Shivsena MLA Sanjay Gaikwad and bull of Latur farmer : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे कायमच त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे नाहीतर कारनाम्यांमुळे चर्चेत असतात. बऱ्याचदा ते वादातही सापडलेले आपल्या दिसते. सध्या त्यांचा आमदार निवासातील काँटीनमधील मारहाणीचा कारनामा राज्यभर चर्चेचा विषय आहे. यावरून विधिमंडळात विरोधकांना सरकारलाह धारेवर धरलेलं आहे. एकीकडे मारहाण प्रकरणाची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे संजय गायकवाड यांच्याशी संबंधित आणखी एक बाब समोर आली आहे.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हडोळी येथील एक शेतकरी खांद्यावर जू घेऊन पत्नीसह औत ओढतानाचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाले होते. यानंतर संबंधित शेतकरी अंबादास पवार यांना राज्यभरातून मदतीचा हात मिळाला.
या मदत करणाऱ्यांपैकी एक बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडही होते. त्यांनी त्या शेतकरी दाम्पत्यास एक बैलजोडी दिली आहे. त्यांच्या या मदतीबाबत सर्वत्र चांगली चर्चाही झाली. मात्र गायकवाडांनी दिलेल्या बैलजोडीतल एक बैल मारका निघाल्याचे आता समोर आले आहे.
शेतकऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैलजोडीतील एक बैल प्रचंड मारका आहे. तो कुणाला जवळही उभा करत नाही. कुणी जवळ जायचा प्रयत्न केला तर लाथ मारतो, त्यामुळे त्या शेतकरी दाम्पत्यास आता वेगळाच ताप झाला आहे. कारण, या बैलाबाबत असून अडचण आणि नसून खोळंबा अशी काहीशी गत झाली आहे.
यामुळे आता संजय गायकवाडांनी नुकताच आमदार निवसात जो राडा घातला, त्यावरून लोक मारक्या आमदाराचा मारका बैल..., असंही बोलू लागले आहेत. हा बैल औत ओढतानाही शेतकऱ्यास त्रास देत आहे. हा बैल सोडण्यासाठी आणि आवरण्यासाठी दोन माणसं लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.