Astrologer Online Fraud : बंगळुरूमधील एका २४ वर्षीय तरुणीला लग्नाबाबत भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता चांगलीच महागात पडली. एका बनावट ज्योतिषाने तिची तब्बल ६ लाख रुपयांनी फसवणूक केली. ही घटना घडली आहे इंस्टाग्रामवरील खोट्या प्रोफाइलमुळे, जिथे एका व्यक्तीने स्वतःला ज्योतिष आणि तंत्र-मंत्र तज्ज्ञ असल्याचे भासवले.
बंगळुरूमधील इलेक्ट्रॉनिक्स सिटीमध्ये राहणाऱ्या प्रिया (नाव बदललेले) या खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीला इंस्टाग्रामवर ‘splno1indianastrologer’ नावाच्या प्रोफाइलची माहिती मिळाली. या प्रोफाइलवर अघोरी बाबाची छायाचित्रे होती आणि त्याने स्वतःला प्रसिद्ध ज्योतिष म्हणून मांडले होते.
तिने या अकाऊंटवर मेसेज केला आणि तिला विजय कुमार नावाच्या व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला. व्हॉट्सअॅपवर नाव आणि जन्मतारीख विचारल्यानंतर, त्या व्यक्तीने सांगितले की तिचे प्रेमविवाह होईल, पण तिच्या कुंडलीत काही गंभीर दोष आहेत. तो विशेष पूजा आणि उपाय करून हे दोष दूर करू शकतो, परंतु यासाठी तिला पैसे भरावे लागतील.
सुरुवातीला विजय कुमारने फक्त 1,820 रुपये मागितले, जे फार मोठे रक्कम नव्हते. प्रियाने विश्वास ठेवून ही रक्कम ऑनलाइन पाठवली. मात्र, यानंतर त्याने वारंवार नवनवीन पूजेसाठी पैसे मागायला सुरुवात केली. “जर हे उपाय केले नाहीत तर भविष्यात मोठे संकट येईल” असे सांगत त्याने तिच्याकडून हळूहळू लाखो रुपये उकळले.
प्रियाला आपली फसवणूक झाल्याचे समजले, तेव्हा ती ६ लाख रुपये गमावून बसली होती. प्रियाने जेव्हा आपले पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विजय कुमारने 13,000 रुपये परत केले पण उर्वरित रक्कम देण्यास नकार दिला. त्याने धमकी दिली की तो आत्महत्या करून प्रियाचे नाव सुसाईड नोटमध्ये लिहील.
याच दरम्यान, तिला प्रशांत नावाच्या व्यक्तीकडून कॉल आला, ज्याने स्वतःला वकील म्हणून ओळख दिली. त्याने सांगितले की विजय कुमार मानसिक तणावाखाली आहे आणि आत्महत्या करणार आहे, त्यामुळे प्रियाने पैशांसाठी मागणी करू नये.
प्रियाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे सायबर गुन्हेगारांचे काम असून, खरा ज्योतिष किंवा वकील खरोखर नाही.
या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
या घटनेवरून सायबर गुन्हेगार नवीन युक्त्या लढवत आहेत, हे स्पष्ट होते. कोणताही अज्ञात व्यक्ती तुम्हाला पैसा देऊन भविष्य सुधारता येईल असे सांगत असेल, तर सावध राहा. इंटरनेटवरील बनावट ज्योतिषांपासून सावध राहा आणि अशा घटना झाल्यास पोलिसांशी संपर्क करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.