सिन्नर (जि. नाशिक) : विश्वशांतीचे सूत्र सांगणारा, वेद, भगवतगीता, उपनिषदे व ब्रम्हसूत्रांचा सार असलेला 'चांगदेव पासष्टी' हा संत ज्ञानेश्वरांची रचना असलेला ग्रंथ इंग्रजी अनुवाद रूपाने जागतिक सफरीसाठी सज्ज झाला आहे. सिन्नर तालुक्यातील मलढोण या लहानशा गावातील कीर्तनकार डॉ. सुभाष महाराज गेठे यांनी हा ग्रंथ भाषांतरित करून जगभरातील संत साहित्याच्या अभ्यासकांना उपलब्ध करून दिला आहे. महासंगणकाचे जनक, जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. (Changdev Pasashti available in English language to scholars all over world 490 page translated book created by Gethe Maharaj at sinnar nashik Latest Marathi News)
अवघे विश्वची माझे घर असे सांगणाऱ्या ज्ञानोबा माऊलींचे लेखन विश्वव्यापी बसावे यासाठी आळंदीस्थित जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ. गेठे महाराज प्रयत्नशील आहेत. तत्वज्ञान, संत साहित्य विशेषतः संत ज्ञानेश्वरांच्या साहित्याचे अभ्यासक असलेले गेठे महाराज यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत ज्ञानेश्वर महाराजांचे तत्त्वज्ञान आणि उपनिषेद यावर पीएचडी मिळवली आहे. ते भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीवर हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेत व्याख्यान देत असतात. ‘चांगदेव पासष्टी’ ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद करून त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचे विचार जगभर पोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
इंग्रजी अनुवादातील 'चांगदेव पासष्टी' ग्रंथ आता अभ्यासकांच्या चिंतनासाठी सातासमुद्रापार जाणार आहे. ज्ञान दिल्याने वाढते. कोणतेही ज्ञान स्वत:पुरते मर्यादीत न ठेवता ते जनमानसांत पोहचविले पाहिजे असा निश्चिय करुन डॉ. गेठे महाराज यांनी मांडलेला प्रपंच कौतुकास्पद असाच म्हणावा लागेल. 'चांगदेव पासष्टी' हा ४९० पानांचा भाषेत ग्रंथ इंग्रजी भाषेतून साकारत त्यांनी माऊलींचे तत्त्वज्ञान फक्त भारत देशापुरते मर्यादित न राहता जगभर पोहचले पाहिजे या उद्देश सार्थ केला आहे. जगाला वारकरी संप्रदाय समजावा यासाठी डॉ. गेठे महाराज यांनी विविध साहित्य इंग्रजीतून साकारले आहे. त्यात हरिपाठ, पसायदान, गीता व ज्ञानेश्वर महाराजांचे २०० पानी चरित्राचा यात समावेश आहे.
काय आहे 'चांगदेव पासष्टी'
१४०० वर्षांचे आयुष्य मिरवणारे योगी चांगदेव महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांना पत्राची सुरवात करताना काय लिहावे या संभ्रमातून कोरे पत्र पाठविले होते. त्यावर निवृत्तीनाथ महाराजांनी माऊलींना तुम्ही या कोऱ्या पत्रावर ज्ञानाचे संस्कार करा असा उपदेश केला. तेव्हा संत ज्ञानेश्वरांनी ६५ ओव्यांचे पत्र चांगदेव महाराजांना पाठविले होते. तोच 'चांगदेव पासष्टी' हा ग्रंथ होय. त्यात वेद, भगवतगीता, ब्रम्हसूत्रे व उपनिषदांचा सार केवळ ६५ ओव्यांमध्ये संक्षीप्त आणि सूत्रमय भाषेत सांगितला होता. जीव आणि अंतिम तत्त्व यांचा परस्पर संबंध यासाठी विविध दृष्टांत आणि आधुनिक विज्ञानाचे सिध्दांत यात ज्ञानेश्वरांनी सांगितले आहेत.
"संत साहित्य विश्वाला शांती देणारे साहित्य आहे. विश्वशांतीचे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी अवघे जग माऊलींच्या साहित्याकडे आकृष्ट झाले आहे. मात्र हे तत्वज्ञान मराठी प्राकृत भाषेत असल्याने जगभरातील अभ्यासकांना वंचित राहावे लागत होते. विविध देशातील अभ्यासकांची सदर तत्वज्ञान सर्वांना समजणाऱ्या भाषेत उपलब्ध व्हावे अशी इच्छा होती. म्हणूनच चांगदेव पासष्टी ग्रंथाचा इंग्रजीतून अनुवाद करण्यात आला."
- डॉ. सुभाष महाराज गेठे , अध्यक्ष, जनकाई वेदांत प्रतिष्ठान, आळंदी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.