Book
Book esakal
सप्तरंग

तान्हे बाळ: सृष्टी बाळाची भव्य कल्पना!

- डॉ. नीरज देव

गुणवंत हनुमंत देशपांडे यांचा जन्म वाटखेड, जि. यवतमाळ येथे १८९७ साली झाला. नावाप्रमाणेच गुणवान अन् प्रतिभासंपन्न असलेल्या या वैदर्भीय कवीच्या वाट्याला उपेक्षाच आली.

कवीची सुखद संभ्रम ही कविता बड़ोद्याच्या साहित्य सम्मेलनात खूप गाजली. तरीही ही उपेक्षा कमी होण्याऐवजी बृहत्तर होत गेली. परिणाम १९२३ साली विदर्भ साहित्य संघाची स्थापना होण्यात झाला.

कवीची गणना गूढवादी कवीत होत असली, तरी त्याच्या अनेक कविता सरळ आणि सुगम आहेत. कवीच्या ९५ कविता निवेदन या काव्यसंग्रहात प्रकाशित झाल्या असून त्याहून जवळपास दुप्पट कविता कोणत्याही संग्रहात समाविष्ट झालेल्या नाहीत. (Saptarang latest marathi articles by dr neeraj deo on marathi poet gunvant deshpande nashik news)

आपल्या कविता कशा असाव्यात याची मनोमन कल्पना करताना कवी लिहितो,

नको क्षुद्र भावनांची
गाणी चित्त विकृतीची !
सर्व भावांचे उगम
संगीताचे अंतर्याम -
तिथे स्थिरावली वृत्ती
म्हणा भावना निवृत्ती!
अभावाचे भावगीत
गावे वाटते सांप्रत!

कवीला वाटते क्षुद्र भावना म्हणजे चित्त विकृती होय. तर संगीतात वृत्ती स्थिरावणे म्हणजे भावना निवृत्ती होणे होय. आणि भावना निवृत्ती होणे म्हणजे अभाव होय. येथे कवी भावशून्यता न म्हणता अभाव म्हणतो याचे कारण भावना शून्यता म्हणजे भावना नसणे, भावनांचा लोप होणे होय.

तर अभाव म्हणजे भावनातीत जाण्याचा प्रयास करणे होय. अभावात भावना असतात, पण तीत लिप्त होणे नसते.  त्यामुळेच असेल तर्कशास्त्रज्ञ अभावाचे अस्तित्व त्याला सातवा पदार्थ म्हणत मोकळेपणाने मान्य करतात. याच अभावाला शब्दबद्ध करताना कवी, 'कविता नवनारी ' ला आळवताना दिसतो.

सुखद संभ्रम कवितेत प्रेयसी नि चंद्रमा यात खरा चंद्र कोणता असा संभ्रम आपल्या मनात उत्पन्न झाल्याची स्विकारोक्ती देत कवी,

नभो मुकुरि की सखि बघतसे
बिंब मुखाचे तिथे पडतसे
जननयना ते चंद्र गमतसे

असे सांगतो. तेंव्हा यातील सखिच्या मुखाचे बिंब आकाशारुपी आरशात पडले, अन त्यालाच लोक चंद्र म्हणत संभ्रमित झाले. ही कल्पना 'उत्फुल्ल प्रतिभा आणि उत्कट प्रितीचा अन्योन्य संगम आहे' म्हटल्यास वावगे ठरणार नाही असे रसिकमनास वाटून जाते.

'वार्‍याचे भारे' या अत्यंत अर्थगर्भ गूढ कवितेत शाश्वत अन् अशाश्वत अशा दोन बाबींची जोडगोळी करीत, कवी अशाश्वतच्या मागे लागणे म्हणजे वार्‍याचे भारे वाहण्यासारखे असल्याचे सुचवतो. यातील कल्पना उच्च, भव्य असून चित्तवेधक आहेत.

अष्टदिशा-स्तंभावरी
अवकाशाची इमारत
निरालंब राहे उभी
निराकार भवती भिंत !

