर्व सोशल नेटवर्किंग साईट्समध्ये फेसबुक वापरकर्त्यांची म्हणजेच युजर्सची संख्या सर्वाधिक आहे. स्पर्धात्मक युगात फेसबुकला टक्कर देण्यासाठी गुगलने गुगल प्लस प्लॅटफॉर्म तयार केला. त्याचा मोठा गाजावाजाही झाला.
पण फेसबुक समोर ते टिकू शकले नाही. सध्याच्या घडीला एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी अनेक सोशल नेटवर्किंग साईट उपलब्ध आहेत.
स्नॅपचॅट, यूट्यूब, पिंटरेस्ट, फ्लिकर, कोरा, टिकटॉक, रेडिट हे उपलब्ध आहेत. व्हॉट्सअॅप नेटवर्किंग साइट्समध्ये गणले जात नसले तरी तेही सोशल मीडियाचा एक महत्त्वाचा अंग आहे.
(लेखक ब्रम्हा व्हॅली ग्रृप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.