Ram Ganesh Gadkari
Ram Ganesh Gadkari esakal
सप्तरंग

शतकानंतर ही टवटवीत 'गुलाबी कोडे'

- डॉ. नीरज देव

गोविंदाग्रज अर्थात् राम गणेश गडकरी (१८८५ ते १९१९) हे मराठीला मिळालेले अद्भुत वरदान होते. गोविंदाग्रज हे नाव त्यांनी त्यांच्या गोविंद या लहानभावाच्या अकाली मृत्यूनंतर घेतले. राम गणेशांचा जन्म नवसारीचा अन् मृत्यू सावनेरचा म्हणजे केवळ ठराविक चार अक्षरांची आलटापालट असा दुर्मिळ योग आपल्याला लाभतोय, अशी आपल्या मृत्यू स्थानासंबंधीची कोटी दस्तुरखुद्द गडकरीनींच मृत्यूच्या आधी केली होती. एवढेच नव्हे तर आपल्या मृत्यूची दिनांक अन् वेळ त्यांनी स्वतः सांगितली होती, अशी त्यांच्या द्वितीय पत्नीची साक्ष आहे.
नाट्य, विनोद अन् काव्य या तीनही क्षेत्रात अजरामर कर्तृत्व सिद्ध केलेला हा मराठीतील महान सारस्वत होय. त्यांच्या काव्याचा विशेष म्हणजे प्रेम या स्थायी भावाभोवती अखंड फिरत राहून व्यक्त केलेला उत्तुंग कल्पना विहार होय. त्यातही त्यांच्या बहुतेक कवितात आर्त दुःखांचा तरी मनमोहक रंग वाचकाला मिळतो. त्यामुळे त्यांना प्रेमशाहीर म्हणतात. विफल नि विराण शोकार्त लिखाणात गडकऱ्यांचा हात धरू शकणारा कवी मिळणे अवघड आहे, अशा कविने लिहिलेली एक अत्यंत हृदयंगम कविता गुलाबी कोडे ही होय.

कवितेवरील टीपेत कवी लिहितो, "संध्याकाळी सूर्य पश्चिम दिशेस असताना पश्चिम तर तांबडी होतेच; पण पूर्व दिशेसही त्याच रंगाची छटा दिसते. हे पुष्कळांनी पाहिलेच असेल -" अन् याच टिपेला अनुसरून कवी कवितेचे पहिले दोन चरण लिहितो.
रंग गुलाबी संध्या पसरी पश्चिम दिग्भागी समोर पूर्वा स्वमुख रंगवी त्याच रम्य रंगी
हे पाहून कवितेतील त्या रमणीला कोडे पडते, 'पश्चिमेला सूर्यबिंब असल्याने ती गुलाबी दिसते, हे तर मला कळते. पण पूर्वेला सूर्यबिंब नसताना पूर्व गुलाबी का झाली हे मला उमगत नाही.' म्हणून ती तिच्या विनोद पंडित अन् चतुर पतीला कोडे टाकते,
"अपरा वदनी रमते लाली रवि सहवासानेरवी नसता परी का रंगावे प्राचीच्या वदने?रंग इकडचा तिकडे वठला, छटा कुठुनि गेली?ही जादूची नजरबंदि कुणी, कधी, कशी केली?" तिच्या या प्रश्नावर तिचा पती कौतुकाने हसला, कारण मनोमन त्याला वाटले,
ओठ गुलाबी, गाल गुलाबी, गुलाबीच कोडे
अन् तिचा एक हात धरून, दुसरा तिच्या कमरेवर ठेवत तो म्हणाला, 'तुझ्या कानात हे रहस्य सांगतो.' अन् तिला जवळ ओढून त्याने तीस मुकाच ऐकवला. त्यामुळे लाजून ती चटकन दूर सरकली. तेंव्हा तो तिला म्हणाला,

"बघ हृदयाच्या आरशात जे चित्र तुझे डोलेरविबिंबासम चुंबन बिंबचि विलसत या गालीसहज तयाचि छटा गुलाबी पसरे भवतालीचुंबनचित्र न परि उमटता या दुसऱ्या गाली,सांग वल्लभे ! नाचतसे का त्यावर ही लाली? रंग इकडचा तिकडे वठला, छटा कुठुनि गेली?ही जादूची नजरबंदि कुणी, कधी, कशी केली?"
अर्थात तो तिला विचारतो, 'मी तुझे जे चुंबन घेतले, त्याचा ठसा एकाच गालावर असताना दुसऱ्या गालावर लाली कशी आली? जशी ती आपोआप दुसऱ्या गालावर येते. तशीच पश्चिम वा प्राचीला सूर्य बिंब असताना होत असते. येथे तो नकळत पूर्व पश्चिमेचे, सृष्टीचे एकत्व दाखवत आहे.

हे अत्यंत छोटेसे पण तितकेच नाट्यमय, रोमँटिक कथानक वर्णन केल्यावर कवी सांगतो, काट्याने काटा काढावा, असे आपण म्हणतो, मग गुलाबाला गुलाबानेच फुलावायचे असते हा हृदयाचा नियम असतो. हे सारे झाल्यावर ते कोणती ओठ गोष्ट करीत असतील बरें? असे गुलाबी कोडे रसिकांना टाकून कवी कविता संपवतो. येथे कवी कविता संपवताना प्रश्न टाकून रसिकांच्या कल्पना विलासाला वाव देतो. त्यामुळे ही कविता रसिकांच्या मनात रुंजी घालत राहते. भा. रा. तांब्याची कुणी कोडे माझे उकलिल का? ह्या एकत्व दाखविणाऱ्या कवितेची ही पुढची अन् उत्कट पायरी वाटावी, अशीच ही कविता आहे. सप्टेंबर १९११ साली म्हणजे सुमारे १११ वर्षांपूर्वी लिहिलेली ही कविता आजही टवटवीत अन् रसरशीत आहे. त्यामुळेच गुलाबी कोडे सारखी कविता केवळ गोविंदाग्रजच लिहू जाणे ही आचार्य अत्र्यांची उक्ति यथार्थ वाटते.

(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT