नाशिक : लॉकडाउन 2.0 सुरू झाले, तरीही मुंबईहून नाशिकमार्गे पुढे सरकणाऱ्या स्थलांतरित कामगारांचे लोंढे ओसरण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. बुधवारी (ता. 15) दुपारी राणेनगर उड्डाणपुलाच्या शेजारी 30 तरुणांचा समूह पाहायला मिळाला. त्या वेळी त्यांना पोलिसांना कळविण्यात येत आहे, असे सांगितल्यावर त्या तरुणांनी एकसुरात "कुच्छ भी करने दो, हमे घर जाना हैं' असे म्हणत मध्य प्रदेशकडे जाण्याविषयीची अगतिका दाखवून दिली.
तुमची घरच्यासारखी व्यवस्था होईल म्हणत घातली समज
नाशिकमधील तरुणाने मुंबईहून तरुण चालत निघाल्याची माहिती कळविल्यावर पोलिस त्या ठिकाणी आहेत. त्यांनी बिस्किट आणि पाणी दिले आणि निघून गेले. एवढेच नव्हे, तर शेजारील रहिवाशांनी खिचडी बनवून देईपर्यंत तरुण थांबून राहिले. त्यांनी सोबत थंड पाण्याचा कॅन आणलेला होता. खिचडी पोटभर खाऊन कॅनमधील पाणी प्यायले आणि तरुण मजल-दरमजल करत पुढे रवाना झाले. स्वयंसेवी संस्थांतर्फे या तरुणांशी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवारा शेडमध्ये चला, तुमची घरच्यासारखी व्यवस्था होईल, असे समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तरुणांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.
पिक-अपने पिंपळगावला काही जण गेले
मध्य प्रदेशकडे निघालेल्या तरुणांशी संवाद साधत असताना कार्यकर्त्यांना त्यांनी पिक-अपमधून काही जण पिंपळगावपर्यंत पोचल्याचे सांगितले. तसेच इगतपुरीपर्यंत बसून आलेला ट्रॅक्टर घोटीमध्ये पोचल्याची माहिती त्यांनी दिली. हे कमी काय म्हणून मागे आणखी पन्नास ते साठ जण असल्याची माहिती त्या तरुणांनी दिली. ही सारी माहिती पोलिसांना कार्यकर्त्यांनी पोचविली. मात्र तरुण आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
चेकपोस्टवरून उड्या मारल्याची शक्यता
लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सीमा सीलबंद करण्यात आल्यावर चेकपोस्टची उभारणी करण्यात आली होती. तसेच मुंबईहून आलेल्या कष्टकऱ्यांना अडवून इगतपुरी आणि नाशिकमध्ये ठेवल्यानंतर परिस्थिती निवळल्याचे मानले जात होते. मात्र या घटनेने परिस्थिती जैसे-थे असल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे, तर बंद चेकपोस्टवरून तरुण उड्या मारून आणि पोलिसांची नजर चुकवून आल्याचा अंदाज प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.