Soichiro Honda
Soichiro Honda  esakal
विज्ञान-तंत्र

एका लोहाराचा मुलगा ते होंडा मोटर्सचा मालक होण्यासाठी केलेला संघर्ष

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

आज सोईचिरो होंडा या अवलियाचा जन्मदिन त्यांना विनम्र अभिवादन.

आज अशा व्यक्तीची गोष्ट सांगतो ज्यांचे नाव सगळ्यांनी ऐकलं असले तरी त्याच्याबद्दल कुणाला फारशी माहिती नाही. १९०६ ला जपानमध्ये पेशाने ‘लोहार’ असलेल्या कुटूंबात त्याचा जन्म झाला. वडिलांचा सायकल रिपेअरचा व्यवसाय असल्याने त्याला बालपणापासूनच दुचाकींची तशी भारी आवड असली तरी पुस्तकी अभ्यासात त्याला फारसा रस नव्हता. तांत्रिक गोष्टींचे बाळकडू प्यायला असल्याने वयाच्या पंधराव्या वर्षीच शिक्षणाला रामराम ठोकत त्याने राजधानी ‘टोकियो’ गाठले.

एके दिवशी इथे त्यानं वर्तमानपत्रात ‘शोकाई’ कार कंपनीची ‘मेकॅनिक पाहिजे’ ही जाहिरात बघितली आणि गडी तडक तिथं जाऊन धडकला. कोवळं वय बघून तिथं मात्र त्याला साफसफाईचं काम देण्यात आले. तो ‘शोकाई’ मधला वयाने सगळ्यात लहान कर्मचारी. वय लहान असले तरी पठ्ठ्याची स्वप्नं मोठी होती. त्यानं थेट मालकाला ‘मला मेकॅनिकल प्रशिक्षण मिळावं’ असा अर्जच लिहिला. ‘शोकाई’च्या मालकानं त्याचा हा अर्ज मंजूर करत त्याची रवानगी मेकॅनिक विभागात केली. त्याला स्वर्ग जणू दोनच बोटं उरला. या विभागात रेसिंग कार्स तयार केल्या जात. तिथं त्यानं जीव ओतून काम केलं आणि अतिशय कमी वेळात ‘सगळी’ कामं शिकून तो एक उत्कृष्ट मेकॅनिक झाला.

२३ नोव्हेंबर १९२४ या दिवशी ‘शोकाई’नं पाचव्या जपान कार चॅम्पियनशिप मध्ये नाव नोंदवलं आणि अत्यंत अनपेक्षितरित्या त्यांनी ही रेस चक्क जिंकली. ‘तो’ जिंकलेल्या कारचा मेकॅनिक होता. यशासारखं दुसरं यश नसतं. जिंकलेली कार जपानवासियांच्या गळ्यातला ताईत बनली. शोकाईच्या देशात सर्वत्र शाखा सुरू झाल्या आणि यातल्या एका शाखेची जबाबदारी एकवीस वर्षीय त्याच्या खांद्यावर देण्यात आली. चार वर्षे तिथं इमानेइतबारे काम केल्यावर त्याच्या लक्ष्यात आलं,” राव असं तर दुसऱ्यांकडे काम करता करता तर आपलं आयुष्यही निघून जाईल. स्वप्नांचं काय?”

१९२८ ला शोकाईला रामराम ठोकत तो घरी परतला आणि त्यानं छोटसं गॅरेज थाटत आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला आणि ‘टोयोटा’ कंपनीच्या इंजिनसाठी पिस्टन रिंग्ज बनवायला सुरूवात केली. त्याच्या कामाचा उरक इतका होता की टोयोटानं त्याला पिस्टन रिंग्जचं कॉंन्ट्रॅक्टरच देऊन टाकलं पण तांत्रिक कामात फक्त उरक असून चालत नाही. विशेषत: दिर्घकालीन शर्यतीत ‘दर्जा’ महत्वाचा असतो. कामाचा दर्जा कमअस्सल असल्याने टोयोटाने काही दिवसातच त्याच्या सोबतचा करार रद्दबातल ठरवला. ‘प्रथमग्रासे मक्षिकापात:’ झाल्यावर सामान्यतः लोक निराश होतात-दोन पावले मागे सरकतात पण ‘असामान्य’ माणसांचे असे नसते, अशा घटनांना ते संधी समजतात.

त्यानं मनोमन चूक कबूल करत आपल्या कामातल्या वेगापेक्षा गुणवत्तेकडे लक्ष्य द्यायला सुरूवात केली आणि चूक लपवण्यापेक्षा तिला सामोरे जाऊन अनेक कंपन्यांच्या मालक आणि अभियंत्यांकडे जाऊन त्यावर सांगोपांग-सकारात्मक चर्चा केली. अभ्यासपूर्ण कष्टाचं एक असतं थोडा वेळ लागतो पण फळ मिळतं. त्यालाही गुणवत्तापुर्ण-दर्जेदार पिस्टन रिंग्ज बनवण्याचं तंत्र गवसले. टोयोटाला त्याचं हे उत्पादन प्रचंड आवडलं आणि नकारात्मक पुर्वानूभवापेक्षा सद्य दर्जाला प्राधान्य देत त्यांनी पुनःश्च एकदा करारही केला. त्याचे हे पिस्टन रिंग्ज हिट झाले आणि व्यवसायात सुसूत्रता आणण्यासाठी यावेळी त्यानं ‘तोकाई सेकी’ नावाची कंपनीच सुरू केली. टोयोटानं त्याच्या या कंपनीचे चाळीस टक्के समभाग खरेदी केले आणि या दोन्ही कंपन्यातील व्यापारी संबंध अजूनच बळकट झाले.

