येवला : आपल्याला अवगत असलेले ज्ञान आणि कला समाजाच्या हितासाठी उपयोगात आली, तर नक्कीच आनंद होईल, या भावनेतून जळगाव नेऊर येथील शिक्षक सुरेश शेळके यांनी कुणबी नोंदी शोधण्यासाठी दिवाळीत मोठी मेहनत घेतली.
त्यांच्या प्रयत्नातून सुमारे दोन हजार नोंदी सापडल्या असून, मराठा बांधवांना आता ओबीसीचे दाखले मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. (Day and night to find Kunbi records in Modi script About 2 thousand entries were found by shelke teacher of Jalgaon Neur Nashik)
शासनाने कुणबी नोंदी शोधण्यासाठी आदेश दिल्यानंतर अनेक शाळा व नगरपालिकेतही अनेक नोंदी मोडी लिपीत असल्याने त्याची माहिती उपलब्ध कशी करावी, हा पेच प्रशासनापुढे होता. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जळगाव नेऊर शाळेतील शिक्षक सुरेश शेळके यांचे नाव पुढे आले.
त्यांनीही ऐन सुट्टीत आपला वेळ देऊन विविध कार्यालयांतील कुणबी नोंदी तपासण्याचे काम केले. येवला शहर व तालुक्यातील विविध आस्थापनांमधील मोडी लिपीतील नोंदी तपासण्याचे काम करण्यासाठी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली व त्यांनी ती लीलया पार पाडली.
शहराला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असल्याने पुरातन काळातील मोडी दस्तऐवज मोठ्या प्रमाणात आहेत. येथील नगरपरिषद कार्यालयात १८८८ ते १९३५ या कालावधीतील सर्व जन्म व मृत्यूच्या नोंदी मोडी लिपीत केल्या आहेत.
शहरातील सर्व मराठी शाळांमधील विद्यार्थी प्रवेशाचे रेकॉर्ड १८४५ पासूनच्या नोंदींची जनरल रजिस्टर्स सध्या लक्कडकोट येथील मराठी शाळेत ठेवली आहेत.
तहसील कार्यालयातील जन्म-मृत्यू नोंदींची रजिस्टर्स व ग्रामीण भागातील सुमारे दहा मराठी शाळांमधील विद्यार्थी प्रवेश जनरल रजिस्टर्स १८६३ पासून १९२० पर्यंत मोडी लिपीत विविध प्राथमिक शाळांमध्ये उपलब्ध आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणावरील नोंदींचे वाचन करणे, त्यातील कुणबी नोंदी शोधणे व त्या देवनागरीत लिहिणे हे मोठे आव्हान शेळके यांनी स्वीकारले व पूर्णही केले. प्रांताधिकारी गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वेळापत्रक बनवले.
पाच दिवसांत रोज सुमारे वीस हजारांच्या सरासरीने त्यांनी मोडी नोंदी तपासल्या. त्यांनी रोज सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळात हे काम केले. अथक परिश्रम करून शहर व ग्रामीण भागातील मोडी लिपीतील सुमारे दोन हजार कुणबी नोंदी शोधून काढल्या.
या कामात त्यांना स्वामी मुक्तानंद विद्यालय प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक किरण जाधव यांचे सहकार्य लाभले. कुणबी नोंदी शोधण्यासाठी मिळालेला कालावधी अत्यल्प होता.
महिनाभर कालावधी मिळाल्यास तालुक्यातील अजूनही २० ते २५ टक्के कुणबी नोंदी सापडू शकतात. तसेच जिल्ह्यातही अजून नोंदी सापडू शकतात, असेही शेळके यांनी सांगितले.
दरम्यान, मोडी वाचक शेळके व त्यांचे मित्र किरण जाधव यांनी प्रशासनास केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले.
येथील पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, विस्ताराधिकारी सुनील मारवाडी यांनी शेळके यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. मराठा समाजातर्फे त्यांचा लवकरच सत्कार करण्यात येणार असल्याचे आंदोलक संजय सोमासे यांनी सांगितले.
"येथील नगरपालिका सर्वांत जुनी आहे. १८६३ पासून ते १९२० पर्यंत मोडी लिपीत दप्तर विविध प्राथमिक शाळांमध्ये उपलब्ध आहेत. हे दप्तर तपासण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते. मात्र, मोडीलिपी वाचक सुरेश शेळके यांनी मेहनत घेऊन या लिपीतील नोंदणी शोधल्या व कुणबीची नावे प्रशासनाला उपलब्ध करून दिले. याचा अनेक कुटुंबियांना ओबीसी दाखला मिळण्यासाठी फायदा होणार आहे."-संजय कुसाळकर, गटशिक्षणाधिकारी, येवला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.