दिशारुपी आठ खांबावर आकाशाची इमारत उभी आहे. हे सांगता सांगताच कवी ती निरालंब अर्थात आधारहीन असल्याचे सांगत त्या खांबांचा आधार नाकारतो. अन् निराकार म्हणत भिंतीची उपमा देत साकार करीत जातो. तेंव्हा कवी प्रतिभेची ही अद्भुत किमया भल्याभल्यांना विस्मित करते.

शेवटी कवी,

वाहत्या प्रवाहावरी
रेखिले रम्य चित्र
पळणार्‍या पाण्यासवे
चित्र पळाले परत्र

असा कळस गाठतो. तेंव्हा सुज्ञ रसिक कवी प्रतिभेसमोर आपोआप नतमस्तक होतो. यातील वाहता प्रवाह नि पळते पाणी शाश्वत काळाचे प्रतीक असून रेखलेले चित्र सुंदर, सुभग असले तरी अशाश्वत असल्याचा भाव सुरेख रेखाटला आहे. कवीच्या या पंक्ती मराठी साहित्यात अजोड ठराव्यात, अशा उतरल्या आहेत.

आज आपण कवीची तान्हे बाळ ही कविता पाहणार आहोत. कवितेच्या नावावरून जरी ही लहान बाळावरची कविता वाटत असली, तरी ती एक निसर्ग नि निर्माता यांचे नाते दाखविणारी सुरम्य कविता आहे. पहिल्या कडव्यात कवी सांगतो,

राजाच्या राणीला
पूर्ण झाले मास
मूल ये जन्मास
अभिनव!

यात राजा म्हणजे सृष्टी निर्माता असून राणी म्हणजे निर्माण शक्ती आहे. तिच्या पोटी जन्माला आलेले अभिनव बाळ म्हणजे ही ब्रम्हांडभर पसरलेली सृष्टी आहे. तिला न्हाऊ घालायला तिने आकाश गंगेचे पाणी घेतले.

बाळाच्या डोळ्यात रात्ररुपी अंधाराचे काजळ घातले. तितक्यात बाळाला भूक लागली म्हणून ते रडू लागले. तेंव्हा तिने चंद्ररुपी चांदीच्या ताटात त्याला जेवण वाढले. सोबत सूर्यरुपी सोनेरी ग्लासात तेजोमय पाणी पिण्यास दिले, असे वैभव वर्णन करताना, ताटात काय काय वाढले सांगताना कवी,

चांदण्यांचा भात
कालवूनी खात
तान्हूला तो !

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

असे वर्णन करतो. कवी वा. ना. देशपांडे याला कल्पनांचा गोंधळ म्हणत असले, तरी त्यातील मनोहरता त्यांनीही स्विकारलेली आहे. बाळाला झोपायला झोका हवा म्हणून तिने झोका कसा बांधला याचे बहारीचे वर्णन करताना कवी-

धृवावरी दोन्ही
दोर्‍या अयनांच्या
बांधोनी; काळाचा-
केला झोका!

दक्षिण नि उत्तर ध्रुवावर दक्षिणायन अन उत्तरायनरुपी दोर्‍या टाकून केलेला झोका ही भव्यदिव्य कल्पना आहे.  या झोक्यात सृष्टीरुपी तान्हे पहुडले आहे. त्याची दीर्घ निद्रा चालली असून त्याचा पाळणा काळाचा असल्याने सतत चालतो आहे. परिणामी,

युगापाठी युगे
जाती, तरि तान्ह
ऐसा बाळराणा
नाही, दुजा !

युगा मागून युगे लोटली तरी सृष्टीरुपी बाळ अजून तान्हेच आहे. कारण सृष्टी सतत अवतरत असल्याने ती पुरातन असली तरी वृद्ध नसून तान्हीच आहे, असा भाव कवी व्यक्तवीतो. तेंव्हा अशाश्वतातील शाश्वततेचे आगळे दर्शन मनाला घडते.

कवीची एवढी एकच कविता त्याच्या विस्मृतीत गेलेल्या अचाट तरीही उपेक्षित प्रतिभेला स्मृतिसंजीवनी द्यायला पुरेशी ठरावी, अशी अपेक्षा बाळगायला प्रत्यवाय नसावा.

(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक असून दशग्रंथी सावरकर या पीएच.डी समतुल्य पुरस्काराने सन्मानीत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

SCROLL FOR NEXT