तांत्रिक बाबी-दर्जा वगैरे एक बाजू झाली पण ‘व्यवसाय’ ही किचकट गोष्ट असते. अनुभवाची कमतरता-बाजारातली स्पर्धा अशा काही घटकांमुळे त्याच्या छोट्या कंपनीचं अनेकदा ‘मोठ्ठ’ नुकसान झाले. पर्यायानं त्याला टोयोटाला आपल्या कंपनीचे सगळे समभाग विकावे लागले. गाडी थोडी रुळावर येते न येते तोच अचानक त्याचा अपघात झाला आणि त्याला तीन महिने हॉस्पिटलमध्ये रहावे लागले. पर्यायाने पुन्हा कंपनीचं मोठं नुकसान झालं. यातूनही तो कष्टपुर्वक उभा राहिला तोच १९४४ ला दुसऱ्या जागतिक महायुद्धाचं रणशिंग फुंकलं आणि अमेरिकेनं जपानवर हल्ला केला.

या हल्ल्यात त्याची कंपनी आगीत भस्मसात झाली. काय करावं? कंपनीचे उरलेले अवशेष चार लाख पन्नास हजार येन मध्ये विकून त्याने यावेळी आपली खाजगी संशोधन संस्था सुरू केली आणि पुनःश्च एकवार तो उभा राहिला. यश-अपयश-यश-अपयश यांचं दृष्टचक्र सुरू असलं तरी त्याने अजिबात हार न मानता आपले प्रयत्न सुरूच ठेवले पण बुडत्याचा पाय खोलात. यावेळी भूकंप झाला आणि होतं नव्हतं ते सगळं भूमीगत झालं. ‘मोडून पडलं घर तरी मोडला नाही कणा’ या उक्तीप्रमाणं जमीन खचली असली तरी त्याचा आत्मविश्वास अजूनही खचला नव्हता. त्यानं कच्चा माल म्हणून गॅसोलिनचे कॅन जमा करायला सुरूवात केली ज्याच्या मदतीनं तो त्याचे नवं उत्पादन बनवणार होता पण गॅसोलिनच्या कमतरतेमुळे लोकांकडे पायी चालणे किंवा सायकल वापरणे हे दोनच पर्याय शिल्लक राहिले होते.

‘चला काहीतरी नवंच करुया’ म्हणून त्यानं जुगाड करत एक छोटं इंजिन बनवत ते सायकलला जोडत त्याचं नाव ठेवलं ‘चुचू’. फक्त पंधराशे रुपयात या चुचूची विक्री सुरू झाली, फायदाही झाला पण एवढ्यातच खुश होईल तो जपानी कसला? त्यानं टु स्ट्रोक इंजिनवर काम करत थेट मोटारसायकल बनवली.

हा प्रयोगही यशस्वी झाला पण समस्या काही संपल्या नव्हत्या. यावेळी उलटं झालं, मागणी खूप झाली आणि कच्चा माल कमी लोकांनी गोंधळ घातला पण यावेळीही त्याने आपले संतुलन हरवले नाही. मोठ्या कष्टाने त्याने स्वतंत्र इंजिन असलेली दुचाकी बनवली पण अडचण अजूनही होतीच. त्याचं हे धुड अंमळ वजनदार झालं होतं. ‘दुचाकीचं वजन कमी करणं’ हे आता त्याचं महत्वाचं लक्ष्य होते. पुन्हा अहोरात्र कष्ट या कष्टांचंही त्याला फळ मिळालं त्याने छोट्या आकारात इंजिन बनवलं आणि त्याचं नामकरण केलं ‘द सुपर कब’ ‘द सुपर कब’ला नावाप्रमाणेच ‘सुपर’ यश मिळाले इतके की युरोप-अमेरिकेतूनही त्याला मागणी आली. १९४९ला त्याने 'डी' नावाची संपुर्ण मोटरसायकल लॉंच केली. या मॉडेलचे सगळे भागही त्याच्याच कारखान्यात बनत.

या मॉडेलला जगभरातून प्रचंड मागणी आली आणि १९६४ उजाडेपर्यंत त्याची कंपनी मोटारसायकल विकणारी जगातील सगळयात मोठी कंपनी ठरली आणि जशी जपानी अर्थव्यवस्था सुधारली तसं त्याने कार बनवायला सुरूवात केली. छोट्याशा गॅरेजमधून सुरू झालेला त्याचा प्रवास खाचखळग्यांनी भरलेला असला तरी अथक परिश्रम-विजीगीषु वृत्ती-संशोधक मन यांच्या साथीनं त्यानं आपल्या नावाचा जागतिक ऑटोमोबाईल ब्रॅंड सेट केला. तो ब्रॅंड म्हणजे ‘होंडा’ आणि त्यामागचा हा आपला नायक म्हणजे सोईचिरो होंडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT